Killari Earthquake : घरे उभारली; आठवणींच्या वेदना कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2018 04:11 AM2018-09-30T04:11:18+5:302018-09-30T11:26:27+5:30

Killari Earthquake : भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने

Killari earthquake: houses built; Memories persist in pain | Killari Earthquake : घरे उभारली; आठवणींच्या वेदना कायम

Killari Earthquake : घरे उभारली; आठवणींच्या वेदना कायम

googlenewsNext

आशपाक पठाण
लातूर : भूकंपानंतर शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हजारो घरे उभारण्यात आली. भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगताहेत...

भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५२ गावे जमीनदोस्त झाली. यात लातूर जिल्ह्यातील ९ हजार ७४८ जणांनी प्राण गमावले. ३० हजारांवर लोक जखमी झाले. डोळ्यांदेखत ढिगाºयाखाली दबलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या किंकाळ्या अजूनही हृदय पिळवटून टाकतात. अनाथ झालेल्या १२८ मुलांना जीवन जगत असताना पदोपदी आपल्या कुटुंबाच्या आठवणींनी गहिवरून येते. ३० सप्टेंबर १९९३ च्या घटनेची माहिती काही क्षणात जगभर पसरली. मदतीचे लाखो हात किल्लारीच्या दिशेने धावले. जागोजागी जमीनदोस्त झालेली घरे, भिंतीखाली दबलेली माणसे, जखमांमुळे विव्हळत असलेले लोक, कोणी मुलांसाठी तर कोणी आपल्या आईसाठी टाहो करीत होते. प्रत्यक्षात ही सर्व घटना डोळ्यांत टिपणारी भूकंपग्रस्त गावातील माणसे आजही ‘त्या’ वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. 
मूळ जमीनधारकांना हवा भूखंड़

भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने जुन्या गावाच्या नजिक, शेत शिवाराच्या जवळ असलेली खडकाळ जमीन शोधली. भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने काळ्या जमिनीपासून दूरच्या अंतरावर पुनर्वसन झाले. त्यावेळी ज्यांनी पुनर्वसनासाठी स्वत:च्या जमिनी दिल्या, त्यांना त्यावेळी तुटपुंजा मावेजा मिळाला. आता कायद्याने वाढीव मावेजा मिळणे शक्य नाही. त्यासाठी जमीनदात्या शेतकºयांचे संघटन झाले असून, त्या सर्वांनी मिळून आम्हाला पुनर्वसित गावांमध्ये किमान खुला प्लॉट अथवा आठव्या व नवव्या फेरीतील घर द्यावे, अशी मागणी केली आहे. त्याचा शासनस्तरावर अजूनही विचार झालेला नाही. उमरगा तालुक्यातील १० गावांसाठी २६३़२२ हेक्टर्स तर लोहारा तालुक्यातील १९ गावांच्या पुनर्वसनासाठी ४१९़१८ हेक्टर्स अशी एकूण ६८३ हेक्टर्स जमीन संपादित झाली होती. 

५२ गावांत हजारो घरे झाली होती जमीनदोस्त... 
भूकंपाला २५ वर्षे पूर्ण झाली. घटनेनंतर महाराष्ट्र शासनासह अनेकांनी मदतीचा हात दिला. औसा, उमरगा, लोहारा तालुक्यांतील ५२ गावे जमीनदोस्त झाल्यावर प्रशासनाने त्यांना मदतीचा हात देत घरे उभारून दिली. भूकंपाचा पुन्हा प्रकोप होऊ नये, यासाठी आधुनिक पद्धतीने घरांची उभारणी करण्यात आली.  देश-विदेशातून धावून आलेले मदतीचे हात आजही भूकंपग्रस्तांच्या हृदयात घर करून आहेत. मात्र काही गावांमध्ये घरांच्या बांधकाम दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २५ वर्षांतच अनेकांची घरे खिळखिळी झाली आहेत.

Web Title: Killari earthquake: houses built; Memories persist in pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.