शेट्टी, सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कारखानदारीचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 12:10 PM2017-10-21T12:10:29+5:302017-10-21T12:28:40+5:30

खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कसा सुटतो, याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिले आहे.

Shetty, Sadbhau's factory collaboration in the struggle for farmers' union | शेट्टी, सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कारखानदारीचे हाल

शेट्टी, सदाभाऊ यांच्या शेतकरी संघटनांच्या वर्चस्वाच्या संघर्षात कारखानदारीचे हाल

Next
ठळक मुद्देऊसदराचा प्रश्न वर्चस्वाच्या वादात पहिल्या उचलीसाठी शेतकरी संघटनांत श्रेयवाद रंगणारदोघांच्या शह-काटशहाच्या राजकारणात कारखानदारीचे हाल

कोल्हापूर , दि. २१ : खासदार राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना व कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या वर्चस्वाच्या वादात यंदा साखर कारखानदारीचे हाल होण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. पहिल्या उचलीचा तिढा कसा सुटतो, याकडे साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिले आहे.


आता बाजारात साखरेचा दर क्विंटलला ३५०० पर्यंत आहे. महाराष्ट्राची सरासरी एफआरपी २८५० रुपये होते. कोल्हापूर जिल्ह्यात उतारा जास्त असल्यामुळे ती २७०० ते ३२०० पर्यंत जाते. राज्य बँक ३५०० रुपये दर निश्चित करून तिचे मूल्यांकन करते. साखरेच्या दराच्या ८५ टक्के मूल्यांकन विचारात घेता ही रक्कम २९७५ रुपये होते.

सदाभाऊंच्या संघटनेने एफआरपी व त्यात ३०० वाढीव एवढ्या पहिल्या उचलीची मागणी केली आहे. कारखान्यांना सगळी मिळून २९७५ रुपये उचल मिळाल्यावर त्यातील फक्त ऊसदरासाठीच ३१०० रुपये कसे देणार, असा कारखानदारीसमोर पेच आहे. त्यामुळे यंदाही दोन टप्प्यांत पहिली उचल द्यायचा तोडगा काढला जावा, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त होत आहे.

जेव्हा साखरेला चांगले पैसे मिळतात, तेव्हा कारखानदारीने स्वत:हून शेतकऱ्याना चांगला दर दिला आहे, असा पूर्वानुभव आहे. त्यामुळे हिंसक आंदोलनापेक्षा समन्वयातून तोडगा निघावा, अशी अपेक्षा कारखानदारीतून व्यक्त होत आहे.


यंदा राज्यात सुमारे ६३० लाख टन ऊस उपलब्ध असल्याचा राज्य शासनाचा प्राथमिक अंदाज आहे; परंतु सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये झालेल्या पावसाने गळिताचा अंदाज खोटा ठरण्याची चिन्हे आहेत. हा पाऊस इतर खरीप पिकांना हानिकारक ठरला तरी उसाची वाढ मात्र जोमदार झाली आहे. त्यामुळे टनेज वाढणार आहे.

कायद्याने उसाला एफआरपी चौदा दिवसांच्या आत एकरकमी देणे बंधनकारक असते. त्यामुळे एफआरपी देऊन हंगाम सुरू व्हावा, अशी कारखानदारांची अपेक्षा आहे; परंतु ‘स्वाभिमानी’ला अडचणीत आणण्यासाठी सदाभाऊंनी एफआरपी व टनास ३०० रुपये जादा मिळवून देणार अशी घोषणा केली आहे. त्यासाठी नोव्हेंबरच्या अगोदर जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन तोडगा काढू, असे त्यांनी कोल्हापुरात जाहीर केले आहे.

‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद २८ तारखेला आहे. त्यामुळे तिथे पहिल्या उचलीची काय मागणी होते, हे महत्त्वाचे आहे. त्या अगोदर सदाभाऊंनी काही तोडगा काढला तर तो शेट्टी यांना मान्य होणार नाही; त्यामुळे या दोघांच्या शह-काटशहाच्या राजकारणात कारखानदारीचे हाल होणार आहेत.

ऊस परिषदेच्या आधी पहिल्या उचलीसाठी बैठक घ्यायची कुणाला घाई झाली असेल तर त्यांनी खुशाल घ्यावी. शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय झाला तर आम्हीही त्याचे स्वागतच करू. आम्हांला कारखानदारांकडूनही काही प्रस्ताव आला तर त्यावरही विचार करायला तयार आहोत. आम्हीच दर ठरवू ही आमची भूमिका नाही. जे शेतकऱ्याच्या हिताचे असेल ते मिळविणे हेच आमचे लक्ष्य आहे. आतापर्यंत त्यासाठी सरकारबरोबर संघर्ष केला आहे. यंदा तो कारखानदारांसमवेत करावा लागला तर त्यालाही आमची तयारी आहे.
- खासदार राजू शेट्टी
अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

Web Title: Shetty, Sadbhau's factory collaboration in the struggle for farmers' union

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.