दत्ता थोरे/ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 21 - काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून प्रसिध्द असलेल्या स्व. विलासराव देशमुखांच्या लातूर महापालिकेवरील काँग्रेसची गढी  भाजपा लाटेत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आ. अमित देशमुख यांच्या नेतृत्वाच्या मर्यादा उघड्या करित महापालिकेवर गेल्या ६५ वर्षात पहिल्यांदाच भाजपाने आपला भगवा फडकला. भाजपाने ७० पैकी ३८ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले. परिवर्तन होऊन कमळ फुलल्याने पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हेच जिल्ह्याचे नेते यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केलेच, शिवाय आ. अमित देशमुखांचे नेतृत्व नाकारुन त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसमोर आव्हान उभे केले आहे. 
 
कधी काळी लातूर आणि काँग्रेस हे समीकरण अतूट होते. जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात इतके हे नाते घट्ट होते. मात्र आधी नगरपरिषदा, मग जिल्हा परिषद आणि आता महापालिका या सर्व निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट झाली. महापालिकेच्या ७० पैकी ३८ जागांवर विजय मिळवित भाजपाने स्पष्ट बहुमत मिळविले. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा मोठा विजय मानला जातो. 
 
काँग्रेसच्या दिग्गजांना पराभूत व्हावे लागले. माजी महापौर स्मिता खानापुरे,   असगर अली पटेल, माजी नगराध्यक्ष लक्ष्मणक कांबळे, अशा दिग्गजांना पराभूत व्हावे लागले. तर विक्रांत गोजमगुंडे, पूजा पंचाक्षरी, पप्पू देशमुख, कमल सोमवंशी, गौरव काथवटे, फरजाना बागवान आदी दिग्गज विजयी झाले. 
 
भाजपाकडून शैलेश गोजमगुंडे, शैलेश स्वामी, गीता गौड, सुरेश पवार, शितल मालू, अजय कोकाटे, शकुंतला गाडेकर, डॉ. दीपाताई गिते, शशिकला गोमसाळे आदींची विजय मिळविला.
 
भाजपा ‘झिरो टू हिरो’ ! 
मावळत्या महापालिकेत भाजपाला एकही जागा नव्हती. झिरो जागा असतानाही भाजपाने कमाल केली. शिस्तबध्द प्रचार यंत्रणा, मजबूत कार्यकर्त्यांची फळी आणि मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्टÑीय प्रवक्ते शहानवाज हुसेन आदींच्या प्रचारसभाचा धुरळा यामुळे भाजपाने जोरदार मुसंडी मारित काँग्रेसला चारी मुंड्या चित केले.
 
काँग्रेस नेते कव्हेकरांचा मुलगा भाजपा तिकीटवर विजयी 
काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचे चिरंजीव अजितसिंह पाटील कव्हेकर हे प्रभाग १८ मधून विजयी झाले आहेत. ते सज्ञान असल्याने काहीही निर्णय घेऊ शकतात, असे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मांडले होते. शिवाजीराव पाटील कव्हेकर हे अद्याप काँग्रेसमध्येच आहेत. त्यांना पक्षात घ्यायला भाजपा तयार नाही. मात्र आता मुलगा भाजपाच्या तिकिटावर निवडून आल्याने त्यांची पुढची राजकीय वाटचाल काय ? याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.
 
संभाजीराव पाटील ठरले अमित देशमुखांना वरचढ 
ही लढाई पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर विरुध्द अमित देशमुख अशीच रंगली होती. यात संभाजीराव पाटील हे अमित देशमुखांना वरचढ ठरले आहेत. आधी जिल्हा परिषदेत आणि आता महापालिकेत त्यांनी अमित देशमुखांचा धोबीपछाड दिली.
 
लातूर जिल्ह्याचे सत्ताकेंद्र आता पुन्हा निलंग्याकडे 
लातूर जिल्ह्याचे सत्ताकेंद्र पुन्हा एकदा निलंग्याकडे सरकले आहे. यापूर्वी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकरांचे आजोबा ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवाजीराव पाटील निलंगेकर हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचे सत्ताकेंद्र निलंगा राहीले होते. ते आता पुन्हा नातू संभाजीराव यांनी निलंग्याकडे नेले.
 
देशमुखांची संस्थाने खालसा ! 
स्व. विलासरावांच्या निधनानंतर काँग्रेस पूर्णत: पोरकी झाली, यावर महापालिकेतील पराभवाने अंतिम मोहोर उमटली. जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांतून काँग्रेस सत्तेबाहेर गेली होती. सात पंचायत समित्या पक्षाने गमाविल्या होत्या. त्यानंतर जिल्हा परिषदही गमावली. आणि आता महापालिकाही गमावली. अशी एक एक सत्ता संस्थाने खालसा झाल्याने अमित देशमुख यांना विलासरावांचा वारसा पेलवत नसल्याचे पुढे आले आहे.