निवडणुकीवर ‘एआय’चे सावट; पक्षांना फायदा अन् भीतीही; आव्हानांच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सतर्क

By यदू जोशी | Published: March 6, 2024 12:51 PM2024-03-06T12:51:54+5:302024-03-06T12:52:48+5:30

भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात एआयचा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधी डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे आणि मतदार संघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे.

Attack of 'AI' on elections; Both parties gain and fear; The system is alert for the challenges | निवडणुकीवर ‘एआय’चे सावट; पक्षांना फायदा अन् भीतीही; आव्हानांच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सतर्क

निवडणुकीवर ‘एआय’चे सावट; पक्षांना फायदा अन् भीतीही; आव्हानांच्या मुकाबल्यासाठी यंत्रणा सतर्क

यदु जोशी -

मुंबई : कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (एआय) सारे जग ढवळून निघाले असताना आता आगामी लोकसभा निवडणुकीत त्या माध्यमातून आभासी वास्तव आणि आभासी अवास्तव प्रतिमांचा वापर प्रचार व अपप्रचारासाठी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रमुख राजकीय पक्षांच्या आयटी सेलच्या यंत्रणा त्याच्या वापर आणि मुकाबल्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

भाजपच्या अनेक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात एआयचा या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून मतदारसंघातील प्रभावी लोकांच्या याद्या तयार केल्या आहेत. त्यांच्या संबंधी डेटा गोळा करून त्याचे विश्लेषण केले आहे आणि मतदार संघातील या प्रभावी मतदारांशी सातत्याने संपर्कात राहण्यासाठी कार्यकर्त्यांची यंत्रणा कामाला लावली आहे.

...आणि पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलले करुणानिधी 
तमिळनाडूमध्ये गेल्या महिन्यात एक पुस्तक प्रकाशन समारंभ झाला. ज्येष्ठ नेते ८२ वर्षीय टी आर बालू यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्यावेळी स्क्रीनवर दिवंगत नेते के. करुणानिधी आठ मिनिटे बोलले. त्यांनी बालू यांचे कौतुक केले आणि सोबतच आपले पुत्र एम. के. स्टॅलिन यांच्या कारभाराचीही प्रशंसा केली. आवाज देखील करुणानिधी यांचा होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्सने हे शक्य केले. तसाच वापर लोकसभानिवडणूक प्रचारात वेगवेगळे पक्ष करू शकतात.

प्रतिमाभंजनासाठी गैरवापर होण्याची शक्यता 
nखऱ्या आणि एआयने बनविलेल्या प्रतिमांमधील फरक ज्यांना कळत नाही अशा लोकांवर जाहिराती आणि संदेशांचा भडिमार करण्याची योजना राजकीय पक्षांनी आखली आहे. 
nएआय निर्मित दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंचा प्रभाव रोखणे, खोटेपणा उघड करणे असे मोठे आव्हान पक्षांसमोर असेल. आगामी निवडणुकीत एआयचा चांगला वापर होण्यापेक्षा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे.

डेटा गोळा करण्याचे काम सुरू 
फेसबुकवर असलेली एक व्यक्ती राजकीय, सामाजिक स्वरूपाच्या किती पोस्ट टाकते, त्या पोस्टना त्याचे फेसबुक फ्रेंड वा अन्य लोक कसा प्रतिसाद देतात याची माहिती घेऊन ते फ्रेंड आणि त्यांचेही फ्रेंड अशांचा डेटा गोळा करण्याचे काम राजकीय पक्ष आणि विशेषत: भाजप सध्या करीत आहे. त्यातून भाजपच्या विचारसरणीचे कोण, विरोधातील कोण आणि दोन्हींसोबत नाहीत असे किती जण आहेत याची माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठीही एआयचा वापर केला जात आहे. एआय क्षेत्रातील कंपन्यांची सेवा घेतली जात आहे.

एआयचा माहिती जमा करणे, विश्लेषण करणे, लोकांपर्यंत पोहोचणे यासाठी फायदा आहे. मात्र, एआयचा गैरवापर करून बदनामी केली जाऊ शकते. दोन्ही पातळींवर आव्हाने आहेत, त्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे.
- श्वेता शालिनी, प्रदेश भाजप, सोशल मीडिया प्रभारी

एआयचा आगामी निवडणुकीत गैरवापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.  सर्व यंत्रणा हाताशी धरून काँग्रेसवर सोशल मीडियातून हल्ले नक्कीच केले जातील. त्यांचा मुकाबला करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
- विशाल मुत्तेमवार, प्रदेश सरचिटणीस काँग्रेस, सोशल मीडिया प्रभारी
 

Web Title: Attack of 'AI' on elections; Both parties gain and fear; The system is alert for the challenges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.