Kolhapur: साखर कारखान्याचे वजन काटे तपासणारे यंत्र दहा वर्षापासून लपवल्याचे उघड, कोट्यवधीची हायड्रोलिक व्हॅन

By भीमगोंड देसाई | Published: March 7, 2024 05:40 PM2024-03-07T17:40:43+5:302024-03-07T17:42:01+5:30

गोकुळ कार्यालय आवारात पडून: संभाजी बिग्रेडतर्फे उपरोधिकपणे पूजन

It is revealed that sugar factory weighing fork checking machine was hidden for 10 years, hydraulic van worth crores in Kolhapur | Kolhapur: साखर कारखान्याचे वजन काटे तपासणारे यंत्र दहा वर्षापासून लपवल्याचे उघड, कोट्यवधीची हायड्रोलिक व्हॅन

Kolhapur: साखर कारखान्याचे वजन काटे तपासणारे यंत्र दहा वर्षापासून लपवल्याचे उघड, कोट्यवधीची हायड्रोलिक व्हॅन

कोल्हापूर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आणि खासगी वजन काटे तपासणीसाठी सरकारने दिलेले सुमारे एक कोटी रुपयांचे मोबाइल क्रेन व्हॅन ताराबाई पार्कातील गोकूळच्या कार्यालय परिसरात दहा वर्षांपासून वैधमापनशास्त्र प्रशासनाने लपवल्याचे संभाजी बिग्रेडने गुरुवारी उघड केले.

व्हॅन एकही किलोमीटर न फिरता अक्षरश: सडून जात आहे. त्या व्हॅनचे उपरोधात्मक पूजन नारळ वाढवून बिग्रेडचे रूपेश पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी व्हॅनचा वापर दहा वर्षांपासून न करता वैधमापनशास्त्र विभागाचे अधिकारी प्रत्येक कारखान्यांकडून एक लाख रुपयांचा हप्ता घेऊन वजन काटे तपासणीकडे दुर्लक्ष केले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.

केंद्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने वैधमापन विभागास २०१४ साली अद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली कोटी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन दिली. या व्हॅनद्वारे साखर कारखान्यांचे आणि खासगी मोठे वजन काटे तपासणी बंधनकारक आहे. मात्र, वैधमापनशास्त्र प्रशासनाने हे वाहन ताराबाई पार्कातील गोकूळच्या कार्यालयाजवळ लावले. व्हॅन कार्यालयाच्या परिसरात झाडाखाली लावून ठेवली आहे. त्याचा वापरच नसल्याने ते सडून जात आहे. संभाजी बिग्रेडने या व्हॅनचा शोध घेतला. त्यांनी व्हॅनचा वापर कोठे कोठे केला याची माहिती माहिती अधिकाराखाली घेतली. त्यावेळी वैधमापनशास्त्र प्रशासनाने वापर नसल्याची माहिती दिली. त्यामुळे कोल्हापूरकरांना बिग्रेडच्या कार्यकर्त्यांनी व्हॅनचे दर्शन घडवले. त्याचे पूजन केले.

यावेळी बिग्रेडचे रूपेश पाटील म्हणाले, व्हॅनद्वारे साखर कारखान्यांचे आणि मोठे खासगी काटे तपासणे बंधनकारक आहे. मात्र, एक किलोमीटरही व्हॅन फिरलेली नाही. एका साखर कारखान्यांकडून एक लाख या प्रमाणे एक कोटींचा हप्ता घेऊन वैधमापनशास्त्र प्रशासन कागदाेपत्री वजन काटे तपासल्याची कागदे रंगवली आहेत. ऊस तोड मजुरांचेही काटामारीमुळे नुकसान झाले आहे. याला दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा करणार आहे. दरम्यान, रॅलीत योगेश जगदाळे, राहुल पाटील, अभिजित कांजर, धनंजय मोरबाळे, रंगराव मेतके, सागर कोळी, विवेक मिठारी आदी सहभागी झाले होते.

अधिकारी गायब, खुर्चीला निवेदन चिकटवले..

मोबाइल क्रेन व्हॅनेचे दर्शन आणि पूजन करण्याचे आमंत्रण देण्यासाठी बिग्रेडचे पदाधिकारी वैधमापनशास्त्र कार्यालयात गेले. त्यावेळी सहायक नियंत्रक दत्ता पवार व सर्व निरीक्षक नव्हते. यामुळे पदाधिकाऱ्यांनी निवेदन अधिकाऱ्याच्या खुर्चीला चिकटवले आणि रॅलीने गोकूळच्या कार्यालयावर धडक दिली. तेथील लपवून ठेवलेले क्रेन व्हॅनचे दर्शन घडवले.

गोकुळचा हात असावा

गोकुळच्या डेअरीमधील दूध अचूक मोजावे, यासाठी लढा उभारला आहे. मात्र, याला गोकूळ खोडा घालत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांसह मोठे खासगी वजन काटे तपासणारे व्हॅनही गोकूळ कार्यालय आवारातच लपवून ठेवल्याचा योगायोग नसावा, असाही आरोप रूपेश पाटील यांनी केला.

गोकुळकडून पाच पत्रे तरी बेदखल

वाढीव इमारतीचे बांधकाम करावयाचे आहे. त्यामुळेे क्रेन व्हॅन दुसरीकडे शासकीय जागेत पार्क करावी, अशी पाच पत्रे २०२१ पासून गोकूळच्या कार्यकारी संचालकांनी वैधमापनशास्त्राच्या सहायक नियंत्रकांना दिले आहेत. मात्र, ही पत्रेही बेदखल केली आहेत, असे गोकूळच्या प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title: It is revealed that sugar factory weighing fork checking machine was hidden for 10 years, hydraulic van worth crores in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.