धनंजय महाडिक हे ‘ताराराणी’चे नेते,,पराभवाची जखम मी बांधून ठेवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:59 AM2018-02-16T00:59:36+5:302018-02-16T01:02:38+5:30

 The leader of 'Tararani', Dhananjay Mahadik, I hid the defeat of defeat | धनंजय महाडिक हे ‘ताराराणी’चे नेते,,पराभवाची जखम मी बांधून ठेवली

धनंजय महाडिक हे ‘ताराराणी’चे नेते,,पराभवाची जखम मी बांधून ठेवली

Next
ठळक मुद्देमुश्रीफांचा हल्लाबोल : भाजपने पुन्हा घोडेबाजार सुरू केला; पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे द्या धनंजय महाडिक : मुश्रीफ लोकसभेसाठी मलाच मदत करणार

कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालिकेतील घोडेबाजार थांबला होता. मात्र, भाजपने पुन्हा या घातक खेळाची सुरुवात केली आहे. महापालिकेतील मेघा पाटील यांच्या पराभवाची ही जखम मी बांधून ठेवली आहे. हा प्रसंग कुणावरही येऊ शकतो हे लक्षात ठेवा, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी दिला. धनंजय महाडिक हे राष्ट्रवादीचे खासदार असले तरी ते ताराराणी आघाडीचे नेते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

जिल्हा बॅँकेत महापालिकेतील पराभवाबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यांनी नाव न घेता पालकमंत्री चंद्रकांत पाटील व स्पष्टपणे धनंजय महाडिक यांना लक्ष्य केले. मुश्रीफ म्हणाले, ‘महापालिकेच्या निवडणुकीवेळी विचारणा केली असता मी ‘आप्पां’च्या उलटे जाऊ शकत नाही, असे सांगत खासदारांनी पक्षविरोधी काम केले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी जेव्हा ते भाजप आणि पाठिंबा देणाºयांची व्होल्व्हो बस चालवीत आले, त्यावेळी तर कडेलोट झाला. माझी मोहीम काय चालली हे तुम्हाला सगळ््यांना माहिती आहे. पक्षाने आदेश दिल्यास लोकसभेला मी उभारणार हे नक्की आहे.’

मुश्रीफ म्हणाले, ‘आमच्या दोन्ही नगरसेवकांना आम्ही पदे दिली होती. आता पहिल्यांदाच एका भगिनीला ‘स्थायी’चे सभापतिपद देण्याचे सर्वांशी चर्चा करून ठरले. चार दिवस हे दोघेही सहलीला गेले होते; परंतु त्यांनी गद्दारी केली, सूर्याजी पिसाळाची भूमिका बजावली. आमच्या भगिनी या पराभवानंतर रडत बाहेर आल्या; यामुळे मी अस्वस्थ झालो आहे. मी ही अपमानाची जखम बरी होऊ देणार नाही. ती ठसठसली पाहिजे. दोन्ही गद्दारांचे राजकारण आता संपले आहे. केवळ आर्थिक मोहाला बळी पडून त्यांनी पाठीत हा खंजीर खुपसला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आता शांतपणे घ्यावे.

बिद्री आणि इचलकरंजीत तुम्ही भाजपशी युती केली ते चालते का अशी विचारणा केली असता मुश्रीफ म्हणाले, आम्ही बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेत्यांसमवेत समोरासमोर बसून चर्चा करून आघाडी केली. सहकारी संस्थेतील राजकारण वेगळे असते. समरजित घाटगेंसारखे गेल्यावेळीही आमच्यासोबत होते. आता ते भाजपमध्ये गेल्याने आम्हाला भाजपशी युती करावी लागली. इचलकरंजीबाबत जिल्हाधिकाºयांकडे सुनावणी सुरू आहे.

जयंत पाटील प्रायश्चित्त घ्यायला तयार
या धक्कादायक सत्तांतरामध्ये प्रा. जयंत पाटील यांचा हात असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी मुश्रीफ यांची गुरुवारी सकाळी भेट घेतली. याबाबत मुश्रीफ म्हणाले, त्यांनी सकाळी माझी भेट घेतली. माझा यामध्ये काहीही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले. तुम्हाला माझ्याबाबत शंका असेल तर तुम्ही सांगाल ते प्रायश्चित्त घ्यायला मी तयार आहे, असे त्यांनी मला सांगितले. मात्र कुणाचं तरी बळ असल्याशिवाय हे शक्य नाही. हे लपून राहत नाही. मी शोधात आहे. लवकरच सत्य बाहेर येईल, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

धनंजय महाडिकांशी वैयक्तिक दुश्मनी नाही
धनंजय महाडिकांना मी आजही फोन करतो. ते आजही माझा सन्मान करतात. ती त्यांची संस्कृती आहे. मात्र, त्यांनी नाते बाजूला ठेवून ज्या पक्षामुळे आपण खासदार झालो, त्या पक्षाशी प्रामाणिक राहावे, हीच माझी अपेक्षा आहे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.


महाडिकांची जादू का दिसली नाही..?
महादेवराव महाडिक यांनी आपण जादूगार असल्याचा उल्लेख केल्याबाबत विचारणा करता, ‘त्यांची जादू मग विधान परिषदेला का दिसली नाही?’ असा सवाल मुश्रीफ यांनी उपस्थित केला.

आता भाजपने सांभाळून राहावे
हा धक्कादायक खेळ पुन्हा भाजपने सुरू केला आहे. ५० लाख, एक कोटी रुपये देणाºयांनी, सांगलीत दीड लाख घरांमध्ये भेटवस्तू वाटायला सांगणाºयांनी आता यापुढे सांभाळून राहावे, अशा शब्दांत मुश्रीफ यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव न घेता इशारा दिला.


पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे द्या
धनंजय महाडिक : मुश्रीफ लोकसभेसाठी मलाच मदत करणार
कोल्हापूर : मी कोणत्याही निवडणुकीत राष्टÑवादी काँग्रेसच्या विरोधात काम केलेले नाही. माझ्यावर आरोप करण्यापेक्षा पुरावे द्यावेत, असे पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. आगामी लोकसभा निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्यासह पक्षाचे सर्व नेते मला मदतच करतील, अशी अपेक्षाही खासदार महाडिक यांनी व्यक्त केली.

खासदार महाडिक म्हणाले, राष्टÑवादीतील सर्व नेत्यांसह आमदार मुश्रीफ यांचे माझ्यावर प्रेम आहे; पण प्रत्येकाच्या राजकीय भूमिका वेगळ्या असतात; सध्या थोडे संशयाचे मळभ असले तरी पक्षाचे सर्वच नेते मला लोकसभा निवडणुकीसाठी निश्चितच मदत करतील. २०१९ च्या निवडणुकीतही मीच निवडून येणार यात शंका नाही. गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्टÑवादीसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मला सहकार्य केले होते; त्यामुळे मी राष्टÑवादीचे नेते शरद पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच स्थानिक निवडणुकीत प्रचारापासून अलिप्त राहिलो होतो. राष्टÑवादी पक्षाबद्दल मला आजही आदर आहे. आतापर्यंत मी राष्टÑवादीविरोधात कोठेही काम केलेले नाही, तसे नेतृत्वही केलेले नाही; पण याबाबत आरोप करण्यापेक्षा प्रत्यक्ष पुरावे सादर द्यावेत.

ताराराणी आघाडीशी संबंध नाही
महापालिकेत राष्टÑवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक फुटल्याबाबत महाडिक म्हणाले, ‘दोन नगरसेवक फुटल्याने पक्षाची मोठी हानी झाली आहे; पण त्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. महापालिकेच्या राजकारणात मी कधीही लक्ष घातलेले नाही. मी ताराराणी, भाजप आघाडीचे नेतृत्व करीत असतो तर त्यांच्या बैठकांना हजर राहिलो असतो, अशा कोणत्याही बैठकीला मी गेलेलो नाही. शरद पवार चहापानाला घरी आले, त्यावेळी मी सर्वच नगरसेवकांना घरी बोलाविले होते.’
मला कुठं व्होल्व्हो बस चालविता येते?
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तुम्ही भाजप सदस्यांच्या व्होल्व्हो बसचे सारथ्य केल्याची आठवण खासदार महाडिक यांना करून दिली. त्यावेळी त्यांनी हे आरोप फेटाळत, ‘मला कुठं व्होल्व्हो बस चालविता येते?’ असे प्रत्युत्तर दिले.

Web Title:  The leader of 'Tararani', Dhananjay Mahadik, I hid the defeat of defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.