लातुरमध्ये काेम्बिंग ऑपरेशनचा दणका; सव्वा काेटींचा मुद्देमाल जप्त

By राजकुमार जोंधळे | Published: March 26, 2024 09:26 PM2024-03-26T21:26:15+5:302024-03-26T21:27:44+5:30

७०० जणांविराेधात गुन्हा : जिल्ह्यातील सहा गुन्हेगारांना केले तडीपार

bump from combing operation; Assets worth a quarter of a crore seized | लातुरमध्ये काेम्बिंग ऑपरेशनचा दणका; सव्वा काेटींचा मुद्देमाल जप्त

लातुरमध्ये काेम्बिंग ऑपरेशनचा दणका; सव्वा काेटींचा मुद्देमाल जप्त

लातूर : जिल्हाभरात राबविण्यात आलेल्या काेम्बिंग ऑपरेशनमध्ये स्वतंत्र ७०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यायामध्ये तब्बल १ काेटी २३ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सहा गुन्हेगारांवर हद्दीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात अवैध व्यवसायावर कारवाई करण्यासाठी विशेष धडक मोहीम राबविण्यात आली आहे. कोंबिंग ऑपरेशन, रूटमार्च, गावभेटी, मतदान केंद्राची पाहणी, गुन्हेगार आणि शांतता भंग करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्यानुसार १ फेब्रुवारी ते २५ मार्चपर्यंत लातूर शहरासह जिल्ह्यातील अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. मटका, जुगारप्रकरणी ३१४ व्यक्तींविरोधात १२० गुन्हे दाखल केले आहेत. यात जुगाराचे साहित्य, रोख असा १९ लाख ८७ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. देशी-विदेशी दारू, हातभट्टीची वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्या ५७५ जणांविरुद्ध ५६७ गुन्हे दाखल केले आहेत. जवळपास ३७ लाख ४३ हजार १८१ रुपयांची दारू जप्त केली आहे. कलम १०७ अन्वये शांतताभंग करणाऱ्या व्यक्तीविराेधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, कलम ११० अन्वयेही गुन्हेगारावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तर कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली.

जिल्ह्यात ५ फरार गुन्हेगारांना अटक...

१ फेब्रुवारी ते २५ मार्चदरम्यान रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत लातूर पोलिसाकडून लातूर जिल्ह्यात दोन वेळा कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कोंबिंग ऑपरेशनमध्ये जिल्ह्यातील ५३ अधिकारी, २०५ पोलिस अंमलदार, होमगार्ड यांच्या पथकाकडून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. कोंबिंग ऑपरेशनदरम्यान पाच फरार आरोपींना अटक करण्यात आले आहे.

जिल्ह्यात २३ ठिकाणी चेकपाेस्ट, नाकाबंदी...

जिल्ह्यात विविध २३ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. शिवाय, जिल्ह्याच्या आंतरराज्य सीमेवर चेक पोस्ट स्थापन करण्यात आले आहे. या ठिकाणी वाहनाची तपासणी करण्यात येत असून, लाेकसभा निवडणूक हाेईपर्यंत हे चेक पोस्ट आणि नाकाबंदी पॉईंट कार्यान्वित राहणार आहेत.

६५ लाखांचा गुटखा; १३ जणांविराेधात गुन्हा...

गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाप्रमाणे ( एनडीपीएस) दाेन गुन्हे दाखल केले असून, ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबराेबरच जिल्ह्यात अवैध गुटख्याची वाहतूक, विक्री आणि साठा करणाऱ्या १३ जणांविराेधात १२ गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्याकडून ६५ लाख ३२ हजारांचा गुटखा जप्त केला आहे.

Web Title: bump from combing operation; Assets worth a quarter of a crore seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.