कोल्हापूर  : पर्यायानंतरच ‘तामगाव-उजळाईवाडी’ मार्ग होणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 11:58 AM2018-07-06T11:58:09+5:302018-07-06T13:13:50+5:30

पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीतील तामगाव-उजळाईवाडी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोलपंप या मार्गाचा पर्याय पुढे आला आहे; मात्र, तामगावच्या ग्रामस्थांना तो अमान्य आहे.

Kolhapur: After this option, the 'Tamgaon-Dhalawadi' route will be closed | कोल्हापूर  : पर्यायानंतरच ‘तामगाव-उजळाईवाडी’ मार्ग होणार बंद

कोल्हापूर  : पर्यायानंतरच ‘तामगाव-उजळाईवाडी’ मार्ग होणार बंद

googlenewsNext
ठळक मुद्देपर्यायानंतरच ‘तामगाव-उजळाईवाडी’ मार्ग होणार बंदतलावाकडील पर्याय अमान्य; संरक्षक भिंतीजवळून रस्त्याची मागणी

कोल्हापूर / उजळाईवाडी : पर्यायी रस्ता उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळाच्या हद्दीतील तामगाव-उजळाईवाडी मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. सध्या तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीतील सुदर्शन पेट्रोलपंप या मार्गाचा पर्याय पुढे आला आहे; मात्र, तामगावच्या ग्रामस्थांना तो अमान्य आहे.



भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरण, आधुनिकीकरणासाठी २७४ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला असून त्याअंतर्गत सध्या संरक्षण भिंती बांधण्याचे काम सुरू आहे. विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या जागेत उजळाईवाडी-तामगाव या मार्गाचा काही भाग येतो. संरक्षक भिंत बांधणे काम सुरू असून हा मार्ग बंद केला जाणार आहे; पण हा मार्ग बंद करू नये, अशी मागणी तामगाव, उजळाईवाडी ग्रामस्थांतून होत आहे.

त्यावर जिल्हा प्रशासनाने या ग्रामपंचायतींना पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे सुचविले आहे. तामगाव तलाव ते गोकुळ शिरगाव हद्दीमधील सुदर्शन पेट्रोलपंप आणि मयूर पेट्रोलपंपाच्या पुढील बाजूने जाणारा मार्ग असे पर्याय समोर आले आहेत. यातील तलावावरून जाणारा मार्ग सोईस्कर नसल्याचे तामगाव ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याऐवजी विमानतळाच्या नव्या संरक्षण भिंतीजवळून मार्ग उपलब्ध करून देण्याची त्यांची मागणी आहे.

ग्रामपंचायतीची मागणी

सध्याचा तामगाव-उजळाईवाडी रस्ता विमानतळ विस्तारीकरणात गेल्याने गावाला पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने वाहतुकीस अडचण निर्माण होत आहे. त्याचप्रमाणे गावामधील रुग्णांना उपचाराकरिता कोल्हापूरपेक्षा उजळाईवाडीमधील आरोग्य केंद्र जवळ व उपयोगाचे आहे.

सध्या कोल्हापूरकडे जाताना तामगाव ते उजळाईवाडी हे अंतर अवघे अडीच किलोमीटर आहे. परंतु हा रस्ता बंद झाल्याने कोल्हापूरकडे जाण्यासाठी एमआयडीसी गोकुळ शिरगावमार्गे तामगाव-उजळाईवाडी अंतर सात किलोमीटर भरते; त्यामुळे सर्व नागरिक, विद्यार्थी, कामगारवर्ग व शेतकरी वर्गाला जादा अंतर प्रवास करावा लागणार आहे; त्यामुळे वेळ वाया जावून जादा पैसे खर्च होणार आहे. तरी पर्यायी रस्ता करून ग्रामस्थांचा जादा अंतराचा प्रवास टाळण्यासह सहकार्य करावे, अशी मागणी तामगाव ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे केली आहे.


विमानतळाच्या सुरक्षेसाठी सध्या संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत सध्याचा रस्ता येत असल्याने तो बंद होणारच आहे; त्यामुळे ग्रामस्थांनी पर्यायी रस्त्याचा विचार करणे आवश्यक आहे.
- संजय शिंदे,
निवासी उपजिल्हाधिकारी


तामगाव - उजळाईवाडी मार्ग विमानतळ प्राधिकरणाच्या नव्या विकास आराखड्यातून जात असल्याने येथील ग्रामस्थांची गैरसोय होणार आहे. दोन्ही गावांना जोडणारा रस्ता कायमस्वरूपी पाहिजे. ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी कमी अंतराचा पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा. याबाबतचा ग्रामसभेचा ठराव पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
- राजेंद्र पावंडे,
सरपंच, तामगाव.

गावे जोडणारे नवे रस्ते राज्य सरकारकडून केले जात आहेत. अशा स्थितीत उजळाईवाडी आणि तामगाव यांना जोडणारा सध्याचा रस्ता बंद करणे अयोग्य आहे. त्याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने पुढील कार्यवाही करावी.
- सुवर्णा माने,
सरपंच, उजळाईवाडी.
 

 

Web Title: Kolhapur: After this option, the 'Tamgaon-Dhalawadi' route will be closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.