दिल्ली पाठोपाठ 'पुणे' सर्वाधिक प्रदूषित शहर....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2018 07:04 PM2018-09-04T19:04:01+5:302018-09-04T19:14:26+5:30

देशातील प्रमुख महानगरांच्या यादीत दिल्ली नंतर सर्वाधिक प्रदूषण पुण्यात होत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे.

After Delhi Pune is the most polluted city in India | दिल्ली पाठोपाठ 'पुणे' सर्वाधिक प्रदूषित शहर....

दिल्ली पाठोपाठ 'पुणे' सर्वाधिक प्रदूषित शहर....

ठळक मुद्देदिल्ली पाठोपाठ पुणे सर्वाधिक प्रदूषित शहरमाहितीच्या अधिकारात धक्कादायक  बाब उघड

पुणे : देशातील प्रमुख महानगरांच्या यादीत दिल्ली नंतर सर्वाधिक प्रदूषण पुण्यात होत असल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. वायू प्रदूषण हि आपल्या देशाच्या महानगरातील प्रमुख समस्या आहे. वायू प्रदुषणासाठी अनेक गोष्टी कारणीभूत आहे. यामधून अनेक घातक वायू बाहेर पडतात त्या अनेक घटकांपैकी एक महत्वाचा घटक  नायट्रोजन डाय ओक्ससाईड (NO2) हा वायू सर्वात विघातक मानला जातो. वायू प्रदूषण मोजताना नायट्रोजन डायओक्ससाईड चे त्या हवेत प्रमाण किती आहे त्यावरून ती हवा किती प्रदूषित आहे हे समजते.

        सन २०१० ते २०१७ या कालावधीत देशात नायट्रोजन डायओक्ससाईड ची म्हणजे “नॉक्स लेवल” चे प्रमाण देशाच्या प्रमुख महानगरात किती आहे याची माहिती पुण्यातील प्रसिद्ध माहिती अधिकार कार्यकर्ते सीए.आदित्य राठी यांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्डाकडे  माहितीच्या अधिकारात मागितली  होती. त्यामध्ये जी माहिती त्यांना प्राप्त झाली त्याचा अभ्यास करून दिल्ली शहरात हवेत नायट्रोजन डायओक्ससाईड चे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सिद्ध झाले. दिल्ली खालोखाल पुणे शहरात या कालावधीमध्ये सर्वाधिक नायट्रोजन डायओक्ससाईड चे प्रमाण आढळल्याचे मिळालेल्या माहितीतून सिद्ध झाले.

      राष्ट्रीय वायू गुणवत्ता मानकानुसार सरासरी वार्षिक एक शहरामध्ये हे प्रमाण ४० मायक्रोग्रॅम क्युबिक मीटर पेक्षा जास्त असता काम नये पण दिल्ली आणि पुण्यात हे प्रमाण दुपटीने आढळून आल्याचे माहितीच्या अधिकारात समोर आले आहे. जर आपल्या हवेत नायट्रोजन डायओक्ससाईड या वायूचे प्रमाण दुपटीने असेल तर नक्कीच हि आपल्या शहरासाठी धोकादायक बाब असल्याचे आदित्य राठी यांनी नमूद केले. काही दिवसापूर्वीच केंदीय गृहनिर्माण आणि शहर मंत्रालयाने देशात राहण्यासाठी योग्य अश्या १११ शहराची यादी प्रसिद्ध केली होती त्यात प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून पुण्याचे नाव पुढे आले होते. ज्या शहरात वायू प्रदूषण सर्वाधीक असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड होत असेल तर ते शहर राहण्यासाठी उत्तम शहर कसे असू शकते ? असा सवाल राठी यांनी उपस्थित केला आहे.

       दिवसेंदिवस वाढत जाणारे औद्द्योगीकरण, इमारतींसाठी मोठ्या प्रमाणावर होणारी झाडांची कत्तल आणि वाढत जाणारी वाहनांची संख्या या वायू पृदुषणाला जबाबदार असल्याचे राठी यांनी सांगितले. आपण जर वेळीच या गोष्टींवर आळा घातला नाही तर पुण्यातील हे वायू प्रदूषण वाढत जाईल आणि लवकरच आपण दिल्ली शहराला मागे टाकून सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून देशात प्रथम क्रमांकावर जाऊ शकतो अशी भीती राठी यांनी व्यक्त केली आहे. एकेकाळी सायकलींचे शहर असे बिरुद मिरविणारे आपल्या पुणेकरांना  भविष्यात सर्वाधिक प्रदूषित शहर असे हिनवले जाऊ नये हीच माझी ईच्छा आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे असे राठी सांगितले.

Web Title: After Delhi Pune is the most polluted city in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.