तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा आज फैसला कुरुंदवाड नगरपालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:59 PM2018-07-10T23:59:19+5:302018-07-10T23:59:29+5:30

येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात,

Today the decision of the disqualification of three corporators is decided by the Kurundwad Municipality | तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा आज फैसला कुरुंदवाड नगरपालिका

तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा आज फैसला कुरुंदवाड नगरपालिका

googlenewsNext
ठळक मुद्देनगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे लक्ष

गणपती कोळी ।
कुरुंदवाड : येथील पालिकेतील राष्ट्रवादीच्या तीन नगरसेवकांच्या अपात्रतेचा निर्णय आज, बुधवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादी व प्रतिवादी नगरसेवकांत धाकधूक वाढली असून जिल्हाधिकारी कोणता निर्णय देतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, या निकालावरुन शहरात व पालिकेत मोठ्या राजकीय घडामोडी होण्याची शक्यता आहे.
पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे तर भाजप विरोधी बाकावर आहे. राष्ट्रवादीचे पाच नगरसेवक असून अवघ्या वर्षभरातच राष्ट्रवादी नगरसेवकांत फूट पडली. आघाडी नेते रावसाहेब पाटील व पक्षप्रतोद जवाहर पाटील यांच्या पक्षीय कारभारावर आक्षेप घेत तीन महिन्यापूर्वी पालिकेच्या उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचे किरण जोंग, स्नेहल कांबळे व नरगीस बारगीर यांनी पक्षाचा व्हीप डावलून विरोधी मतदान केले होते.

व्हीपचा आदेश डावलल्याने पक्षप्रतोद जवाहर पाटील यांनी विरोधात गेलेल्या तीनही नगरसेवकांचे नगरसेवकपद रद्द व्हावे, अशी तक्रार जिल्हाधिकाºयांच्याकडे केली होती. गेली अडीच महिने दोन्ही बाजंूच्या नगरसेवकांनी वकिलांमार्फत जिल्हाधिकारी यांच्यापुढे आपले म्हणणे मांडले होते. ९० दिवसांत या प्रकरणाचा निकाल देणे जिल्हाधिकाºयांना बंधनकारक आहे. गुरुवारी (दि. १२) हा कार्यकाल पूर्ण होणार असल्याने आजच जिल्हाधिकारी निकाल देण्याची शक्यता आहे.
वादी व प्रतिवादी नगरसेवकांनी प्रतिष्ठा पणाला लावली असून विरोधात गेल्यास अपिलात जाण्याचीही तयारी केली आहे. त्यामुळे या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले असून दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांत धाकधूक वाढली आहे. दरम्यान, नगरसेवकपद अपात्र ठरल्यास कायदा सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे. एकूणच या निकालावरुन शहरातील व पालिकेतील राजकारणात मोठ्या उलथापालथी होण्याची शक्यता आहे.

...तर सत्ता अल्पमतात!
पालिकेत काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता आहे. भाजप विरोधी बाकावर आहे. उपनगराध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीच्या या तीनही नगरसेवकांनी भाजपपुरस्कृत सुशील भबिरे यांच्या बाजूने मतदान केले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या वादात या तीनही नगरसेवकांच्या बाजूने भाजप सक्षमपणे उभे राहिला आहे. जिल्हाधिकाºयांच्या या निर्णयात राजकीय हस्तक्षेप (पालकमंत्र्यांचा अप्रत्यक्ष सहभाग) झाला व राष्ट्रवादीच्या पक्षप्रतोदाचा अर्ज फेटाळून नगरसेवकपद पात्र ठेवल्यास तीनही नगरसेवक भाजपत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेतील काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता अल्पमतातही येऊ शकते.

निर्णय अपिलात जाणार? जिल्हाधिकाºयांचा निकाल
वादी अथवा प्रतिवादी यांच्याविरोधात गेल्यास त्यांना अपिलात जाता येते. त्यामुळे हा वाद नगरविकास राज्यमंत्र्यांच्या कोर्टात जाऊ शकतो. त्यांना सहा महिन्यांत या अपिलावर निर्णय देणे बंधनकारक आहे.

Web Title: Today the decision of the disqualification of three corporators is decided by the Kurundwad Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.