Kolhapur: वस्त्रोद्योगाला वीज सवलत म्हणजे लबाडाघरचं आवतन, वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 06:32 PM2024-03-14T18:32:21+5:302024-03-14T18:32:47+5:30

प्रत्यक्षात वीज बिलात अंमलबजावणी अपेक्षित

Mixed reaction to textile Electricity subsidy | Kolhapur: वस्त्रोद्योगाला वीज सवलत म्हणजे लबाडाघरचं आवतन, वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया

Kolhapur: वस्त्रोद्योगाला वीज सवलत म्हणजे लबाडाघरचं आवतन, वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया

अतुल आंबी

इचलकरंजी : यंत्रमागासाठी वीजदरात जाहीर असलेल्या सवलतीच्या अंमलबजावणीबाबत शासन निर्णयावर वस्त्रोद्योग क्षेत्रातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यंत्रमागधारकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. यापूर्वीही शासनाने हा निर्णय जाहीर केला होता. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. प्रत्यक्षात वीजबिलातून रक्कम कमी झाल्यानंतरच समाधान व्यक्त होणार आहे. 

ऑनलाइन नोंदणीच्या किचकट अटींमध्ये पुन्हा ही सवलत लालफितीत अडकवली जाऊ नये, अशी अपेक्षाही व्यावसायिकांतून व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोची येथील सभेत यंत्रमानधारकांना वीजबिलात सवलतीची अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत २७ अश्वशक्तीखालील वीज वापर असलेल्या यंत्रमाग व्यावसायिकांना प्रतियुनिटला १ रुपया व २७ अश्वशक्तीवरील परंतु २०१ अश्वशक्तीपर्यंत वीज वापरणाऱ्यांना ७५ पैसे युनिट वीज दर सवलत लागू करण्याचा निर्णय घेतला. गेली सहा-सात वर्षांपासून प्रलंबित मागणीला निवडणुकीच्या तोंडावर का होईना मंजुरी मिळाल्याने यंत्रमाग व्यावसायिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

श्रेयवाद रंगला

या निर्णयाची अंमलबजावणी होण्यासाठी आपणच कसे प्रयत्न केले, याबाबत खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आवाडे यांच्यात श्रेयवाद रंगला. दोघांनीही याबाबतचा संदेश सोशल मीडियावर फिरवले. प्रसिद्धी पत्रकाद्वारेही सर्वांना माहिती दिली.

देशातील २० लाख यंत्रमागापैकी तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यासाठी हा निर्णय आवश्यकच आहे. पूर्वीनुभव पाहता ऑनलाइन नोंदणीच्या किचकट अटींच्या माध्यमातून पुन्हा ही सवलत लालफितीत अडकवीली जाऊ नये, अशी अपेक्षा. - किरण तारळेकर, अध्यक्ष,विटा यंत्रमाग संघ

सवलत पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी, तरच यंत्रमागधारकांना थोडा दिलासा मिळेल ; अन्यथा यंत्रमागधारकांकडून काढून घेतले आणि त्या रकमेचे वितरण केले, असा अन्याय होईल. वस्त्रोद्योग अभ्यास समितीने दिलेला अहवाल लागू केला तरच या व्यवसायाला ऊर्जितावस्था येईल. - विनय महाजन, अध्यक्ष, यंत्रमागधारक जागृती संघटना

मागील वस्त्रोद्योग धोरणामध्ये कोणतीही योजना व सवलती वस्त्रोद्योगास मिळाल्या नाहीत. प्रत्येक वर्षी अर्थसंकल्पामध्ये वस्त्रोद्योगाला वगळले. आताही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वीजबिलाची सवलत म्हणजे गाजर दाखविण्याचा प्रकार आहे. - विकास चौगुले, अध्यक्ष, स्वाभिमानी यंत्रमाधारक संघटना

मंत्रिमंडळ बैठकीच्या अजेंड्यावर कोणताही विषय नसताना आपण केलेल्या घोषणेची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वस्त्रोद्योगाला बूस्टर देण्याचे काम केले आहे. यामुळे अडचणीतील वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा मिळेल. - रवींद्र माने, शिवसेना जिल्हाप्रमुख

वीजबिलात सवलत मिळावी, अशी भावना यंत्रमागधारकांची होती. सर्व पक्षाकडून प्रयत्न सुरू होते. त्या सर्वांचे प्रयत्न यशस्वी झाले. वीजबिल सवलतीचा फायदा यंत्रमागधारकांना उद्योग-व्यवसायवाढीमध्ये मिळाला पाहिजे, याची दक्षता सर्वांनाच घ्यावी लागेल. - अशोक स्वामी, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ, मुंबई

Web Title: Mixed reaction to textile Electricity subsidy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.