उदगीर : उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत सिनसिनाटी विद्यापीठात ऑगस्ट मध्ये प्रवेश घेतलेल्या सुनील बालाजी बिरादार ( २६ ) याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना मंगळवारी घडली असून आज सकाळी सुनीलचे वडील बालाजी बिरादार यांना अमेरीकेतून फोन आल्यानंतर याबाबत कळाले.

सुनील हा मूळ उदगीरचा रहिवासी आहे. त्याचे वडील बालाजी बिरादार यांची उदगीर तालुक्यातील हैबतपूर येथे शेती आहे. त्यांचा शेती हाच मुख्य व्यवसाय असुन मुलांच्या शिक्षणासाठी ते कापड मार्केट येथे घर करून राहतात. दोन मुले व एक मुलगी असलेल्या बिरादार यांनी मुलांना मोठया मेहनतीने शिक्षण शिकवले आहे.सुनील याचे मेकॅनिकल मध्ये अभियांत्रीकीचे शिक्षण सिंहगड विद्यापीठ, पूणे येथे झाले आहे. त्याने ८ वी पर्यंत चे शिक्षण उदगीर येथे तर  त्यानंतर १२ वीपर्यंतचे शिक्षण हैद्राबाद येथे घेतले होते. ५ ऑगस्ट रोजी तो भारतातून तो अमेरीकेत गेला होता. तीनच महीन्यात त्याच्या बाबतीत ही दुर्देवी घटना घडली.घटनेची माहिती मिळताच बिरादार यांच्या घराकडे लोकांची रीघ लागली आहे. 

बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनीलशी ते शुक्रवारी ( २७ आक्टोबर ) शेवटचे बोले होते, तेव्हा तो मित्रांमुळे टेंशन मध्ये होता तसे त्याने बोलून दाखवले होते. यावेळी मी त्याला परत भारतात बोलावले होते. 

मृतदेह भारतात आणण्याचे प्रयत्न सुरु 
जिप सदस्य प्रताप शिवशिवे यांच्यासह काही नागरिकांनी पालक मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट घेऊन त्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी त्यांनी ताबडतोब दिल्ली येथे परराष्ट्र मंत्रालयात फोन लाऊन सुनीलचा मृतदेह लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी पाठपुरावा केला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.