सावर्डे खुर्द येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 12:51 AM2018-09-18T00:51:53+5:302018-09-18T00:51:56+5:30

Suspected death of youth in Savde Khurd | सावर्डे खुर्द येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

सावर्डे खुर्द येथे तरुणाचा संशयास्पद मृत्यू

googlenewsNext


मुरगूड : सावर्डे खुर्द (ता. कागल) येथील महादेव शिवाजी घराळ (वय २५) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. दरम्यान, या तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी महादेव याची पत्नी पूनम हिनेच जेवण आणि चहातून विष देत पतीचा खून केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पूनम महादेव घराळ हिच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेकडो ग्रामस्थांनी मुरगूड पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अधिक माहिती अशी, सावर्डे खुर्द येथील महादेव पाटील हा आईबरोबर राहत होता. त्याची सहा एकर बागायत जमीन असून, तो गोकुळ शिरगाव एमआयडीसी येथे एका खासगी कंपनीत नोकरीस होता. त्याच्या घरची परिस्थिती उत्तम होती. दरम्यान, त्याच्या आईचे काही दिवसांपूर्वी अपघाती निधन झाले. त्यामुळे घरामध्ये तो एकटाच होता. तीन बहिणींची लग्ने झाली असून दोन महिन्यांपूर्वी १७ जुलैला त्याचेही लग्न हमीदवाडा (ता. कागल) येथील माधवी आनंदा हासबे (पूनम) हिच्याशी झाले होते.
मंगळवारी (दि. ११ सप्टेंबर) महादेव कामावरून येऊन टीव्ही पाहत बसला होता. त्यावेळी त्याला पत्नी पूनमने चहा दिला. चहा पिल्यानंतर काही वेळांतच त्याला उलट्या सुरू झाल्या. उलट्या थांबत नाहीत म्हणून महादेवची चुलती हौसाबाई यांनी त्याला दवाखान्यात नेले; पण तेथून त्याला कोल्हापूरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सोमवारी सकाळी महादेववर अंत्यसंस्कार करून सावर्डे खुर्द येथून कुटुंबीय व शेकडो ग्रामस्थ मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये आले. त्यांनी निवेदनाद्वारे महादेवचा त्याची पत्नी पूनम हिनेच खून केला असल्याचा आरोप केला आहे. महादेव रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना पत्नी व तिच्या नातेवाईकांनी अजिबात चौकशी केली नसल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी लावला.
शिवाय हे प्रकरण मिटविण्यासाठी खोटा जबाब नोंदवून घेतल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. संबंधितांवर खुनाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी महादेवच्या बहिणी अनिता जयसिंग पाटील, उषाताई बाळू ढोले, सुनीता विश्वनाथ पसारे यांनी केली आहे. दरम्यान, पूनम आणि महादेव यांचे लग्न सर्वांच्या मर्जीने झाले आहे. पूनमवर केलेले आरोप धक्कादायक आहेत. पूनमकडून असे कृत्य कदापि होणार नाही, असे पूनमचे मामा पंडित दंडवते (हमीदवाडा) यांनी सांगितले.
 

Web Title: Suspected death of youth in Savde Khurd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.