हॉटेलमध्ये काम करुन बनविला चित्रपट; वाचा लोहारा येथील युवकाच्या 'स्ट्रगल'ची कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 05:01 PM2019-03-02T17:01:00+5:302019-03-02T17:06:27+5:30

‘जिवाची मुंबई’ करण्यासाठी गाव सोडलेल्या लोहाऱ्याच्या सोमनाथ लोहारने अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रात आपला ‘लोहा’ मनविला आहे.

The movie made in hotel work | हॉटेलमध्ये काम करुन बनविला चित्रपट; वाचा लोहारा येथील युवकाच्या 'स्ट्रगल'ची कहाणी

हॉटेलमध्ये काम करुन बनविला चित्रपट; वाचा लोहारा येथील युवकाच्या 'स्ट्रगल'ची कहाणी

googlenewsNext

- बालाजी बिराजदार 

लोहारा (उस्मानाबाद): हलाखीची परिस्थिती, वडिलांचे छत्र लहानपणीच हरवले़ले, पोट भरण्याचे वांधे अशा अनंत अडचणीवर मात करीत ‘जिवाची मुंबई’ करण्यासाठी गाव सोडलेल्या लोहाऱ्याच्या सोमनाथ लोहारने अभिनय व दिग्दर्शन क्षेत्रात आपला ‘लोहा’ मनविला आहे. हॉटेलमध्ये काम करुन आवड जपणाऱ्या सोमनाथने ‘इडियट बॉक्स’वर छाप पाडल्यानंतर स्वत:च चित्रपटाची निर्मिती करीत सिनेसृष्टीत पाऊल टाकले आहे़ 

उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहाऱ्यासारख्या छोट्या शहरातील सोमनाथ लोहारची जिद्द त्याला यशोशिखरावर घेऊन जात आहे़ लोहारकीच्या व्यवसायातून जेमतेम मिळणाऱ्या उत्पन्नावर त्याचे घर चालायचे़ तो दहा वर्षांचा असतानाच वडिलांचे छत्र हरपले़ यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला़ त्यामुळे त्याने मुंबई गाठून हॉटेलात काम सुरु केले़ सोबतच शिक्षणही घेतले़ अभिनयाची आवड असलेल्या सोमनाथने ओळखी वाढवून सुरुवातीला मालिकांमध्ये काम मिळविले अन् नंतर आता नुकताच स्वत:चे दिग्दर्शन व अभिनय असलेला ‘जिवा-शिवा’ चित्रपट काढून सिनेसृष्टीतही जम बसविण्यास त्याने सुरुवात केली आहे़ या पार्श्वभूमीवर त्याच्याशी केलेली ही बातचित़

वेगळं करण्याच्या जिद्दीने मायानगरीत़़
परिस्थितीशी दोन हात करीत असतानाच आपल्या मनात मायानगरीबद्दल कुतूहल होते़ येथे चालणारे काम पाहण्याची संधी मिळाल्यानंतर आपल्यात या क्षेत्रात जम बसविण्याची जिद्द निर्माण झाली़ यातूनच ह्या क्षेत्राकडे वळलो़ सुदैैवाने कामे मिळत गेली अन् नावही होत गेले़

पहिल्या ब्रेकसाठी मोठा संघर्ष़
मला पहिला ब्रेक हा पुजा नायर या दिग्दर्शिकेने ‘स्वप्नाच्या पलीकडे’ या मालिकेतून दिला़ त्यानंर त्यांनीच ‘लक्ष्य’ या क्राईम स्टोरीमध्येही संधी दिली़ यानंतर सुमारे बारा मालिकांमधून प्रेक्षकांसमोर येण्याची संधी मिळाली़ यासाठी खुप संपर्ष करावा लागला़ हे शब्दात मांडणे कठीण आहे़ विविध मालिकांमध्ये काम केल्यानंतर स्वत:चा चित्रपट काढला तरी संघर्ष थांबत नाही़ तो आपण थांबेपर्यंत तरी नाहीच़ अजून अनेक टप्पे पार करायचे आहेत़

अभिनय माझी पहिली पसंती
अभिनयातून दिग्दर्शनात आलो असलो तरी माझी पहिली पसंती ही अभिनयच आहे़ किशोर चौगुले हा माझा आवडता अभिनेता आहे़ तो ज्या पद्धतीने सतत वेगवेगळ्या भूमिकांतून समोर येतो, ते कौतुकास्पदच आहे़ तोच माझी प्रेरणा आहे़ अभिनय आणि दिग्दर्शन अशा दोन्ही पातळीवर संधी मिळेल तसे छाप सोडण्याचा प्रयत्न राहील़

मायभूमीला ओळख देण्याचा प्रयत्न
ज्या मायभूमीत जन्मलो, वाढलो त्या लोहाऱ्यास एक वेगळी ओळख मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे़ मुंबईच्या या मायानगरीत लोहाऱ्याचा नावलौकिक करण्याचा मानस असून, गावासाठी जे काही विधायक करता येईल, ते पुढील काळात करण्याचाही माझा प्रयत्न असणार आहे़

Web Title: The movie made in hotel work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.