मकर संक्रांतीसाठी सजली बाजारपेठ, भोगी उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 05:00 PM2019-01-14T17:00:29+5:302019-01-14T17:04:43+5:30

गोड-गोड बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिला सण असलेली मकरसंक्रांत आज, मंगळवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त बाजारपेठेत तिळगुळाच्या वड्या, काळ्या साडया, ड्रेस, तसेच लहान मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांची खरेदी केली जात होती. दरम्यान, सोमवारी भोगीनिमित्त बाजरीची भाकरी, मिश्र भाजीचा नैवेद्य देवादिकांना दाखविण्यात आला.

Sajalis market for Makar Sankranti | मकर संक्रांतीसाठी सजली बाजारपेठ, भोगी उत्साहात

मकर संक्रांतीला करण्यात येणाऱ्या औसा पूजनासाठी सोमवारी बाजारपेठेत सुगडची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती.

ठळक मुद्देमकर संक्रांतीसाठी सजली बाजारपेठ, भोगी उत्साहातबाजरीची भाकरी, मिश्र भाजीचा नैवेद्य

कोल्हापूर : गोड-गोड बोलण्याचा संदेश देणारा आणि नववर्षातील पहिला सण असलेली मकरसंक्रांत आज, मंगळवारी सर्वत्र साजरी होत आहे. यानिमित्त बाजारपेठेत तिळगुळाच्या वड्या, काळ्या साडया, ड्रेस, तसेच लहान मुलांसाठी हलव्याच्या दागिन्यांची खरेदी केली जात होती. दरम्यान, सोमवारी भोगीनिमित्त बाजरीची भाकरी, मिश्र भाजीचा नैवेद्य देवादिकांना दाखविण्यात आला.

इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षाचा पहिला सण म्हणून मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. भोगी आणि मकर संक्रांती असे दोन महत्त्वाचे दिवस हा सण असतो. हिवाळ्यात बाजरीची भाकरी, तीळ-शेंगदाण्याची पोळी, असे ऊर्जा देणारे पदार्थ आरोग्यदायी असतात. त्यामुळे या सणाला भोगी दिवशी बाजरीची भाकरी, वांग्याचे भरीत, पालेभाज्यांचा गरगट्टा, वरणे, वांगे, मटार, गाजर यांची मिश्र भाजी करून देवतांना नैवेद्य दाखविला जातो. त्यामुळे सोमवारी घरोघरी या आरोग्यदायी जेवणाचा बेत करण्यात आला.


मकरसंक्रांतीसाठी तिळगुळाची मोठी उलाढाल झाली.


मंगळवारी मकर संक्रांत आहे. या दिवशी पुरणाची पोळी किंवा तीळ-शेंगदाण्याची पोळी केली जाते. तसेच काळे कपडे परिधान केले जातात. देव्हाऱ्यावर सुगड ठेवून औसा पूजन केले जाते. एकमेकांना ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ म्हणत तिळगूळ दिले जातात.

वाणाच्या साहित्यांची खरेदी

मकर संक्रांतीपासून पुढे रथसप्तमीपर्यंत घरोघरी हळदी-कुंकूचे आयोजन केले जाते. त्यानिमित्ताने वाण म्हणून एखादी वस्तू दिली जाते. यासाठी बाजारपेठेत स्टीलच्या लहान-मोठ्या गृहोपयोगी वस्तू व साहित्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात होती.

हलव्याच्या दागिन्यांची क्रेझ

या काळात कुटुंबातील लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून त्यांचे बोरन्हाणे केले जाते. त्यानिमित्त बाजारपेठेत हलव्याचे कानातले, गळ्यातल्या सुंदर माळा, कंबरपट्टा, बाजूबंद, किरीट, बांगड्या असे सुंदर अलंकार आले आहेत. या दागिन्यांचीही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. शिवाय अनेक महिला या कलेत पारंगत असल्याने त्यांच्याकडून दागिने बनवून घेण्याचे प्रमाणही अधिक आहे.


 

 

Web Title: Sajalis market for Makar Sankranti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.