उत्तर महाराष्ट्रात भाजपला बंडखोरीची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2019 06:55 AM2019-04-13T06:55:45+5:302019-04-13T06:55:55+5:30

अनिल गोटे, वाकचौरे, कोकाटे, नटावदकरांची बंडखोरी

BJP in Uttar Pradesh faces headache | उत्तर महाराष्ट्रात भाजपला बंडखोरीची डोकेदुखी

उत्तर महाराष्ट्रात भाजपला बंडखोरीची डोकेदुखी

Next

अहमदनगर/जळगाव/ नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील चार मतदारसंघांत भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध बंडखोरांनी शड्डू ठोकला आहे. धुळ्यात भाजप आ. अनिल गोटे यांनी तर नंदुरबारमध्ये डॉ. सुहास नटावदकर यांनी आपले उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. 


शिर्डीत भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्याविरोधात बंडखोरी केली आहे. शिवसेना, काँग्रेस असा प्रवास करून भाजपत आलेले वाकचौरे अपक्ष उमेदवार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस), सदाशिव लोखंडे (शिवसेना) व वाकचौरे (अपक्ष) असा सामना होत आहे.


नंदुरबारमध्ये भाजपचे डॉ. सुहास नटावदकर यांनी त्यांच्याच पक्षाच्या खा. हीना गावित यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. ते म्हणाले, भाजपतील तळागाळातील व जनसंघापासून असलेल्या कार्यकर्त्यांचा आवाज माझ्यासाठी महत्त्वाचा आहे.


धुळ्यात भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. गोटेंच्या उमेदवारीमुळे केंद्रीय मंत्री डॉ.सुभाष भामरे यांची अडचण झाली आहे. नाशिकमध्ये भाजपचे अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांची बंडखोरी आहे. शिवसेनेचे खा. हेमंत गोडसे रिंगणात येथे असून, त्यांना बंडखोरीचा फटका त्यांना बसू शकतो. कोकाटेंवर अपसंपदेचा आरोप असून त्याची चौकशी सुरू आहे. यावर कोकाटे म्हणतात की, सरकार नोटीस देऊन ब्लॅकमेलिंग करीत असल्यानेच निवडणूक लढविणार आहे.



कोण आहेत हे बंडखोर उमेदवार?
अ‍ॅड. कोकाटे यांनी सिन्नर मतदारसंघातून तीन वेळा आमदार म्हणून काम केले आहे. त्यात दोन वेळा कॉँग्रेस, तर एकदा सेनेकडून त्यांनी उमेदवारी केली होती. भाऊसाहेब वाकचौरे हे शिर्डीच्या साई संस्थानचे माजी कार्यकारी अधिकारी असून २००९ मध्ये ते शिवसेनेतर्फे विजयी झाले. पण २०१४ ची निवडणूक काँग्रेसकडून लढवून पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी भाजपत प्रवेश करून श्रीरामपूरमधून विधानसभा लढविली, पण तिथेही पराभूत झाले.

Web Title: BJP in Uttar Pradesh faces headache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.