मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 06:35 PM2023-12-25T18:35:26+5:302023-12-25T18:37:54+5:30

कमलनाथ सरकार पडल्यानंतर शिवराज सरकारमध्ये ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचे ११ मंत्री होते

madhya pradesh mp mohan yadav cabinet expansion setback jyotiraditya scindia 4 supporters ministers | मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री

मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पचा प्रभाव घटला; नव्या सरकारमध्ये मागच्या वेळेपेक्षा कमी मंत्री

Madhya Pradesh Jyotiraditya Scindia : मध्य प्रदेशात भाजपाचा विजय झाला, नवे सरकार स्थापन झाले. आता दोन आठवड्यांनी आज मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. राज्यपाल मंगूभाई पटेल यांनी मोहन सरकारच्या मंत्रिमंडळातील २८ नेत्यांना पदाची शपथ दिली, ज्यामध्ये १८ कॅबिनेट मंत्री, ४ राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या सहा राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. मध्य प्रदेशातील अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नसले तरी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेल्या ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पकडेही फारसे लक्ष देण्यात आलेले दिसत नाही अशी चर्चा आहे.

२०२० मध्ये, कमलनाथ सरकार पडल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांचे सरकार स्थापन झाले तेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या जवळच्या ११ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. मात्र यावेळी सिंधिया गटाचा मंत्रिमंडळात फारसा प्रभाव दिसत नाहीये. नव्या मोहन सरकारमध्ये शिंदे यांच्या जवळच्या केवळ चार नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. शिवराज सरकारमध्ये मात्र 35 टक्के मंत्री त्यांच्या कोट्यातील होते. मोहन यादव यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारमध्ये ज्या 28 मंत्र्यांची शपथ घेण्यात आली आहे, त्यापैकी फक्त चार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कॅम्पमधील आहेत. प्रद्युम्न सिंग तोमर, तुलसी सिलावत, गोविंद सिंग राजपूत आणि अदल सिंग कसाना हे ते चार मंत्री आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे यंदा झालेल्या निवडणुकीत ज्योतिरादित्य शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या केवळ आठ माजी मंत्र्यांना विधानसभा निवडणुकीत विजयी होता आले, तर तीन माजी मंत्र्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. याशिवाय शिंदे कॅम्पमधील सहा जण आमदार होण्यात यशस्वी झाले. शिंदे कॅम्पचे समर्थक माजी मंत्री प्रद्युम्न सिंग तोमर, तुलसी सिलावत, डॉ. प्रभुराम चौधरी, गोविंद सिंग राजपूत, बिसाहू लाल साहू, हरदीप सिंग डांग, ब्रिजेंद्र सिंह यादव यांना विजय मिळवता आला. तर माजी मंत्री राजवर्धन सिंह दात्तीगाव, महेंद्रसिंग सिसोदिया आणि सुरेश धाकड यांना पराभवाला सामोरे जावे लागले. शिंदे समर्थकांना जिंकलेल्या माजी मंत्र्यांपैकी फक्त तीन जणांना मंत्री करण्यात आले आहे. अशाप्रकारे मंत्रिमंडळ विस्तार हा ज्योतिरादित्य शिंदे यांना राजकीयदृष्ट्या मोठा धक्का मानला जात आहे.

Web Title: madhya pradesh mp mohan yadav cabinet expansion setback jyotiraditya scindia 4 supporters ministers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.