पाण्यासाठी किल्लारी बंद; आक्रमक महिलांचा घागरमोर्चा, रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 05:35 PM2019-07-22T17:35:36+5:302019-07-22T17:38:31+5:30

किल्लारीत तीन महिन्यांपासून नळाला पाणी आल नाही

Bandha in killari for water; Aggressive women's march, Rastaroko | पाण्यासाठी किल्लारी बंद; आक्रमक महिलांचा घागरमोर्चा, रास्तारोको

पाण्यासाठी किल्लारी बंद; आक्रमक महिलांचा घागरमोर्चा, रास्तारोको

Next
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी ठेवली बाजारपेठ बंदटँकर नको, माकणी धरणाचे पाणी द्या़

किल्लारी (लातूर )  : तीन महिन्यांपासून नळाला पाणी नसल्याने किल्लारीतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ गावास नळाद्वारे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करीत गावातील महिला आक्रमक होत सोमवारी सकाळी घागरमोर्चा काढला़ तसेच लातूर- उमरगा मार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन केले़ 

औसा तालुक्यातील किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पातळी खालावली आहे़ परिणामी, गावातील ९० टक्के बोअर कोरडे पडले आहेत तर उर्वरित १० टक्के बोअरला अत्यल्प प्रमाणात पाणी येत आहे़ गावास माकणी प्रकल्पातून ३० खेडी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता़ परंतु, तीन महिन्यांपासून नळाद्वारे येणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे़ पाणी पुरवठ्याची विद्युत मोटार जळाली, जलवाहिनी फुटली अशी विविध कारणे सांगितली जात आहेत़ त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ गावास सुरळीत पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी किल्लारीतील महिला आक्रमक होत घागरमोर्चा काढला, तर या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होत महिलांसोबत रास्तारोको आंदोलन केले़ दरम्यान, गावकऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा दर्शवित गावातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली़

यावेळी पाणी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या़ आमदार, खासदारांचे लक्ष नसल्याने गावातील नळांना तीन महिन्यांपासून पाणी येत नाही, असे आंदोलनकर्ते म्हणत होते़ यावेळी प्रा़ हरिश्चंद्र कांबळे म्हणाले, तीन महिन्यांपासून नळाला पाणी नसतानाही तुरटीवर दीड लाखाचा खर्च झाला कसा? ग्रामपंचायतीने पाण्यासाठी १५ लाखांचा खर्च दाखविला आहे़ परंतु, पाणीच नाही तर तो खर्च झाला कसा? ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून कागदोपत्री मेळ घालण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला़ माकणी धरणावरुन ३० खेडी पाणीपुरवठा योजना दोन दिवसांत सुरु करा, अन्यथा आत्मदहन करु, असा इशारा महिलांनी दिला़
या आंदोलनात मोहन गायकवाड, विनायक बिराजदार, सुरेश सावळगे, कृष्णहरी क्षीरसागर, प्रा़ हरिश्चंद्र कांबळे, बिभिषण कांबळे, वसंत मंजुळे, बाबुराव झाकडे, अनिता साठे, जयश्री कांबळे यांनीही ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला़

हे आंदोलन शांततेत पार पडावे म्हणून बिभिषण कांबळे, मोहन गायकवाड गुरुजी, बाबुराव झाकडे, ईश्वर गायकवाड, विनायक बिराजदार, राजेंद्र कुलकर्णी, दयानंद गायकवाड, प्रा़ हरिश्चंद्र कांबळे, विजय भोसले, पाशा पटेल यांनी परिश्रम घेतले़ तसेच आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून सपोनि विनोद मेत्रेवार, पीएसआय गणेश कदम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़

टँकर नको, माकणीचे पाणी द्या़़़
गावकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी सतीश पाटील यांनी निवेदन स्वीकारले़ यावेळी विस्तार अधिकारी मांदळे, मंडळ अधिकारी हाश्मी, तलाठी बालाजी जाधव होते़ यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील यांनी सध्या तीन टँकर मंजूर केले आहेत़ त्यात आणखीन वाढ करता येईल, असे म्हणताच महिलांनी टँकर नको, माकणी धरणाचे नळाद्वारे पाणी द्यावे, अशी मागणी केली़

रास्तारोकोनंतर महिला ग्रामपंचायतीकडे
रास्तारोको आंदोलन झाल्यानंतर संतप्त महिलांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीवर नेला़ परंतु, तिथे सरपंचासह एकही सदस्य उपस्थित नव्हता़ त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला़

Web Title: Bandha in killari for water; Aggressive women's march, Rastaroko

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.