संजय मंडलिकांच्या मेळाव्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी;युतीचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:47 AM2019-03-18T00:47:12+5:302019-03-18T00:47:16+5:30

कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीचे लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या रविवारी रात्री झालेल्या मेळाव्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी ...

The Kolhapuri Pattern of the coalition, the NCP office bearers of the Sanjay Mandlik Mela; | संजय मंडलिकांच्या मेळाव्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी;युतीचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

संजय मंडलिकांच्या मेळाव्यात कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी;युतीचा ‘कोल्हापुरी पॅटर्न’

Next

कोल्हापूर : शिवसेना-भाजप युतीचे लोकसभेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या रविवारी रात्री झालेल्या मेळाव्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. युतीच्या उमेदवारासाठी दोन्ही कॉँग्रेसची मंडळी उपस्थित राहिल्याने आता हा नवा ‘कोल्हापूर पॅटर्न’ उदयाला आल्याचे सांगत, सर्वच वक्त्यांनी महादेवराव महाडिक आणि धनंजय महाडिक यांच्यावर सडकून टीका केली.
येथील जयलक्ष्मी सांस्कृतिक सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. २४ मार्च रोजीची युतीची कोल्हापुरातील जाहीर सभा यशस्वी करण्याचा आणि मंडलिक यांना खासदार करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर म्हणाले, यावेळी कुणाचीही गद्दारी चालणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचे ड्रोन तुमच्यावर नजर ठेवून आहे. कॉँग्रेसचा पाठिंबा आहे म्हणून केवळ त्यांच्यावर विसंबून न राहता काम करा.
प्रारंभी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविकिरण इंगवले यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, आज सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे कोण निवडून येणार, हे सांगण्याची गरज नाही.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव म्हणाले, की आमच्या युतीच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी आज कॉँग्रेसची मंडळी उपस्थित आहेत. त्यांचे अभिनंदन करण्याची अशी वेळ येईल, असे वाटले नव्हते.संजय मंडलिक म्हणाले, भूकंपग्रस्त आणि पूरग्रस्त जसे असतात तसा कोल्हापूर जिल्हा ‘महाडिकग्रस्त’ आहे. शिवाजी चौकातील गणपतीसमोरून महाडिकांचा अश्वमेध सोडल्याचे महादेवराव महाडिक यांनी जाहीर केले होते.
पुतण्या कोल्हापुरातून, सून पलीकडच्या लोकसभा मतदारसंघातून, पुतण्या सांगली जिल्ह्यातून निवडणुकीत उतरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेला हे रुचले नाही. हा अश्वमेधाचा घोडा रोखण्याची ताकद
राजर्षी शाहू महाराजांनी आणि
पंचगंगेच्या पाण्याने इथल्या सर्वसामान्य माणसाला दिली आहे.
यावेळी माजी आमदार सुरेश साळोखे, माजी महापौर विलास सासने, भारती पोवार, मारुतराव कातवरे, अ‍ॅड. महादेव आडगुळे, सागर चव्हाण, सुलोचना नाईकवडे, शिवाजीराव जाधव, विजय जाधव, राहुल चिकोडे, अशोक देसाई, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, विजय सूर्यवंशी, राजू लाटकर, संभाजी जाधव, आशिष ढवळे, गणी आजरेकर, मधुकर रामाणे, संदीप देसाई, विजय खाडे-पाटील, सुजित चव्हाण, प्रताप कोंडेकर, सुभाष रामुगडे, रमेश पुरेकर, प्रवीण केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The Kolhapuri Pattern of the coalition, the NCP office bearers of the Sanjay Mandlik Mela;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.