मंडलिकांना ‘सहानुभूती’ की महाडिकांना ‘दाद’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 11:33 PM2019-04-24T23:33:53+5:302019-04-24T23:34:07+5:30

कागल : कागल-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीत कधी नाही इतकी मरगळ सर्वच गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहावयास मिळाली. ‘आमचं बी ...

'Shampoosity' to the Mandalis, 'Shankar' to Mahadik? | मंडलिकांना ‘सहानुभूती’ की महाडिकांना ‘दाद’?

मंडलिकांना ‘सहानुभूती’ की महाडिकांना ‘दाद’?

Next

कागल : कागल-गडहिंग्लज विधानसभा मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीत कधी नाही इतकी मरगळ सर्वच गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहावयास मिळाली. ‘आमचं बी ठरलंय’ आणि ‘आमी बी ध्यानात ठेवलंय’, असे टोमणे आणि घड्याळ, धनुष्य बाणाच्या खाणाखुणा यांची रेलचेल गावागावांतून पाहावयास मिळत होती.
स्थानिक कार्यकर्त्यांनी आपआपल्याला सोयीस्कर अशीच भूमिका घेतल्याने नेते आणि मतदारही अचंबित झाले होते. कोणतीही प्रभावी यंत्रणा नसताना, दरवेळीच टोकाची ईर्षा नसताना, पाठपुरावा करून मतदारांना बाहेर काढण्याचे प्रकार झालेले नसताना, या मतदारसंघात झालेले ७५.२५ टक्के मतदान म्हणजे मतदारांनी दाखविलेली सजगता आहे. मतदारांचे हे उत्स्फूर्त मतदान कोणाला तरी एकाला घातक ठरणार तर आहेच; पण मतदारसंघातील नेतेमंडळींनाही दिलेला हा इशाराच आहे.
कागल तालुक्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीलाच खासदार धनंजय महाडिक यांना थेट विरोध केला होता. शिवसेना-भाजप युतीमुळे उर्वरित तीन गट एकत्र आले होते. या पार्श्वभूमीवर या तालुक्यात एकतर्फी मतदान होईल, असे चित्र होते; पण शरद पवारांचा ‘आमी बी ध्यानात ठेवलंय’ हा इशारा कागलमध्ये चपलख लागू झाला. आम. मुश्रीफ गट शेवटच्या पाच ते सहा दिवसांत फारच सक्रिय झाला. तर मंडलिक गटाच्या जोडीला दोन्ही घाटगे गट असले तरी यंत्रणा राबविण्यात अनेक ठिकाणी ताळमेळ दिसला नाही. गडहिंग्लजला शेवटच्या काही दिवसांत जनता दलाचे ज्येष्ठ नेते श्रीपतराव शिंदे खा. महाडिक यांच्या बाजूने झुकले. तर उत्तूर जि. प. मतदारसंघात उमेश आपटे यांनी मंडलिकांचा किल्ला लढविला. बाकी शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते, नेतेही युतीधर्म म्हणून प्रचारात सक्रीय होते; पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोडण्या आणि महाडिक यांची आलेली रसद शिवसेना आणि मंडलिक गटापेक्षा वरचढ होती.
या मतदारसंघात त्यातही कागल तालुक्यात संजय मंडलिक यांना सहानुभूती, तसेच राष्ट्रवादीतून छुपी रसद मिळणार हे गृहीत धरून खासदार महाडिक गटाने आपली यंत्रणा कामाला लावली. आमदार हसन मुश्रीफांच्या परवानगीशिवाय साधी पदयात्राही कोठे काढली नाही. राष्ट्रवादीचे काहीजण उघडपणे धनुष्य बाणाचा प्रचार करीत असतानाही संयम ठेवीत महाडिक यांनी अंडर करंटची चाल खेळली. जसा मंडलिक, राजे, घाटगे, डॉ. शहापूरकर, गटात ताळमेळ राहिला नाही. तशीच अवस्था राष्ट्रवादी आणि महाडिक समर्थक यांच्यात राहिली. म्हणजे रणजितसिंह पाटील, भूषण पाटील, रवींद्र आपटे , स्वाभिमानी शेतकरी संघटना, आदी मंडळी स्वतंत्रपणे प्रचारात दिसली. एकूणच यंत्रणा आणि साधनसामुग्रीच्या जोरावर खा. महाडिक यांनी या मतदारसंघात अगदी एकतर्फी सुटलेले मंडलिकांचे वारे थोपविले.
मग, मतदारांनी या मतदारसंघात केलेले उत्स्फूर्त मतदान हे महाडिक यांच्या प्रयत्नांना दिलेली ‘दाद’ की मंडलिकांच्याप्रती व्यक्त झालेली ‘सहानुभुती’? याचे उत्तर २३ मे रोजीच मिळणार आहे.
अन्य उमेदवारांच्या मतांचे गणित
डॉ. प्रकाश आंबेडकराच्या बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवाराबरोबरच कागल तालुक्यातील असलेले सिद्धार्थ नागरत्न हे बहुजन मुक्ती पार्टी तर्फे निवडणूक लढवित होते. या दोघांनी किती मते घेतली आहेत? हा सुद्धा महत्त्वाचा घटक आहे. कारण आर.पी. आय.चे कार्यकर्ते फारसे सक्रिय दिसत नव्हते. शिवसेना व राष्ट्रवादीनेही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे, असे वातावरण तयार झाले होते.

Web Title: 'Shampoosity' to the Mandalis, 'Shankar' to Mahadik?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.