६८ कोटींच्या शिष्यवृत्तीवर संस्थाचालकांचा डल्ला !

By admin | Published: February 8, 2015 02:53 AM2015-02-08T02:53:20+5:302015-02-08T02:53:20+5:30

सुमारे ६८ कोटी रुपयांवर संस्थाचालक, आदिवासी विकास विभाग आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करीत डल्ला मारल्याचे उघड झाले आहे़

68 crore scholarship scam | ६८ कोटींच्या शिष्यवृत्तीवर संस्थाचालकांचा डल्ला !

६८ कोटींच्या शिष्यवृत्तीवर संस्थाचालकांचा डल्ला !

Next

बोगस विद्यार्थी : संस्थाचालक, आदिवासी विकास विभागाचे संगनमत
अभिनय खोपडे - गडचिरोली
अभ्यासक्रमांना परवानगी नसताना बोगस विद्यार्थीसंख्या दाखवून केंद्र सरकारच्या सुमारे ६८ कोटी रुपयांवर संस्थाचालक, आदिवासी विकास विभाग आणि समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करीत डल्ला मारल्याचे उघड झाले आहे़ बनावट कागदपत्रांच्या आधारे विद्यार्थ्यांच्या नावावर बँक खाते उघडून त्यात ही रक्कम वळती केल्याचे स्पष्ट झाले आहे़ राज्यातील १५ आदिवासी विकास प्रकल्पांसह १३ जिल्ह्यांमध्ये समाजकल्याण विभाग, आदिवासी विकास विभागात मागील तीन वर्षांत हा अपहार झाला आहे.
गडचिरोलीतील राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडळातर्फे सुरू केलेल्या एक वर्ष कालावधीच्या अल्प मुदत अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी केलेली नसताना तसेच एकाही अभ्यास केंद्राला परवानगी दिलेली नसतानाही २०१३-१४ या सत्रात ९ हजार २०७ विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या मॅट्रिकोत्तरशिष्यवृत्तीचे ३४ हजार २०५ रुपये प्रमाणे ३१ कोटी ४९ लाख २५ हजार ४३५ रुपयांचे वाटप करण्यात आल्याचे उजेडात आले आहे.
वर्धा येथे १९३६ मध्ये राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडळाची स्थापना झाली. या मंडळामार्फत राज्यात २५२ प्रशिक्षण केंद्रे सुरू आहेत. ज्ञानमंडळांतर्गत चालणाऱ्या अभ्यासक्रमांना युजीसीच्या मान्यतेसह अनुदानही मिळते. २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात या मंडळाला दिल्लीच्या दूरस्थ शिक्षण संस्थेतर्फे नियमित मान्यता उशिरा मिळाली़ परिणामी एकाही अभ्यास केंद्रात विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नाही़ तसेच केंद्रांनाही परवानगी दिली नसल्याचे राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडळाचे संचालक दीपक दळवी यांनी २७ जानेवारी २०१५ रोजी गडचिरोली पोलिसांना दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. असे असताना राज्यात १३ सहाय्यक आयुुक्त समाज कल्याण व १५ आदिवासी प्रकल्प कार्यालये अशा २८ कार्यालयांनी प्रवेश नसतानाही केंद्र सरकारची मॅट्रिकोतर शिष्यवृत्ती वाटप केली कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बहुतांश शिक्षण संस्था
चालकांनी विद्यार्थ्यांऐवजी संस्थेच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम
जमा केल्याचे आढळून आले
आहे. राज्यभरात २५२ ठिकाणी असा प्रकार झाला असल्याचा अंदाज गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आहे़

धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, हिंगोली, बुलडाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाच्या २८ कार्यालयांमधून १५ हजार ६३९ विद्यार्थ्यांपैकी ९ हजार २०७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे.

चामोर्शी येथील राहुलभाऊ बोम्मावार कॉलेज आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीच्या कार्यालयात पोलिसांना चामोर्शी तहसीलदार, सावली तहसीलदार, तलाठी कार्यालय भेंडाळा व दुय्यम निबंधक कार्यालय चामोर्शी यांचे रबरी शिक्के सापडले. नागभिड येथील तहसीलदाराच्या शिक्क्याद्वारे १०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे बनावट जात प्रमाणपत्र बनविल्याची माहितीही पोलीस तपासात उघड झाली आहे.

दोन विद्यार्थ्यांचे एकच बँक खाते... चामोर्शीच्या तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयाने चेतन हरिदास मंगाम आणि धनराज दिवाकर वट्टे या दोन विद्यार्थ्यांना आयडीबीआय बँकेचा एकच खातेक्रमांक देण्यात आला़ मात्र त्यावर शिष्यवृत्तीची रक्कम वर्ग केली नाही़

गरीब आदिवासी व अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती संस्थाचालकांनी लाटल्याचा हा गंभीर प्रकार आहे. याची सीबीआयमार्फत चौकशीची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 
- प्रकाश ताकसांडे, सामाजिक कार्यकर्ते, गडचिरोली

गडचिरोलीत संपूर्ण शिष्यवृत्ती घोटाळा १५ कोटींवर आहे. राज्यात २६२ ठिकाणी राष्ट्रभाषा प्रचार ज्ञान मंडळाच्या अभ्यास केंद्रांची चौकशी केली, तर ही रक्कम काही कोटींच्या घरात जाईल़
- रवींद्र पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली

Web Title: 68 crore scholarship scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.