साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:34 AM2019-03-14T10:34:07+5:302019-03-14T10:36:10+5:30

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत,’ असे आता सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच इलेक्शन ड्यूटीला जुंपला असल्याचा आविर्भाव इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागत आहे. कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून, या प्रवृत्तीमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे. ​

Saheb is on election duty, disruption of government office work | साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीत

साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीत

googlenewsNext
ठळक मुद्देसाहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत, सरकारी कार्यालयांतील कामकाज विस्कळीतजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेतील वर्दळ थंडावली

कोल्हापूर : जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषदेसह कोणत्याही सरकारी कार्यालयात गेले की ‘साहेब इलेक्शन ड्यूटीवर आहेत,’ असे आता सर्रास ऐकावयास मिळत आहे. निवडणूक विभागाने काही मोजकेच अधिकारी, कर्मचारी आपल्या दिमतीला घेतले असले तरी सरकारी कार्यालयात मात्र जणू काही सर्व विभागच इलेक्शन ड्यूटीला जुंपला असल्याचा आविर्भाव इतर अधिकारी, कर्मचारी दाखवीत आहेत. त्यामुळे काम घेऊन येणाऱ्यांना हात हलवत माघारी परतावे लागत आहे. कामे होत नसल्याने वर्दळही कमी होत असून, या प्रवृत्तीमुळे सरकारी कार्यालयांतील कामकाजही विस्कळीत झाले आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी रविवार (दि. १०) पासून आचारसंहिता सुरू झाली आहे. २३ एप्रिलला मतदान होईपर्यंत ती सुरूच राहणार आहे. त्यामुळे अजून दीड महिना सर्वच सरकारी कार्यालयातील हीच अवस्था दिसणार आहे. निवडणूक विभागाने जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, आरटीओ, पोलीस, शिक्षण, सहकार, पाटबंधारे, इत्यादी विभागांतून कर्मचारी निवडणुकीच्या कामासाठी घेतले आहेत. निवडणूक ड्यूटी लागलेले कर्मचारी एकूण संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या एक चतुर्थांशही नाहीत. तरीही निवडणुकीच्या नावाखाली बरीच सरकारी कार्यालये ओस पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

निवडणूक कामाचा अनुभव असल्याने महसूल, सहकार, शिक्षण या विभागांतील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या कामासाठी घेतले जाते. सहकारातील जिल्हा उपनिबंधकांसह निम्मे कर्मचारी या कामासाठी घेण्यात आले आहेत; त्यामुळे या कार्यालयातील कामकाज सध्या थंडावले आहे. मार्च एंडिंगची कामे असतानाही निम्मे कर्मचारी नसल्याचा परिणाम कामकाजावर दिसत आहे. हीच परिस्थिती जिल्हा परिषदेत दिसत आहे.

पंचायत समिती व मुख्यालयातील जवळपास १७५ कर्मचारी निवडणुकीसाठी घेतल्याने त्यांच्या कामाचा ताण त्यांच्या विभागातील इतर कर्मचाºयांवर येत असल्याचे दिसत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांपासून ते पूर्ण प्रशासन सांभाळणारे सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इलेक्शन ड्यूटीवर असल्याने अन्य कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे रान मोकळे मिळाले आहे.

दहावी, बारावी वगळून सर्व शिक्षक निवडणूक कामासाठी घेतले असल्याने त्यांना आतापासून शाळा व निवडणुकीच्या कामांसाठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे १० एप्रिलच्या आत परीक्षा घेऊन पूर्णवेळ निवडणूक कामाला देण्याचे बंधन शिक्षकांना घालण्यात आले आहे. आचारसंहितेचे कडक पालन करण्यासह उमेदवारी अर्ज भरायला सुरू होण्यापूर्वीची सर्व तयारी या कर्मचाऱ्यांकडून सध्या करवून घेतली जात आहे. अंतिम मतदार यादीनुसार व्होटर स्लिप तयार करणे, मतदारसंघनिहाय मतदारांची माहिती विशेष रकान्यात भरणे, आदी कामे करवून घेतली जात आहेत.

जिल्ह्यातील ६००० कर्मचारी निवडणूक कामात

निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने ३९ हजार २८३ कर्मचारी लागतील, असे गृहीत धरून नियोजन केले आहे. त्यांपैकी २९ हजार ८०९ कर्मचारी, अधिकारी उपलब्ध होण्यासारखे आहेत. त्यातही २३ हजार ६८९ कर्मचारी प्रत्यक्ष कामास पात्र ठरत आहे. यातदेखील आजारी, महिला असे निकष लावून त्याप्रमाणे अंतिम यादी तयार करण्यात येत आहे. आजच्या घडीला सहा हजार कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक कामात आहेत.
 

 

Web Title: Saheb is on election duty, disruption of government office work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.