गढूळ राजकारण स्वच्छ करणार : आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 05:01 AM2019-01-27T05:01:05+5:302019-01-27T05:01:44+5:30

‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी मेळाव्याला अनुपस्थित

Clean India's politics: Ambedkar | गढूळ राजकारण स्वच्छ करणार : आंबेडकर

गढूळ राजकारण स्वच्छ करणार : आंबेडकर

googlenewsNext

सातारा : ‘साताऱ्याचा इतिहास परिवर्तन व पुरोगामी चळवळीचा आहे. पण येथे प्रतिगामी बसलेत की काय हेच समजत नाही. पाणी गढूळ झालं की त्यात अळ्या होतात. असं पाणी फेकून भांडं स्वच्छ करावं लागतं. त्याचप्रकारे वंचित बहुजन आघाडी गढूळ पाणी स्वच्छ करायला निघालीय. त्यासाठी नव्या दमाची माणसं आम्ही उभी करणार आहोत,’ असे ठाम प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

येथील गांधी मैदानावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्ता संपादन मेळावा झाला. यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला माजी आमदार लक्ष्मण माने, हरिभाऊ भदे, पार्थ पोळके, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, हाजी अस्लम सय्यद यांच्यासह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे मान्यवर उपस्थित होते.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, ‘९० दिवसांवर लोकसभा निवडणूक आली आहे. पण या देशाला अर्थमंत्री नाही. देशाचं महत्त्वाचं खातं असणारा अर्थ विभागच रामभरोसे असेल तर कसं चालायचं. या सरकारच्या काळात उजवा आणि डावा हात काय करतोय, तेच कळत नाही. त्याचबरोबर भाजप सरकारनं सवर्णांना १० टक्के आरक्षण दिलंय. यामुळे आमच्या पोटात दुखत नाही. पण यामुळे देशातील वैचारिक दिवाळखोरी समोर आलीय. कारण आरक्षण हे विकासाचं साधन नाही तर आश्वासन आहे. या सरकारला काय करावं आणि काय नको हेच कळेनासं झालंय. देशाच्या संविधानानं विकासाची दारं उघडतात; पण हे सरकार तेच बदलायला निघालंय. संविधान चिरंतन राहील, अशी भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठीच बहुजन वंचित आघाडी निवडणुकीत उमेदवार उभे करणार आहे.

या वैचारिक दिवाळखोरीच्या सरकारला बदलण्यासाठी आता नव्या सोशल अजेंड्याची गरज आहे, तेच आता करावे लागणार आहे, असेही अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. यावेळी राज्यातून आलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. दरम्यान, या मेळाव्यात पार्थ पोळके यांनी भारिप बहुजन महासंघात प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.

ओवैसींची अनुपस्थिती
‘एमआयएम’चे खासदार असदुद्दीन ओवैसी हे मेळाव्याला येऊन मार्गदर्शन करणार होते. त्यादृष्टीने सर्व नियोजन झाले होते. पण ते या मेळाव्याला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे उपस्थितांची नाराजी झाली.

आंबेडकर सोलापुरातूनही उभे राहणार
माजी आमदार लक्ष्मण माने यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘प्रकाश आंबेडकर हे अकोल्याबरोबरच सोलापूर लोकसभा मतदारसंघातूनही उभे राहणार आहेत. आता यामुळे समोरच्यांचा ब्लड प्रेशर वाढल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रचारालाही येऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, असेही त्यांनी म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत केले.

Web Title: Clean India's politics: Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.