बेहरामपाड्यात इमारत कोसळून ६ ठार; ५ जखमी

By Admin | Published: October 14, 2016 03:40 AM2016-10-14T03:40:13+5:302016-10-14T03:40:13+5:30

वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाड्यात गुरुवारी दुपारी चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण ठार तर ५ जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता

Building collapses in Behrampad; 5 injured | बेहरामपाड्यात इमारत कोसळून ६ ठार; ५ जखमी

बेहरामपाड्यात इमारत कोसळून ६ ठार; ५ जखमी

googlenewsNext

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाड्यात गुरुवारी दुपारी चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण ठार तर ५ जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.


आयेशा अकबर खान (१२), अली निसार अहमद खान (३), ओसामा निसार खान (१४), अफिफा सादाब (१), अरिबी सदर निसार खान (२), रुसुदा निसार अहमद खान (१६) अशी मृतांची नावे आहेत. तर दौलत शेख, झुल्फेखान निसार खान, साखिया निसार अहमद खान, अब्दुल सलाम शेख, इस्लाम इकबाल शेख अशी जखमींची नावे आहेत. वांद्रे पूर्वेकडील अनंत काणेकर मार्गालगत बेहरामपाडा ही वस्ती आहे. कोसळलेले बांधकाम हे नॅशनल शाळेजवळील आहे.


जागा रेल्वेची, नियोजन एमएमआरडीएकडे-

बेहराम पाड्यातील अनधिकृत मजल्यांच्या टॉवरची उंची दिवसेंदिवस वाढतच आहे. संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे जुहू येथे दुर्घटना घडली तेव्हा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवत १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई करण्याबाबतची विनंती केली होती.
या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच आता बेहरामपाडा येथे दुर्घटना घडली. कोसळलेले बांधकाम हे रेल्वे प्रशासनाच्या भूखंडावरील असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर या परिसराची ‘प्लानिंग अ‍ॅथोरिटी’ म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे.


उपचारापूर्वीच मृत्यू-

वांद्रे येथील भाभा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजेपर्यंत या दुर्घटनेत जखमी झालेल्या ११ लोकांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी ६
जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.
शोधकार्य सुरूच
बांधकामाचा ढिगारा उपसण्यासाठी २ जेसीबी आणि ३० कामगारांची मदत घेण्यात आली. प्रत्यक्षात घटनास्थळी काम करण्यास अपुरी जागा असल्याने १० कामगार
आणि अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत शोधकार्य हाती घेण्यात आले होते.


दाटीवाटीचा परिसर-

गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हे चार मजली बांधकाम पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि परिसरात एकच घबराट उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने सुरुवातीपासून अग्निशमन दलाच्या कार्यात अडथळा येऊ लागला. चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद मार्गामुळे अग्निशमन दलाची अग्निरोधक उपकरणेही घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांना दिलासा देत वेगाने मदतकार्य हाती घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Building collapses in Behrampad; 5 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.