भ्रष्टाचारही झाला कॅशलेस! आरटीओत रिक्षा परवाना मुलाखतीसाठी स्वीकारली कॅशलेस लाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 02:57 AM2017-08-08T02:57:42+5:302017-08-08T03:39:26+5:30

रिक्षा परवान्यासाठी (परमीट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी एक बहाद्दर चक्क पेटीएमवरून कॅशलेस लाच स्वीकारत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे.

Cash was cashless! Cashless bribe accepted for interview in RTO Rickshaw | भ्रष्टाचारही झाला कॅशलेस! आरटीओत रिक्षा परवाना मुलाखतीसाठी स्वीकारली कॅशलेस लाच

भ्रष्टाचारही झाला कॅशलेस! आरटीओत रिक्षा परवाना मुलाखतीसाठी स्वीकारली कॅशलेस लाच

Next

विशाल शिर्के 
पुणे : रिक्षा परवान्यासाठी (परमीट) प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी एक बहाद्दर चक्क पेटीएमवरून कॅशलेस लाच स्वीकारत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली आहे. विशेष म्हणजे, आलेले अर्ज नोंदवून मुलाखतीची माहिती नोंदविणाºया एका राष्ट्रीय पातळीवरील माहिती केंद्राच्या कार्यालयातूनच हा प्रकार होत असल्याचे दिसून येत आहे.
राज्य सरकारने रिक्षा परवाने खुले केल्यानंतर, परवाना मिळविण्यासाठी नागरिकांची रांग लागली आहे. शनिवारी (दि. ५) रात्रीपर्यंत आरटीओकडे तब्बल १० हजार अर्ज दाखल झाले होते. या अर्जाची प्रक्रिया ही आॅनलाईन आहे. आॅनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर संबंधित अर्जदाराला आरटीओकडे मुलाखतीसाठी बोलावले जाते. त्यात अर्जाबरोबर जोडलेल्या वाहन परवाना, बॅज, नामनिर्देशन पत्र, पोलिसांचा चारित्र्य पडताळणी अहवाल, रहिवासी दाखला, शळा सोडल्याचा दाखला याच्या मूळ प्रतींची तपासणी केली जाते.
याबाबत माहिती देताना सीताराम मेमाणे म्हणाले, की गेले चार-पाच दिवस मी माझ्या अर्जाची परस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो; मात्र त्याबाबत काहीच कळत नव्हते. काही दिवसांपूर्वी मला संदीप सानप या व्यक्तीचा फोन आला होता. त्याने दोनशे रुपयांत काम करून देतो, असे सांगितले होते. त्या व्यक्तीशी संपर्क साधून पेटीएमवरून पैसे पाठविले. लगेचच मुलाखतीची तारीखदेखील कळाली.

हजारो अर्ज; पण शंभर मुलाखती

आरटीओकडून शंभर जणांना दररोज मुलाखतीसाठी बोलावले जाते. अर्जदारांच्या अर्जाची नोंदणी झाल्यानंतर संबंधित अर्जदाराला मुलाखतीच्या तारखेचा एसएमएस पाठविला जातो. तसेच, परिवहनच्या संकेतस्थळावरुन संबंधिताला या मुलाखतीची प्रत देखील काढता येते.
हजारोने आलेले अर्ज आणि दररोज शंभरच जणांची मुलाखत होणार असल्याने आत्ताच्या दाखल अर्जानुसार (दहा हजार) देखील शंभर कार्यालयीन कामाचे दिवस लागतील.
याच अडचणीचा फायदा घेऊन एक व्यक्ती संदीप सानप या नावाने रिक्षाचालकांना फोन करुन, मुलाखतीची तत्काळ तारिख देण्यासाठी दोनशे रुपयांची मागणी करीत आहे.

याबाबत लोकमतकडे काही रिक्षाचालकांनी तक्रार केली होती. त्याप्रमाणे रिक्षाचलाकाच्या सहाय्याने लोकमतने त्या व्यक्तीशी दूरध्वनीवरुन संवाद साधला. त्यात या सानप नावाच्या व्यक्तीने मुलाखतीची तारीख मिळवून देण्यासाठी दोनशे रुपये पेटीएम करायला लावले. त्यानंतर तुम्हाला मुलाखतीचा एसएमएस येईल, असे सांगितले. त्यानुसार दोनशे रुपये दिल्यावर लगेचच मुलाखतीची १९ सप्टेंबर ही तारीख एसएमसद्वारे अर्जदाराला मिळाली.

डाटा ऐंट्री करणारे कर्मचारी जाणूनबुजून नोंदणी करण्यास टाळाटाळ करीत आहेत. चक्क अर्जदारांना फोन करुन, काम करुन देण्यासाठी दोनशे रुपये मागगितले जात आहेत. खरेतर, आरटीओने पारदर्शक कारभारासाठी आॅनलाईन अर्ज प्रणाली आणली आहे. मात्र, आॅनलाईन कारभार देखील भेदता येऊ शकतो, हेच या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. या मुळे आरटीओच्या आॅनलाईन परवाना आणि इतर सेवेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
- संजय कवडे, अध्यक्ष पुणे शहर (जिल्हा) वाहतूक सेवा संघटना


असा झाला संवाद!
अर्जदार : तुम्ही माझे काम करुन देणार होता ना?
सानप : नाव सांगा. कुठून बोलताय?
अर्जदार : मेमाणे
सानप : तुम्ही आले नाहीत तेव्हा
अर्जदार : दोन दिवस इथे नव्हतो
सानप : बरं, परवाना क्रमांक सांगा
अर्जदार : एमएच १२ ....
सानप : तुम्हाला दोनशे रुपये चार्जेस सांगितले होते ना ?
अर्जदार : दोनशे रुपये कसे द्यायचे ?
सानप : माझ्या या क्रमांकावर (मोबाईल) पेटीएम करा. मुलाखतीच्या तारखेबाबत काही अडचण आल्यास सायंकाळी फोन करा !

शनिवारी सायंकाळपर्यंत रिक्षा परवान्यासाठी दहा हजार अर्ज दाखल झाले होते. अर्ज केल्यानंतर त्याची नोंदणी राष्ट्रीयकृत माहिती केंद्रातून केली जाते. आरटीओ कार्यालय दररोज शंभर मुलाखती घेते. त्यानुसार मुलाखतीच्या दिवसांचे नियोजन केले जाते. संगणकीय प्रणालीमार्फत हे काम होत असल्याने, यात त्रुटी असण्याची शक्यता संभवत नाही. भ्रष्ट प्रकार घडला असल्यास, संबंधिताला तत्काळ निलंबितच केले पाहिजे.
- बाबासाहेब आजरी,
प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

Web Title: Cash was cashless! Cashless bribe accepted for interview in RTO Rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.