तरुणाईचा कलाविष्कार बहरला

By admin | Published: February 12, 2017 12:20 AM2017-02-12T00:20:44+5:302017-02-12T00:20:44+5:30

उत्साह कायम : शिवाजी विद्यापीठाचा परिसर फुलला-खुलला

The art of youthfulness flourished | तरुणाईचा कलाविष्कार बहरला

तरुणाईचा कलाविष्कार बहरला

Next

कोल्हापूर : टाळ्या-शिट्ट्यांचा गजर, प्रतिसादाची साद, सातत्यपूर्ण जल्लोष, कलेच्या देखण्या सादरीकरणाला उत्स्फूर्तपणे मिळणारी वाहवा अशा जोशपूर्ण वातावरणात ‘शिवोत्सव’ या ३२व्या राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सवाचा दुसरा दिवस रंगला. तरुणाईचा कलाविष्कार फुलला-खुलला आणि विद्यापीठाचा अख्खा परिसर शनिवारी सांस्कृतिक कलेच्या प्रेमात पडला.
देशाच्या विविध भागांतून हजारो मैलांचा प्रवास करून सुमारे १३०० विद्यार्थी कलाकार शिवाजी विद्यापीठात दाखल झाले आहेत. जल्लोषी वातावरण, सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या शोभायात्रेने महोत्सवाचा शुक्रवारी प्रारंभ झाला. महोत्सवातील शनिवारची सकाळ शास्त्रीय सूरवादनाने झाली. प्रश्नमंजूषा, पोस्टर मेकिंगवर एक नजर टाकून युवक-युवतींनी पाश्चिमात्य समूहगायन ऐकण्यासाठी दुपारी लोककला केंद्रात हजेरी लावली. तब्बल दोन तास त्यांना पाश्चिमात्य समूहगीतांच्या सादरीकरणाने उपस्थित तरुणाईला ताल धरायला लावला. काहींनी वक्तृत्वातून ‘स्वच्छ भारत’ची मते जाणून घेतली, तर काहींनी कोलाजमधील पर्यावरण रक्षणाचा संदेश जाणून घेतला. लोककला वाद्यवृंदाचे सादरीकरण पाहण्यासाठी सायंकाळी पाच वाजल्यापासून तरुणाईची पावले लोककला केंद्राकडे वळू लागली. काही वेळातच तरुणाईच्या गर्दीने केंद्र हाऊसफुल्ल झाले. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास गुजरातमधील भावनगरच्या महाराजा कृष्णकुमारसिंहजी विद्यापीठाच्या संघाने लोककला वाद्यवृंदाच्या सादरीकरणाची सुरुवात केली.
पारंपरिक गुजराती वेशभूषेत त्यांनी दमदार सादरीकरण केले. गुवाहाटी विद्यापीठाने आसामच्या लोकसंगीताची सफर घडविली. केरळच्या कालिकत विद्यापीठाने उपस्थितांना नृत्याचा ठेका धरायला लावले. विद्यासागर विद्यापीठाने पश्चिम बंगालची कला-संस्कृती व्यासपीठावर साकारली. गुजरात विद्यापीठाने कार्यक्रमाची रंगत वाढविली. तीन तासांहून अधिक वेळ लोककला वाद्यवृंदाच्या सादरीकरणाने महोत्सवात उत्साह भरला. यात १४ संघ सहभागी झाले होते. दरम्यान, शनिवारी दुपारी काही संघ विद्यापीठात दाखल झाले. यात काश्मीर विद्यापीठ, छत्रपती शाहूजी युनिव्हर्सिटी कानपूर, माखनलाल चतुर्वेदी युनिव्हर्सिटी आॅफ जर्नालिझम अ‍ॅँड कम्युनिकेशन, भोपाळ, आदींचा समावेश होता. ‘शिवोत्सव’मधील सहभागी संघांची संख्या ७९वर पोहोचली आहे. (प्रतिनिधी)


रांगड्या परंपरेचे दर्शन
महोत्सवात शनिवारची सायंकाळ लोककला वाद्यवृंदाने रंगली. यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, मुंबई विद्यापीठांनी महाराष्ट्राच्या रांगड्या परंपरेचे दर्शन घडविले. त्यांनी भूपाळी ते लावणीपर्यंतच्या संगीताचे सादरीकरणाने उपस्थितांना डोलायला लावले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित टाळ्या, शिट्ट्यांच्या गजरात दाद देत होते. काहींना तर नृत्य करण्याचा मोह आवरता आला नाही.

Web Title: The art of youthfulness flourished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.