New Pudge: Haldi - Kunku For vidhava women | नवा पायंडा : हळदी- कुंकवासाठी विधवा महिलांनाही दिला मान
नवा पायंडा : हळदी- कुंकवासाठी विधवा महिलांनाही दिला मान

 - माधव शिंदे 
लातूर - हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथील महिलांनी ही जूनी प्रथा मोडित काढली आहे. मकर संक्रातीनिमित्तच्या हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरु केला आहे.
आनंदवाडी (गौर) येथील विठ्ठल मंदिरात मकर संक्रातीनिमित्त हळदी- कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ या कार्यक्रमासाठी आनंदवाडी व गौर या दोन्ही गावातील सुवासिनींसह विधवा महिलांना बोलाविण्यात आले होते़ उपस्थित महिलांनी एकमेकांना तीळगुळ देऊन गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या़ त्याचबरोबर उर्वरित आयुष्य एकमेकींसोबत राहून एकमेकींना सामाजिक आधार देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी ग्रामविकास संकल्पनेतून गावातच निर्माण केलेले  केमिकल विरहित होळीचे रंग व दंतमंजन वाण म्हणून भेट देण्यात आले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शोभा कासले होत्या़ यावेळी आशाताई सनगले, रुक्मिणबाई सगर, विजयमाला पगडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी राधिका चामे, सुवर्णा चामे, संगीता चवरे, अयोध्या चामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ विधवाचे जीवन कोणाच्या वाट्याला येईल, हे सांगता येत नाही़ मग या महिला कुठल्या आधारावर जगायच्या हा मोठा प्रश्न आहे़ आता यापुढे आपण सर्वजण एकमेकींच्या सुख- दु:खात सहभागी होत सहकार्य करु, असे मनोगतात महिलांनी सांगितले.
प्रास्ताविक तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा मीरा सगर यांनी तर सूत्रसंचालन गयाताई सोनटक्के यांनी केले. आभार वर्षा चवरे यांनी  मानले़ यशस्वीतेसाठी कमलताई चवरे, माया चवरे यांच्यासह गावातील महिलांनी परिश्रम घेतले. 
आता महिलांमध्ये होणार नाही भेदभाव
यावेळी महिलांनी सर्वानुमते चार ठराव मंजूर केले़ त्यात गावातील विधवा महिलांबाबत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही़ गावातील प्रत्येक शुभकार्यात समान संधी देण्यात येईल़ तसेच त्यांना योग्य त्या स्वरुपात आधार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि त्यासाठी आम्ही वचनबध्द राहणार आहोत़ जर कुणावरही घरगुती अत्याचार होत असतील तर  तिच्या पाठीशी गावातील सर्व महिला शक्ती उभी राहील, असे ठराव मंजूर करण्यात आले़


Web Title: New Pudge: Haldi - Kunku For vidhava women
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.