छोटा शकीलच्या खबऱ्याने दडविली ओळख

By admin | Published: January 5, 2016 03:00 AM2016-01-05T03:00:42+5:302016-01-05T03:00:42+5:30

जेष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे खरे नाव सय्यद अब्बाज सय्यद असे असून,

Chhota Shakeel News | छोटा शकीलच्या खबऱ्याने दडविली ओळख

छोटा शकीलच्या खबऱ्याने दडविली ओळख

Next

मुंबई : जेष्ठ पत्रकार बालाकृष्णन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे खरे नाव सय्यद अब्बाज सय्यद असे असून, तो खोटे नाव वापरून ओळख लपवित असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. सय्यद अब्बाज तुबलानी हे नाव लावत होता. या नावाने त्याने अवघ्या दोनशे रुपयांमध्ये बनावट पॅनकार्ड बनविले होते.
दाऊदच्या मालमत्तांच्या लिलावात सहभाग घेतल्याच्या रागातून गँगस्टर छोटा शकीलने बालाकृष्णनला जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. मात्र, त्याच्या धमकीला न जुमानता, त्यांनी या लिलावामध्ये भाग घेत, पाकमोडिया स्ट्रीटवरील हॉटेल रौनक अफरोज ४ कोटी २७ लाखांना विकत घेतले. त्यामुळे छोटा शकीलने मुंब्रा येथील रहिवासी असलेल्या सय्यदच्या मदतीने त्याचा हत्येचा कट रचला होता. सय्यदच्या अटकेनंतर छोटा शकील त्याला दरमहिना ५ ते १० हजार रुपये हवालामार्गे पुरवित असल्याचे समोर आले.
सय्यदला २००८ मध्ये हैद्राबाद येथे एका गुन्ह्यात अटक केल्यानंतर तो जामिनावर बाहेर पडला. त्यानंतर सय्यद अब्बाज तुबलानीच्या नावाने मुंब्रा येथे वास्तव्यास आला. त्याने अवघ्या दोनशे रुपयांमध्ये बनावट पॅनकार्ड बनवून घेतले होते. अशा प्रकारे तो सय्यद अब्बाज सय्यद उर्फ तुबलानी उर्फ अली सय्यद उर्फ जास्मीन अशा नावाने ठिकठिकाणी भाडेतत्त्वावर राहत होता.
९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असलेल्या सय्यद छोटा शकीलसाठी खबरी म्हणून काम करत होता. त्याच्या घरझडतीमध्ये बाळकृष्णच्या घरचा आणि कार्यालयाचा पत्ता असलेले कागद सापडले आहेत. त्या आधारे अधिक तपास सुरू आहे. त्यात आपण कुणाच्या कानशिलातही कधी मारली नसल्याचे सय्यदने पोलिसांना सांगितले आहे. मात्र, या प्रकरणी त्याच्याकडे कसून चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Chhota Shakeel News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.