इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नपत्रिका, बोर्डाचे ‘गणित’ बिघडले : विद्यार्थी दोन तास ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 06:16 PM2019-03-11T18:16:30+5:302019-03-11T18:17:41+5:30

शहरातील महात्मा फुले विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र असून या केंद्रावर सोमवारी गणित भाग १ (बीजगणित) पेपर होता.

English medium students get question Marathi papers, board 'math' failed: students wait for two hours in latur SSC exam | इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नपत्रिका, बोर्डाचे ‘गणित’ बिघडले : विद्यार्थी दोन तास ताटकळले

इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी प्रश्नपत्रिका, बोर्डाचे ‘गणित’ बिघडले : विद्यार्थी दोन तास ताटकळले

googlenewsNext

अहमदपूर (जि. लातूर) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या दहावी परीक्षा केंद्रावर गणित भाग १ (बीजगणित) विषयाच्या इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकाऐवजी मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका आल्यामुळे विद्यार्थ्यांना दोन तास ताटकळत राहावे लागले. बोर्डाच्या अनागोंदी कारभारामुळे हा प्रकार झाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शहरातील महात्मा फुले विद्यालयात दहावीचे परीक्षा केंद्र असून या केंद्रावर सोमवारी गणित भाग १ (बीजगणित) पेपर होता. परीक्षा केंद्रावर इंग्रजी माध्यमाचे २९३, मराठी माध्यमाचे २८९ व उर्दू माध्यमाचे २२ असे एकूण ६०४ परीक्षार्थी होते. विद्यार्थ्यांना साडेदहा वाजता परीक्षा दालनात प्रवेश देण्यात आला. मात्र १० वाजून ४० मिनिटांनी सदरील सीलबंद प्रश्नपत्रिका संचालकांनी उघडली असता इंग्रजी माध्यमाच्या सीलबंद लिफाफ्यात मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका असल्याचे लक्षात आले. सदरील प्रश्नपत्रिकेच्या पाकिटावरच्या अ आणि ब लिस्टवरही इंग्रजीचा उल्लेख होता. मात्र आत मराठी माध्यमाच्या ३०० प्रश्नपत्रिका मिळाल्यामुळे गोंधळ वाढला. इंग्रजी माध्यमाच्या केवळ ४० प्रश्नपत्रिका होत्या. ही बाब लक्षात येताच केंद्र संचालकांनी परिरक्षक आर.पी. चव्हाण  व गटशिक्षणाधिकारी बी.एम. डोकाडे यांना कल्पना दिली. संबंधितांनी परीक्षा मंडळाकडे दूरध्वनीवरून झालेला प्रकार सांगितला. स्थानिक केंद्रावरून प्रश्नपत्रिका मिळविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र प्रश्नपत्रिका अपुºया असल्याने बोर्डाकडून १२.४५ मिनिटांनी परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका लातूरहून मागवण्यात आल्या. सदर प्रश्नपत्रिका आल्यानंतर दुपारी १२.५० ला विद्यार्थ्यांच्या हातात देण्यात आल्या. त्यामुळे सकाळी साडेदहा वाजता आलेले विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजेपर्यंत म्हणजे तब्बल अडीच तास ताटकळत बसावे लागले. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पालकांनी परीक्षा केंद्रावर गर्दी करून केंद्र संचालकांना जाब विचारला. दरम्यानच्या काळात बोर्डाच्या प्रश्नपत्रिका आल्यानंतर परीक्षा सुरळीत सुरू झाल्या.

विद्यार्थ्यांना परीक्षेएवढा वेळ... 
परीक्षेला प्रश्नपत्रिकेच्या गोंधळामुळे दोन तासाचा उशीर झाला तरी विभागीय मंडळाकडून परवानगी घेऊन १२.५० पासून १.०० वाजेपर्यंत वाचनासाठी व १ ते ३ पर्यंतचा वेळ प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी देण्यात आला. दरम्यान, या वेळेर विद्यार्थ्यांना अल्पोपाहाराची व्यवस्था केली. तसेच मराठी माध्यमाची परीक्षाही ठरलेल्या वेळेप्रमाणे पार पडल्याचे केंद्र संचालक एस.आर. जाधव यांनी सांगितले.

छपाई विभागाची चूक..
सदरील प्रश्नपत्रिकासंदर्भात ११.२० वाजता विभागीय परीक्षा मंडळाकडे तक्रार आली. १२.४५ पर्यंत लातूर विभागीय मंडळाकडून इंग्रजी माध्यमाच्या १७० प्रश्नपत्रिका व स्थानिक केंद्रावरील १२५ प्रश्नपत्रिका घेऊन दुपारी १ ते ३ या दोन तासात परीक्षा घेण्यात आल्या. सदरील चूक ही छपाई व पॅकिंग विभागाची  असून दोषींवर कार्यवाही करू, असे बोर्डाचे सहसचिव चित्तप्रकाश देशमुख यांनी सांगितले.

विद्यार्थी पाच तास परीक्षा दालनात... 
सर्व विद्यार्थी सेमी इंग्रजी माध्यमाचे असून अहमदपूरचे गुणवत्ताधारक आहेत. त्यांना पाच तास एकाच दालनात बसविणे हे अन्यायकारक असून परीक्षेत कमी गुण मिळाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असे जागरूक पालक सतीश ननीर म्हणाले.

Web Title: English medium students get question Marathi papers, board 'math' failed: students wait for two hours in latur SSC exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.