भाजपची ‘भिस्त’ आयारामांच्या ताकदीवर

By admin | Published: February 12, 2017 12:01 AM2017-02-12T00:01:54+5:302017-02-12T00:01:54+5:30

जिल्हा परिषद निवडणूक रणांगण : चंद्रकांतदादांची प्रतिष्ठा पणाला; कोल्हापुरातील लढतींकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

BJP's 'confident' strength of Aamiram | भाजपची ‘भिस्त’ आयारामांच्या ताकदीवर

भाजपची ‘भिस्त’ आयारामांच्या ताकदीवर

Next

विश्वास पाटील--कोल्हापूर --भाजप हा पक्ष केंद्रात व राज्यात सत्तेत असलेला पक्ष असला तरी आतापर्यंतच्या वाटचालीत ग्रामीण राजकारणात घुसायला या पक्षाला मर्यादा आल्या. सत्ता तर हवी आहे आणि मातब्बर उमेदवार तर नाहीत, ही कोंडी फोडण्यासाठी पक्षाने दोन्ही काँग्रेसमधील आयारामांना पक्षात घेऊन पावन करून घेतले आहे. लोक त्यांना व त्यांच्या या व्यवहाराला किती स्वीकारतात, यावर भाजपच्या यशाची भिस्त अवलंबून आहे.
या निवडणुकीत पक्षाला यश किती मिळेल यासंबंधी भाकीत करणे बाजूला ठेवले तरी हवा निर्माण करण्यात हा पक्ष नक्की यशस्वी झाला आहे. मनपा निवडणुकीप्रमाणेच जिल्हा परिषदेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना लोक किती पाठबळ देतात, हा मुद्दाही कोल्हापूर आणि राज्याच्या दृष्टीने औत्सुक्याचा असेल. पालकमंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घेऊन कन्यागत पर्वास घसघशीत १२१ कोटी रुपये मिळवून दिले. कोल्हापूरचा टोल रद्द केला, तीर्थक्षेत्र आराखडा, ‘सीपीआर’मधील सुधारणांपासून ते शहरातील वाहतुकीच्या कोंडीच्या प्रश्नापर्यंत त्यांनी लक्ष घातले आहे. ‘काहीतरी करून दाखविणारा नेता’ अशी त्यांच्याबद्दल लोकभावना आहे; परंतु त्यांनी या निवडणुकीत जो कुणी येईल त्याला मिठी मारल्याने त्याचा फटका त्यांना बसू शकतो. राष्ट्रवादीतील नेत्यांना जेलमध्ये पाठविण्याची भाषा हा पक्ष करीत होता; परंतु त्याच पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये घेऊन ते पावन करून घेत आहे. या आघाड्या करताना पक्षाने कोणतेच तारतम्य बाळगले नाही. म्हणजे चंदगडमध्ये चक्क राष्ट्रवादीच्या आमदारांशीच आघाडी केली आहे. हातकणंगले येथेही तसेच घडले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हेच पडद्याआडून भाजपची सूत्रे हलवितात असा आरोप होतो. ते सोबत असतानाही जनसुराज्य शक्तीच्या विनय कोरे यांनाही आघाडीत घेतले. कोरे व महाडिक यांच्यातून विस्तव जात नाही. एकाच आघाडीत असूनही कोरे यांनी पुलाची शिरोलीत महाडिक यांच्या सुनेला विरोध केला आहे. महाडिक यांना ते आवडले नाही म्हणून चंद्रकांतदादा समजूत काढायला चक्क त्यांच्या घरी गेले. पक्षाकडे जिल्हा परिषदेची सत्ताच नसल्याने पाटी कोरी आहे; परंतु नोटाबंदीचा सर्वसामान्यांना झालेला त्रास मतपेटीतून व्यक्त होतो का, ही भीती पक्षकार्यकर्त्यांतही आहे. लढविलेल्या ३९ पैकी आम्ही किमान २१ च्या पुढे जाऊ, असा दावा पक्षाचे नेते करीत आहेत; परंतु त्या दाव्याला वास्तव स्थितीचा आधार नसल्याचे चित्र दिसते. काहीही करून सत्ता खेचायचीच, अशी भाजपची आणि महाडिक यांची व्यूहरचना आहे; परंतु त्यांच्या प्रयत्नांत शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना अडथळे आणू शकते, असे सध्याचे चित्र आहे.
चंद्रकांतदादांवर राज्याची जबाबदारी असल्यामुळे आमदार सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, बाबा देसाई, हिंदुराव शेळके, आदी नेते किल्ला लढवीत आहेत; परंतु त्यांच्या नेतृत्वाच्या म्हणून अंगभूत मर्यादा आहेत. त्यामुळे कोल्हापूर दक्षिण, हातकणंगले आणि कागलमध्येच भाजपची मदार आहे. कागलमध्ये समरजित घाटगे गेले महिनाभर आई व पत्नीसह गावन्गाव पिंजून काढत आहेत; परंतु तिथे तिरंगी लढत आहे आणि त्यांच्यासमोरील आव्हान मोठे आहे. गडहिंग्लजमध्ये नेसरीत भाजपचे काही प्रमाणात आव्हान आहे. आतापर्यंत दोन्ही काँग्रेसवाल्यांना संधी दिली. आता एकदा यांना देऊन बघू, असा विचार मतदारांनी केला तरच भाजपचे कमळ फुलू शकते.


४ वरून ४० चा पल्ला गाठायचाय..गत निवडणुकीत भाजपने साठपैकी कशाबशा वीसपर्यंतच जागा लढविल्या होत्या. त्यांतील अधिकृत कमळ चिन्हावर कोरोची मतदारसंघातून देवानंद कांबळे हे एकमेव विजयी झाले. पुढच्या टप्प्यात शौमिका महाडिक पोटनिवडणुकीत विजयी झाल्या.
कबनूर विकास आघाडीतून विजयी झालेल्या विजया पाटील या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले परशराम तावरे हे सध्या भाजपमध्ये आहेत. म्हणजे या घडीला चार सदस्य भाजपचे म्हणून आहेत.
या चारवरून भाजपला मित्रपक्षांना घेऊन ४० चा पल्ला गाठायचा आहे. म्हणजे शंभर टक्के यश पक्षाला हवे आहे.


(चंदगडमधील प्रत्येकी दोन कुपेकर गट व भाजपचा गोपाळराव गट आणि हातकणंगले तालुक्यातील धैर्यशील माने गटाला दिलेल्या दोन जागा या वडगाव नगरपालिकेतील युवक क्रांती आघाडीच्या माध्यमातून रिंंगणात)


महाडिक नावाचे होकायंत्र
या निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक भाजपसोबत आहेत. मुत्सद्दी राजकारणी म्हणून राजकारणातील डावपेच करण्यात आणि काही जागा जिंकून देण्यात ते तरबेज आहेत. त्याचा भाजपला नक्की फायदा होईल; परंतु महाडिक यांच्या राजकारणाबद्दल तिरस्कार असणारा ही वर्ग जिल्ह्यात आहे.
शरद पवार यांना सत्तेचे वारे कोणत्या दिशेने वाहते ते होकायंत्रासारखे लगेच समजते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. तसेच महाडिक यांच्याही राजकारणाचे आहे. यापूर्वी १९९५ ला त्यांनी युतीच्या काळात शिवसेना बळकावली होती. आता त्यांनी भाजप बळकावला आहे. त्याचेही पडसाद उमटणार आहेत.

तीन तालुक्यांत चिन्ह नाही
या निवडणुकीत भाजप करवीर तालुक्यात सर्वाधिक ११, हातकणंगले तालुक्यात ०६, कागलमध्ये सर्व ०५, शिरोळमध्ये ०५, भुदरगड तालुक्यात ०४, राधानगरी व गडहिंग्लजमध्ये प्रत्येकी ०३, पन्हाळ्यात आणि गगनबावड्यात प्रत्येकी अवघी एक अशा ३९ जागा लढवीत आहे.
शाहूवाडी, आजरा आणि चंदगड तालुक्यांत पक्षाचे चिन्हच गोठले आहे; कारण तिथे स्थानिक आघाडीला जागा सोडल्या आहेत.

Web Title: BJP's 'confident' strength of Aamiram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.