युवकांनी सामाजिक बांधिलकीतून एड्स जनजागृतीचे कार्य करावे, अभिनेते अवधूत जोशी यांचे आवाहन

By संदीप आडनाईक | Published: December 1, 2023 04:59 PM2023-12-01T16:59:28+5:302023-12-01T16:59:57+5:30

कोल्हापुरात एड्स नियंत्रण विभागाच्या प्रभात फेरीला प्रतिसाद

Youth should work for AIDS awareness through social commitment, An appeal by actor Avadhoot Joshi | युवकांनी सामाजिक बांधिलकीतून एड्स जनजागृतीचे कार्य करावे, अभिनेते अवधूत जोशी यांचे आवाहन

युवकांनी सामाजिक बांधिलकीतून एड्स जनजागृतीचे कार्य करावे, अभिनेते अवधूत जोशी यांचे आवाहन

कोल्हापूर : तारुण्यात अनेक प्रकारच्या आकर्षणामुळे विपरीत पाऊल पडण्याची शक्यता असते. याच वयात योग्य दिशा मिळाल्यास आणि खबरदारी घेतल्यास एचआयव्ही पासून दूर राहता येते, असे प्रतिपादन सिने अभिनेते अवधूत जोशी यांनी केले.

कोल्हापुरात  जिल्हा एड्स नियंत्रण विभागामार्फत शुक्रवारी जागतिक एड्स दिनानिमित्त सीपीआर हॉस्पिटलतर्फे काढलेल्या प्रभातफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख होत्या. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर, डॉ. माधव ठाकूर, अंजली देवरकर आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जोशी बोलत होते. ते म्हणाले, काही वर्षांपूर्वी एचआयव्ही एड्स म्हटलं की भयानकता जाणवायची. या आजाराबद्दल भरपूर गैरसमज होते.माहिती शिक्षण ,संवाद आणि एड्स नियंत्रण कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे सध्या ही परिस्थिती बदललेली आहे. युवकांनी तारुण्यात खबरदारी घ्यावी व सामाजिक बांधिलकी म्हणून एड्स जनजागृती चे कार्य करावे.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी दीपा शिपुरकर यांनी प्रास्तविक केले. त्यांनी "आता पुढाकार समुदायाचा" ही यावर्षीची संकल्पना असून यापुढे समाजानेही पुढे येणे आवश्यक आहे, असे सांगितले. डॉ. सुप्रिया देशमुख म्हणाल्या, जिल्ह्यात सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये एचआयव्ही समुपदेशन व चाचणी मोफत केली जाते. एचआयव्ही संसर्गित व्यक्तींकरिता दिल्या जाणाऱ्या एआरटी औषधोपचारांमुळे संसर्गित व्यक्तीचे आयुर्मान वाढवण्यास मदत झाली आहे, तसेच नवीन एचआयव्ही संसर्गितांची आकडेवारी कमी झाली आहे.

एड्स दिनानिमित्त विशेष मुलांसाठी घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. विनायक देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शपथ वाचन निरंजन देशपांडे यांनी केले. यावेळी डॉ. ऋतुजा कदम, डॉ. सुभाष जगताप, मकरंद चौधरी, कपिल मुळे, अभिजित रोटे, संजय गायकवाड, दीपक सावंत, संदीप पाटील, पल्लवी देशपांडे, शिल्पा अष्टेकर, मनीषा माने, क्रांतीसिंह चव्हाण, राजेश गोधडे, सतिश पाटील, प्रेमजीत सरदेसाई, रविराज पाटील उपस्थित होते. या फेरीत न्यू काॅलेज, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, विवेकानंद कॉलेज, डीआरके कॉलेज ऑफ कॉमर्ससह इतर महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

Web Title: Youth should work for AIDS awareness through social commitment, An appeal by actor Avadhoot Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.