‘डॉल्बी जॅमर’ तयार करण्याची दहाजणांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:45 AM2017-08-28T00:45:14+5:302017-08-28T00:45:14+5:30

Ten people prepare for 'Dolby Jammer' | ‘डॉल्बी जॅमर’ तयार करण्याची दहाजणांची तयारी

‘डॉल्बी जॅमर’ तयार करण्याची दहाजणांची तयारी

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आवाजाची मर्यादा ओलांडून ध्वनिप्रदूषण करणाºया ध्वनियंत्रणांना रोखण्यासाठी ‘डॉल्बी जॅमर’ची निर्मिती करणे शक्य असल्याचे मत इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, राज्यातील दहाजणांनी ‘डॉल्बी जॅमर’ तयार करण्याबाबत रविवारी तयारी दर्शविली आहे.
डॉल्बीसारख्या ध्वनियंत्रणांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. ते टाळण्यासह या वर्षीचा गणेशात्सव डॉल्बीमुक्त करण्याचा उद्देश आहे. त्यासाठी जो कोणी ‘डॉल्बी जॅमर’तयार करील, त्याला दहा लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी (दि. २६) शिवाजी चौकातील २१ फुटी महागणपती येथे झालेल्या कार्यक्रमात केली. असा जॅमर तयार करता येईल का? हे जाणून घेण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेण्यात आली. यात इलेक्ट्रॉनिक्स अभियंता विनायक पाचलग म्हणाले, डॉल्बीमधून बाहेर पडणाºया ध्वनिलहरी रोखण्यासाठीच्या जॅमरची जॅमर बनविता येतो. यामध्ये ध्वनिलहरी खेचून घेणे, त्या रोखून ठेवणे अथवा पसरू न देणे हे करता येते. सध्या अशा स्वरूपातील जॅमर उपलब्ध नाही. मात्र, काहीशा व्यापक स्वरूपात अभ्यास आणि संशोधन करून ‘डॉल्बी जॅमर’ बनविता येईल. यात डॉल्बी यंत्रणेच्या मिक्सरला जॅमर लावणे, ध्वनियंत्रणेतून मर्यादेइतकाच आवाज बाहेर सोडणे, अशा पर्यायातून हे तंत्रज्ञान विकसित करता येईल. या जॅमर निर्मितीच्या अनुषंगाने कोल्हापुरात एखादी हॅकेथॉन (स्पर्धा) घेतल्यास त्यातून चांगल्या संकल्पना समोर येतील.
शिवाजी विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ. आर. के. कामत म्हणाले, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ‘डॉल्बीमुक्ती’च्या दिशेने टाकलेले पाऊल स्वागतार्ह आहे. डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग (डीएसपी) तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपल्याला नको असणाºया ध्वनिलहरी रोखणे शक्य आहे. सध्या वाहनांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. ‘डीएसपी’ तंत्रज्ञानाद्वारे एअर प्लग तयार करून ते मिरवणुकीत सहभागी होणाºया प्रत्येकाला दिल्यास त्यांना ‘डॉल्बी’चा आवाज ऐकू येणार नाही. दरम्यान, शनिवारी (दि. २६) डॉल्बी जॅमरबाबतच्या बक्षिसाची घोषणा झाल्यापासून राज्यातील दहाजणांनी असा जॅमर तयार करण्याबाबतची तयारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे दर्शविली आहे. यामध्ये केआयटी, वाकरे, आदींसह राज्यातील विद्यार्थी, तंत्रज्ञांचा समावेश आहे. संंबंधित जॅमरची निर्मिती झाल्यास या वर्षीची गणेशोत्सव मिरवणूक निश्चितच ‘डॉल्बी मुक्त’ होईल.
‘प्रयोग करण्याचा खर्चही देणार’
१ ‘डॉल्बी जॅमर’ तयार करण्याबाबतचे आवाहन केल्यानंतर रविवार सकाळपासून उत्सुकतेपोटी अनेकजणांनी दूरध्वनीवरून माझ्याशी संपर्क साधला. यातील दहाजणांनी डॉल्बी जॅमर निर्मितीसाठीची तयारी दर्शविली असल्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, या दहाजणांमधील एकाने सॅटेलाईटच्या माध्यमातून पूर्ण शहरातील डॉल्बी बंद करण्याचा दावा केला आहे.
२ दुसºया एकाने मिरवणूक मार्गावर दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर एका वाहनावर जॅमर बसवून डॉल्बीचा आवाज रोखता येईल, अशा तंत्रज्ञानाची माहिती दिली आहे. जॅमर निर्मितीबाबत ज्यांनी तयारी दर्शविली आहे, त्यांना प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी आज, सोमवारी बोलाविले आहे. यातून एका तंत्रज्ञानाची निवड केली जाईल. तंत्रज्ञानाची उपयुक्तता स्पष्ट झाल्यास जॅमर निर्मितीच्या प्रयोगासाठीचा खर्च देण्याची तयारी आहे. या प्रयोगासाठी ५० हजार रुपयांची मदत करण्यात येईल.
या ठिकाणी होतो जॅमरचा वापर
काही शैक्षणिक संस्था, शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये मोबाईल जॅमरचा वापर केला जातो. विमानतळ, सैन्यदलाच्या परिसरात इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जॅम करण्यासाठी ‘आयओटी’ (इंटरनेट आॅफ थिंग्ज) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो.
एखादे रुग्णालय, इमारत ही साउंड प्रूफ (ध्वनिरोधक) करण्यासाठी नॉईज कॅन्सलेशन सिस्टीम सध्या वापरली जाते. त्यामुळे डॉल्बी जॅमरचा मिरवणुकीत वापर करणे शक्य असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Ten people prepare for 'Dolby Jammer'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.