नांदेड, दि. 13 - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर टीका करताना कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांची जीभ घसरली आहे. नांदेड येथील जाहीर भाषणात निलंगेकरांनी माजी मुख्यमत्री अशोक चव्हाण यांचा रावण असा उल्लेख केला. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. सभेत भाजपा मंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य हे नेहमीचंच झालं आहे का, असा प्रश्न निर्माण झाल आहे. दोन दिवसांपूर्वीच मंत्री बबनराव लोणीकर यांनी परभणीत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

सध्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीची लगबग सुरू आहे. त्यानिमित्ताने कामगारमंत्री संभाजी निलंगेकर हे नांदेडच्या सभेत भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. या व्यासपीठावर शिवसेनेचे लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे देखील उपस्थित होते. यावेळी चिखलीकरांनी भाजपाला मतदान करून विजयी करण्याचं आवाहन केलं आहे.

यावेळी प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेनेतील अनेक आजी-माजी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश केला आहे. याची जाहीर माहिती त्यांनी व्यासपीठावरुन दिली. शिवाय नांदेड महापालिकेत कोणत्याही परिस्थिती भाजपाचाच महापौर झाला पाहिजे, असंही आवाहन त्यांनी केलं.

मी मुख्यमंत्र्यांचा सर्वात लाडका मंत्री : निलंगेकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सर्वात लाडका मंत्री कोणी असेल तर संभाजी पाटील निलंगेकरांचं नाव घेतलं जात, असं स्वतः निलंगेकर यांनी म्हटलं आहे. नांदेडमध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी फेव्हरेट आणि नॉन फेव्हरेट अशा मंत्र्यांची यादी तयार केली आहे का, असा सवाल निलंगेकरांच्या या वक्तव्यामुळे उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी नांदेड महापालिकेची टाकलेली जबाबदारी आपण योग्य पद्धतीने पार पाडू, असंही निलंगेकर म्हणाले.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.