कागलची अर्थवाहिनी ‘विक्रमसिंह घाटगे बँक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:41 AM2019-02-25T00:41:28+5:302019-02-25T00:41:33+5:30

जहाँगीर शेख । लोकमत न्यूज नेटवर्क कागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार ...

'Vikramsinh Ghatge Bank' by Kagal | कागलची अर्थवाहिनी ‘विक्रमसिंह घाटगे बँक’

कागलची अर्थवाहिनी ‘विक्रमसिंह घाटगे बँक’

googlenewsNext

जहाँगीर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कागल : संपूर्ण हिंदुस्तानवर इंग्रजांचे वर्चस्व प्रस्थापित झाल्यानंतरही देशातील काही संस्थानांचा स्वतंत्र कारभार कायम होता. अशा काही मोजक्या संस्थानात ‘करवीर’, ‘कागल’चा समावेश होता.
कागलच्या घाटगे घराण्यातील ‘यशवंतराव’ कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीला दत्तक गेले आणि पुढे राजर्षी छत्रपती शाहू महाराज म्हणून जगभर ख्यातीप्राप्त झाले. त्यांनी आपल्या राज्यात जगभरात जनहिताचे जे जे काही नव्याने समोर आले, ते ते आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे बंधू श्रीमंत पिराजीराव ऊर्फ बापूसाहेब महाराज यांनी हे नवीन बदल व उपक्रम कागल जहागिरीतही अमलात आणले. त्यापैकीच एक म्हणजे ‘सहकार चळवळ’ होय. २१ जुलै १९१७ रोजी कागलमध्ये स्थापन झालेली सहकार तत्त्वावरील पतपेढी म्हणजेच आजची राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक होय.
कागलचे तत्कालीन अधिपती असलेल्या श्रीमंत बापूसाहेब महाराज यांना ‘पुत्ररत्न’ झाले. या दिवशी म्हणजे ८ जुलै १९१७ रोजी ही ‘पतपेढी’ स्थापण्याची मुहूर्तमेढ रोवली आणि २१ जुलैला तशी रीतसर नोंदणी झाली. १९१२ च्या मुंबई इलाखा सहकार कायद्यान्वये ही पतपेढी नोंदवली गेली. एकशे दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या ‘अनलिमिटेड’ पतपेढीचे १९३६ मध्ये ‘लिमिटेड’मध्ये, तर १९४३ मध्ये ‘दि कागल सेंट्रल क ो-आॅप. बँक लि.’ असे रूपांतर झाले. १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यानंतर कागलचे संस्थानही भारतीय संघराज्यात विलीन झाले. सहकार खात्यांतर्गत ही बँक आली; पण घाटगे घराण्याचे मार्गदर्शन आणि प्रेम या बँकेस कायम मिळत राहिले. बापूसाहेब महाराजांच्या निधनानंतर कागलचा कारभार श्रीमंत जयसिंगराव ऊर्फ बाळ महाराज पाहत होते. स्वातंत्र्यानंतर १९७० च्या दशकात बाळ महाराजांचे चिरंजीव स्वर्गीय विक्रमसिंह घाटगे यांनी बँकेच्या कामकाजावर लक्ष केंद्रित केले. त्यांनी बँकेला विश्वासार्हतेबरोबरच आर्थिक वैभव प्राप्त करून दिले. त्यांचे या बँकेवर खूप प्रेम होते. विक्रमसिंह यांच्या निधनानंतर समरजित घाटगे यांनी बँकेची धुरा हाती घेतली. ते स्वत:च सी.ए. असल्याने आज ही बँक चौफेर प्रगतिपथावर आहे. सभासदांच्या मागणीवरून या बँकेचे दोन वर्षांपूर्वी ‘राजे विक्रमसिंह घाटगे को-आॅपरेटिव्ह बँक’ असे नामकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्याआधी ३० वर्षे स्थापन झालेल्या या बँकेचा हा वैभवशाली प्रवास समस्त कागलवासीयांना अभिमानास्पद असाच आहे. २४ विविध पारितोषिकांची मानकरी असलेल्या बँकेने आधुनिक बँकिंग प्रणाली आत्मसात केली आहे.
धान्य आणि
कापड व्यापारही
१९४० च्या सुमारास दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची महागाई वाढली होती. लोकांना पुरेसे व योग्य किमतीत धान्य मिळावे म्हणून या बँकेने धान्य तसेच कापड विक्री सुरू केली होती. बाजरी, ज्वारी, मिरची, चहापूड, आगपेट्या, तूरडाळ, तेल, आदी वस्तू विक्रीस उपलब्ध होत्या. स्वातंत्र्यानंतर म्हणजे १९५० मध्ये दोन रेशनकार्ड दुकानेही ही बँक चालवीत होती. नंतर कालौघात केवळ आर्थिक व्यवहारच राहिले.

 

 

 

Web Title: 'Vikramsinh Ghatge Bank' by Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.