कोकण रेल्वे सुरु करण्याचे आव्हान, कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक

By संदीप आडनाईक | Published: April 25, 2024 01:05 PM2024-04-25T13:05:45+5:302024-04-25T13:43:35+5:30

संदीप आडनाईक कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वे कोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर ...

The challenge of starting the Konkan Railway, Kolhapur has always been treated with contempt | कोकण रेल्वे सुरु करण्याचे आव्हान, कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक

कोकण रेल्वे सुरु करण्याचे आव्हान, कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक

संदीप आडनाईक

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी ठेवून संस्थानाच्या खर्चाने मिरजेपर्यंत आलेली रेल्वेकोल्हापूरपर्यंत आणली. रेल्वेच्या नकाशावर असूनही सुविधांबाबत कोल्हापूरला नेहमीच सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. १३२ वर्षे झाल्यानंतरही कोल्हापूरच्या संथ रेल्वेला पुरेशी ‘गती’ मिळालेली नाही. कोकण रेल्वे, लांब पल्ल्याच्या रेल्वे, वंदे भारतसारखे नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याबाबत अजूनही कोल्हापूरला ठेंगा दाखवला जात आहे. यासाठी लोकप्रतिनिधींची ‘शक्ती’ मिळण्याची गरज आहे.

गेल्या ५० वर्षांपासून कोल्हापूरच्या रेल्वे विकासासाठी लोकांकडून सातत्याने केल्या जाणाऱ्या मागण्या आता थोड्या प्रमाणात पूर्ण होत आहेत. कोल्हापूर ते मुंबई आणि पुढे अन्यत्र वेगाने जाण्यासाठी कोल्हापूर ते पुणे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण अत्यावश्यक होते. मात्र कोल्हापूर, मिरज ही स्थानके दक्षिण रेल्वे विभागामध्ये मोडत असल्याने कोल्हापूरचा कधी विचारच झाला नाही. त्यामुळे मुंबईहून कोल्हापूरला येण्यासाठी १० तासांचा मोठा कालावधी लागत होता.

आता दुहेरीकरण-विद्युतीकरणाचे काम ९० टक्के पूर्ण हाेत आहे. त्यामुळे नवीन रेल्वेगाड्यांचा मार्ग मोकळा होईल. मिरज-कुर्डूवाडी मार्गाचे रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर कोल्हापूरपासून सोलापूर आणि हैदराबादपर्यंत रेल्वे प्रवास शक्य झाला आहे. दिल्ली, धनबाद, अहमदाबादसाठी रोज रेल्वेची मागणी असूनही ती आठवड्यातून एकदा सोडली जाते. यामुळे व्यापार, उद्योगाला मर्यादा आहेत.

कोकण रेल्वे कोल्हापूरला कधी जोडणार

कोकणाला कोल्हापूर जोडण्याच्या महत्त्वाकांक्षी कोल्हापूर ते वैभववाडी या नवीन रेल्वेमार्गासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यामुळे पहिल्या टप्प्यात २५० कोटी रुपयांची तरतूद केली. पण ५० वर्षे होऊन गेली; परंतु ही मागणी अद्यापही सर्वेक्षणाच्याच पातळीवर आहे. यामुळे पश्चिम किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी जोडल्या जाऊन उद्योग, व्यापाराला चालना मिळणार आहे. ही जमेची एक बाजू सोडल्यास अन्य सुविधांबाबत ठेंगाच दाखविला असेच म्हणावे लागेल.

मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतच

तत्कालीन रेल्वेमंत्री नितीशकुमार यांची कोल्हापूर मॉडेल स्टेशनची घोषणा हवेतच विरली. त्याचा पाठपुरावा कोणत्याच लोकप्रतिनिधींनी केला नाही. सध्याची इमारत अपुरी पडत असल्याने उशिरा का होईना अमृतभारत योजनेतून पुनर्विकासाचे काम सुरू आहे; पण त्याला गती नाही, असे लोकांचे म्हणणे आहे.

  • १८९१ : मिरज ते कोल्हापूर पहिली रेल्वे सुरू
  • ४८ किलोमीटरचा पहिला ट्रॅक शाहू महाराजांच्या वैयक्तिक निधीतून
  • १९७१ : मीटरगेजचे ब्रॉडगेजमध्ये परिवर्तन
  • २०२० : कोल्हापर-मिरज एकेरी विद्युतीकरण मार्ग

 

  • ४ एकूण प्लॅटफाॅर्म
  • ११ एक्स्प्रेस
  • ४ डेमू गाड्या
  • २ सुपरफास्ट
  • १७ : एकूण धावणाऱ्या रेल्वे


कोल्हापूर रेल्वेस्थानकातून लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण गतीने पूर्ण होण्याची गरज आहे. डेमू गाड्यांची संख्या वाढवणे, सांगली, पुणे शटल सर्व्हिस सुरू करणे, कोल्हापूर ते वैभववाडी, मुंबईसाठी नवीन गाडी सुरू करणे, फेऱ्या वाढवणे, वंदे भारत या गाड्या होणे अपेक्षित आहे. -शिवनाथ बियाणी, सदस्य, मुंबई विभागीय रेल्वे सल्लागार समिती
 

दुसरे रेल्वे टर्मिनल केल्यास नवीन लांब पल्ल्याच्या रेल्वे सुरू होतील, कोल्हापूर-मिरज दुसरी रेल्वे लाइन टाकणे, कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचा पाठपुरावा करणे, कऱ्हाड-बेळगाव नवीन रेल्वे मार्ग कोल्हापूरला महामार्गाशी समांतर करणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागण्या केल्या; पण हे प्रश्न सुटलेले नाहीत. ते मार्गी लागल्यास जिल्ह्याच्या पर्यटन, व्यापार उद्योगाला चालना मिळून रोजगाराच्या संधी येतील. - मधुसूदन पावसकर, अध्यक्ष, युनिटी करवीर विकास संघ मंच, कोल्हापूर.

Web Title: The challenge of starting the Konkan Railway, Kolhapur has always been treated with contempt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.