वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 08:08 AM2024-04-26T08:08:26+5:302024-04-26T08:09:01+5:30

२०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी इगतपुरीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. 

82 lakh vehicles have travelled on Samruddhi Highway in the last 16 months and 6 lakh 76 thousand vehicles ply every month | वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट

वाढता वाढता वाढे; ‘समृद्धी’वरील वाहतूक; दरमहा तब्बल ६ लाख ७६ हजार वाहने धावतात सुसाट

मुंबई : नागपूर ते मुंबई या दोन शहरांमधील अंतर कमी करणाऱ्या समृद्धी महामार्गाने वेगवान वाहतुकीचे नवे विक्रम स्थापित केले आहेत. उद्घाटनानंतर गेल्या १६ महिन्यांत या महामार्गावरून ८२ लाख वाहनांनी प्रवास केला असून दरमहा ६ लाख ७६ हजार वाहने (दररोज सरासरी २० ते २५ हजार) या महामार्गावरून धावत आहेत. त्यातून या प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) तिजोरीत ६३१ कोटींचा महसूल जमा झाला आहे.

नागपूर-मुंबई या ७०१ किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाचा ६२५ किमी लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते डिसेंबर, २०२२ मध्ये नागपूर ते शिर्डी या ५२० किमीच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाले होते. त्यानंतर गेल्या वर्षी इगतपुरीपर्यंतचा प्रवास सुरू झाला. 

वाढत्या वाहतुकीचा चढता आलेख
डिसेंबर, २०२२ मध्ये उद्घाटनानंतर दरमहा २ लाख २० हजार वाहनांनी या शीघ्रसंचार द्रुतगती मार्गाचा लाभ घेतला. त्यातून सरकारच्या तिजोरीत १३ कोटी १७ लाख रुपयांचा महसूल जमा झाला होता. ऑगस्ट, २०२३ मध्ये दरमहा ५ लाख वाहनांनी या महामार्गावरुन प्रवास केला. 
डिसेंबर २०२३ मध्ये पहिल्यांदा या मार्गावरून वाहनांनी ७ लाखांचा टप्पा ओलांडत एकूण ७ लाख ४० हजार वाहनांनी प्रवास केला.मार्च, २०२४ मध्ये दरमहा सुमारे ६ लाख ७६ हजार वाहनांनी प्रवास केला. यातून ‘एमएसआरडीसी’च्या तिजोरीत ५४ कोटी ३८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला.

मुंबई जोडणीनंतर...
सद्य:स्थितीत या महामार्गाची मुंबईला जोडणी नसल्याने अपेक्षित प्रवासी वाहतुकीत वाढ झाली नाही. मात्र, मुंबईशी जोडणी मिळाल्यानंतर वाहतुकीत वाढ होईल, असा यंत्रणांचा दावा आहे. तसेच मुंबई आणि नागपूर हे प्रवासाचे अंतर जवळ आल्याने शेतमालाची वाहतूक वाढेल, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गालगतच्या परिसरात उद्योगधंद्यांच्या वाढीला चालना मिळण्यासाठी आणखी काही वर्षांचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असे ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

Web Title: 82 lakh vehicles have travelled on Samruddhi Highway in the last 16 months and 6 lakh 76 thousand vehicles ply every month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.