‘संगांयो’च्या रस्सीखेचमध्ये हाळवणकरांनी मारली बाजी, आवाडे-हाळवणकर संघर्ष पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 05:56 PM2023-04-19T17:56:29+5:302023-04-19T17:57:02+5:30

लोकसभेला चित्र होईल स्पष्ट

Suresh Halvankar victory in the selection of Sanjay Gandhi Niradhar Yojana, Conflict between Prakash Awade and Halvankar in discussion | ‘संगांयो’च्या रस्सीखेचमध्ये हाळवणकरांनी मारली बाजी, आवाडे-हाळवणकर संघर्ष पुन्हा चर्चेत

‘संगांयो’च्या रस्सीखेचमध्ये हाळवणकरांनी मारली बाजी, आवाडे-हाळवणकर संघर्ष पुन्हा चर्चेत

googlenewsNext

अतुल आंबी

इचलकरंजी : येथील आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा देत पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी संधान साधले असले तरी स्थानिक पातळीवर माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्याशी संघर्ष संपताना दिसत नाही. संजय गांधी निराधार योजनेच्या निवडीवरून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. दोघांच्यातील अध्यक्षपदाच्या रस्सीखेचामुळे या समितीची नियुक्ती रखडली होती. अखेर हाळवणकर गटाने बाजी मारत भाजपचे शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांची अध्यक्षपदी वर्णी लागली.

राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर या समितीवर कोणाची वर्णी लागणार, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात होते. आवाडे-हाळवणकर दोन्ही गटांकडून अध्यक्षपदासाठी दावा सुरू होता. त्यामध्ये अनिल डाळ्या, अमृत भोसले, प्रकाश दत्तवाडे व महेश पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. ही समिती आपल्याच गटाकडे रहावी, यासाठी दोन्ही गटांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती.

परिणामी निवडीची प्रक्रियाच रखडली होती. यापूर्वीचे अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी भरीव कामगिरी करत अनेकांना न्याय दिला. त्यानंतर खऱ्या अर्थाने समितीला ऊर्जितावस्था आली. आता प्रलंबित लाभार्थ्यांची कामे मार्गी लावण्यासाठी नवीन समिती कार्यान्वित होणे आवश्यक होते. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नासाठी अखेर नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

असा ठरला फॉर्म्युला

राज्यातील समितींच्या वाटणीच्या फॉर्म्युल्यानुसार ५०-५० टक्के सदस्य संख्या भाजप व शिंदे गटाला ठरविण्यात आली होती. परंतु येथील आमदार प्रकाश आवाडे यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने इचलकरंजीच्या समितीत तीन वाटण्या झाल्या. त्यामध्ये तीन-तीन-चार असा फॉर्म्युला ठरविण्यात आला.

ग्रामपंचायतवेळीही होती रस्सीखेच

काही महिन्यांपूर्वी झालेल्या परिसरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्येही दोन्ही गटांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. त्यामध्ये दोघांनीही थेट भाग न घेता आपापल्या गटाच्या प्रमुखांना पुढे केले होते. त्यामुळे काही ठिकाणी समीकरणे जुळली, तर काही ठिकाणी फुटीचे राजकारणही घडले. त्यातूनही सामंजस्य एक्स्प्रेस ग्रामीण भागातील स्थानिक गटातटानुसार धावत आहे.

लोकसभेला चित्र होईल स्पष्ट

आवाडे यांचा भाजपमध्ये थेट प्रवेश झाला नाही अथवा त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांचाही प्रवेश नाही. त्याचबरोबर त्यांना मंत्रिपदाची संधीही मिळाली नाही. तरीही ते भाजपसोबत कायम आहेत. याबाबत वरिष्ठांकडून आवाडे-हाळवणकर यांना एकत्र नांदा, अशा सूचना असल्या तरी दोघांमधील राजकीय दरी मिटणे सहज शक्य नाही. त्यामुळे या राजकारणाचे पुढे काय होणार, हे लोकसभा निवडणुकीवेळी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Web Title: Suresh Halvankar victory in the selection of Sanjay Gandhi Niradhar Yojana, Conflict between Prakash Awade and Halvankar in discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.