मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावरील रुळांवर लोखंडी तुकडे आणि स्फोटक पदार्थ ठेवून घातपात घडवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. तर देशभरातील दोन ठिकाणीही घातपात करण्यात आला. यानंतर रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून सुरक्षेचे काही उपाय केले जात असून, यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडूनही खबरदारी घेण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे रेल्वे स्थानक हद्दीत अनधिकृत फेरीवाले व भिकारी यांना हटवण्याची सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार आजपासून तीन दिवस पश्चिम रेल्वेमार्गावर कारवाईसाठी विशेष मोहीम चालवण्यात येत असल्याची माहिती आरपीएफकडून देण्यात आली.
जानेवारी महिन्यात दिवा स्थानकाजवळ तर दिवा-पनवेल मार्गावर लोखंडी वस्तू तसेच स्फोटक पदार्थ ठेवून घातपाताचा प्रयत्न करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यातही पनवेल-जेएनपीटी मार्गावरील जसई रेल्वे स्थानकाजवळील रुळावर लोखंडी खांब आढळला. महत्त्वाची बाब म्हणजे तत्पूर्वी पटणा-इंदोर एक्स्प्रेसचे कानपूर येथे डबे रुळावरून घसरल्याने अनेक प्रवासी जखमी झाले. तर २0१७च्या मार्च महिन्यात भोपाळ-उज्जैन पॅसेंजरमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली. या सर्व घटनांचे गांभीर्य लक्षात घेता पश्चिम रेल्वेकडून रेल्वे रुळांवरील घातपाती कृत्ये टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलिसांकडूनच खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुळांची पाहणी करतानाच गस्त घालण्यात यावी. रुळांना लागून असलेले लोखंडी तुकडेही हटविण्यात यावेत अशी सूचना करतानाच रेल्वे स्थानक व हद्दीत अनधिकृत फेरीवाले, भिकारी यांना हटविण्याची सूचना केली आहे. त्यामुळे विशेष मोहिमेअंतर्गत आरपीएफकडून त्यांना हटविण्यात येणार आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाकडून २१ मार्चपासून तीन दिवस अनधिकृत फेरीवाले आणि भिकाऱ्यांविरोधात कारवाईची मोहीम उघडण्यात येणार आहे. सुरक्षा दलाकडूनही रेल्वेच्या विविध विभागांना पत्र लिहून रुळांची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
घातपात रोखण्यास पोलीस सतर्क -
1मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गांवर लोखंडी वस्तू तसेच स्फोटके सापडल्यानंतर घातपाताची शक्यता रेल्वे पोलिसांकडून वर्तविण्यात आली.
2 त्यानंतर या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नुकतेच राज्याचे पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी मुंबईतील मुख्यालयात एक उच्चस्तरीय बैठक घेतली.
3 या बैठकीला रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम् तसेच शहर पोलीस, अन्य राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
4 रेल्वे हद्दीत होणारे घातपाताचे प्रकार लक्षात घेता तपासकामात अन्य राज्यातील एटीएसच्या (दहशतवादविरोधी पथक) संपर्कात राहण्याच्या सूचना या वेळी सतीश माथुर यांनी उपस्थित पोलिसांना केल्या.
5 सुरक्षेच्या दृष्टीने अनधिकृत गेट्स, रेल्वेचे कंत्राटदार कामगार यांची संपूर्ण माहिती घेणे, रेल्वे पूल, बोगदे यांची
पाहणी करतानाच रुळांवर गस्त घालावी; त्याचप्रमाणे रुळांजवळ असलेले लोखंडी तुकडे व अन्य वस्तू हटविण्यात याव्यात,
अशा सूचनाही करण्यात आल्या.