विषारी मरण आलेल्या 'त्या' 18 शेतक-यांच्या कुटुंबीयांना अखेर 2 लाखांची मदत जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 01:57 PM2017-10-03T13:57:01+5:302017-10-03T14:43:45+5:30

किटकनाशक फवारणीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना अखेर प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत, पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतक-यांना मास्कचं वाटप केलं जाणार

Announcing a relief of Rs. 2 lakh to the families of 'those' 18 farmers who died of poisonous death | विषारी मरण आलेल्या 'त्या' 18 शेतक-यांच्या कुटुंबीयांना अखेर 2 लाखांची मदत जाहीर

विषारी मरण आलेल्या 'त्या' 18 शेतक-यांच्या कुटुंबीयांना अखेर 2 लाखांची मदत जाहीर

Next

मुंबई - किटकनाशक फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात मृत्यूमुखी पडलेल्या शेतक-यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.  शेतातील कापूस पिकावर कीटकनाशकांची फवारणी करता असताना 18 शेतकर्‍यांना विषबाधा झाल्याने त्या शेतकर्‍यांना आपला जीव गमवावा लागला होता. तर 500 हून जास्त शेतक-यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करण्यासाठी शेतक-यांना मास्कचं वाटप केलं जाणार असल्याचा निर्णयही मंत्रीमंडळाने घेतला आहे.

या घटनेवरून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला होता. 18 शेतकऱ्यांचे हे विषारी मरण ना सोशल मीडियातील भक्तांना दिसले ना विदर्भातील मंत्र्यांच्या डोळय़ांच्या कडा त्यामुळे ओलावल्या. त्यांच्या दृष्टीने सगळे काही आलबेल आहे, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून केली होती. 
काय म्हटलं होतं सामना संपादकीयमध्ये-
राजकारण कमालीचे स्वार्थी आणि संवेदनशून्य झाले आहे. एल्फिन्स्टन पुलावरील भयंकर अशा दुर्घटनेनंतरही ‘बुलेट मस्ती’ कमी व्हायला तयार नाही. गरीबांनी कसेही मरावे, त्यांचा जन्म जणू कुत्र्याच्या मौतीने मरण्यासाठीच आहे, आम्ही आमची बुलेट ट्रेनची मस्ती दाखविणारच. एल्फिन्स्टनच्या पुलावर २३ जण नाहक मेले. तसे आता विदर्भात १८ गरीब शेतकरी हे कीटकनाशकाचे बळी ठरले असून अनेक शेतकरी या कीटकनाशकाच्या संसर्गाने मृत्यूशी झुंजत असल्याची बातमी चिंता वाढविणारी आहे. हे सर्व शेतकरी कीटकनाशकाच्या फवारणीचे बळी आहेत. नागपुरात मेट्रो ट्रेनच्या रंगीत तालमीची सुरुवात होत असतानाच व भारतीय जनता पक्षाचे बडे नेते नागपुरात हजर असताना हे शेतकऱ्यांच्या कीटकनाशक मृत्यूचे कांड घडले आहे. सामान्य माणूस किंवा शेतकरी कधी कशाने मरण पावेल याचा भरवसा नाही. कापसावरील बोंड अळी आणि इतर कीटकांचा हल्ला रोखण्यासाठी ‘प्रोफेक्स सुपर आणि पोलो’ अशा अतिविषारी कीटकनाशकाच्या फवारणीने १८ अल्पभूधारक शेतकरी व शेतमजुरांचा गेल्या १५ दिवसांत मृत्यू झाला आहे तर हजारावर शेतकऱ्यांना गंभीर स्वरूपाची विषबाधा झाली आहे. शेतकऱ्यांचे नेते व वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनीच हा स्फोट केला. त्यामुळे ही माहिती सत्यच असणार. किशोर तिवारी यांची नेमणूक भारतीय जनता पक्षाने केली आहे हेसुद्धा इथे खास नमूद करावे लागेल. तिवारी हे शेतकऱ्यांच्या प्रश्नी बोलत असतात, झगडत असतात व त्यांनी आता शेतकऱ्यांचे हे नवे मृत्युकांड बेधडकपणे उघड केले आहे. यवतमाळ जिल्हय़ातील उमरखेड, डिग्रस, दारव्हा, यवतमाळ, केळापूर व वणी अशा भागात कीटकनाशकाचे बळी मोठय़ा प्रमाणावर गेले आहेत. शेतकऱ्यांचे अज्ञान हा एक प्रकार येथे मान्य केला तरी कृषी खात्याची बेपर्वाई या सगळय़ास कितपत जबाबदार आहे याचाही तपास आता करावा लागेल. पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी ‘मोनोक्रोटोफॉस’ हे बंदी असलेले अतिविषारी कीटकनाशक वापरले. या विषाची फवारणी करताना शेतकरीही जायबंदी झाले. त्यांच्या मेंदू, हृदय, फुप्फुसावर परिणाम झाला, किडन्यांवर परिणाम झाला. त्यात १८ जण मरण पावले. हा संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांना ठरवून ठार करण्यासारखाच आहे. कीटकनाशकाची फवारणी शेतकऱ्यांनाही मारत आहे व तेच अन्न लोकांच्या पोटात जात असल्याने जनताही रोज विष खात आहे हे आता नक्की झाले आहे. इतके मोठे कृषी खाते आहे असे म्हणतात, पण शेतकऱ्यांच्या पिकांवर किडीचे आक्रमण होते तेव्हा कोणत्या औषधांची फवारणी करावी, संकटांशी सामना कसा करावा याबाबत काहीच मार्गदर्शन किंवा जागरण नाही. कृषी विद्यापीठे व त्याबाबतचे संशोधन करणाऱ्या संस्था तरी अशा वेळी काय करीत असतात? मुंबईत अहमदाबादवरून बुलेट ट्रेन येईल व नागपुरात मेट्रो ट्रेन तरंगत येईल. म्हणजे ‘‘विकास झाला हो’’ अशी बोंब मारणाऱ्यांनी यवतमाळमध्ये १९ शेतकरी का मेले व हजारावर शेतकरी मरणाच्या दारात कसे उभे आहेत याचा विचार करायला हवा. १८ शेतकऱ्यांचे हे विषारी मरण ना सोशल मीडियातील भक्तांना दिसले ना विदर्भातील मंत्र्यांच्या डोळय़ांच्या कडा त्यामुळे ओलावल्या. त्यांच्या दृष्टीने सगळे काही आलबेल आहे व ‘अच्छे दिन’चे कारंजे थुई थुई नाचत आहेत. कीटकनाशकाची फवारणी करताना शेतकरी मेले ते जणू मूर्खच होते. त्यांनी नागपुरातील मेट्रो रेल्वेच्या फलाटावर जाऊन आनंदाने नाचायला हवे होते. सरकारने आता मृत शेतकऱ्यांना तीन लाख रुपये नुकसानभरपाईची फवारणी जाहीर केली आहे. छान, हत्याकांडानंतर मदत होत आहे. ‘अच्छे दिन’ आल्याची यापेक्षा चांगली घटना ती कोणती! विदर्भात कीटकनाशक कांड झाले आहे. त्यात १८ शेतकऱ्यांचे बळी गेले आहेत. सरकार कुठे आहे?
 

Web Title: Announcing a relief of Rs. 2 lakh to the families of 'those' 18 farmers who died of poisonous death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.