लातूर जिल्ह्यात भीषण अपघात; पाच वऱ्हाड्यांचा मृत्यू, सहा गंभीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:13 AM2019-05-06T00:13:56+5:302019-05-06T00:17:31+5:30

लातूर  जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावरील चेरापाटीनजीक रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला.

accidents in Latur district; 5 death & 6 injured | लातूर जिल्ह्यात भीषण अपघात; पाच वऱ्हाड्यांचा मृत्यू, सहा गंभीर 

लातूर जिल्ह्यात भीषण अपघात; पाच वऱ्हाड्यांचा मृत्यू, सहा गंभीर 

लातूर - लातूर  जिल्ह्यातील शिरुर ताजबंद ते मुखेड राज्य महामार्गावरील चेरापाटीनजीक रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. यामध्ये पाच वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात रात्री उपचार करून उदगीर येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

जळकोट तालुक्यातील धामणगाव येथील सोनकांबळे कुटुंबीय अहमदपूर तालुक्यातील विळेगाव येथे लग्नसोहळ्यासाठी एका जीपने गेले होते. लग्नसोहळा आटोपून धामणगाव येथे येत असताना जामकडून शिरुर ताजबंदच्या दिशेने जाणा-या टेम्पोची समोरासमोर जोराची धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये जीपमधील पाच वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. मयत व-हाडीमध्ये ज्ञानोबा सोनकांबळे (४०), अरविंद सोनकांबळे (३०), पुष्पा सोनकांबळे (४५), कांताबाई सोनकांबळे (५५), छकुली सोनकांबळे (६) यांचा समावेश आहे. तर गंभीर जखमींमध्ये आरोसी सोनकांबळे, दिनेश सोनकांबळे, बळीराम सोनकांबळे, सुनीता सोनकांबळे, रितेश सोनकांबळे, प्राची सोनकांबळे (सर्व रा. धामणगाव) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच जळकोट, चेरा आणि परिसरातील गावक-यांनी घटनास्थळी धाव घेतली. तातडीने जखमींना जळकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी उदगीर येथे पाठवून दिले. अपघातामुळे शिरुर ताजबंद-मुखेड मार्गावर दोन कि.मी.पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. 

चिमुकली बचावली...
जीपमधील व-हाडींमध्ये एक वर्षाची प्राची अरविंद सोनकांबळे ही होती. दरम्यान, टेम्पो आणि जीपचा भीषण अपघात झाला. यावेळी चिमुकली जीपमधून बाहेर फेकली गेली. त्यामुळे ती जखमी झाली असून बालंबाल बचावली आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यामध्ये जीपचा चक्काचूर झाला आहे.

Web Title: accidents in Latur district; 5 death & 6 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.