या तर हळव्या रेशीमगाठी...! रक्षाबंधन : ‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2018 01:05 AM2018-08-26T01:05:00+5:302018-08-26T01:05:50+5:30

‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती; बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी...’ भावा-बहिणीचे नाते म्हणजे प्रेम, काळजी, रुसवे, फुगवे अशा भावनांनी भारलेल्या पदराच्या गाठी.

 This is a hilarious silk ... Rakshabandhan: 'Bandha is love, name is Rakhi, Bindhe Bhoaraya in your hands' | या तर हळव्या रेशीमगाठी...! रक्षाबंधन : ‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती’

या तर हळव्या रेशीमगाठी...! रक्षाबंधन : ‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती’

googlenewsNext

‘बंध हा प्रेमाचा, नाव जयाचे राखी, बांधिते भाऊराया आज तुझ्या हाती; बंधन असूनही बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीमगाठी...’ भावा-बहिणीचे नाते म्हणजे प्रेम, काळजी, रुसवे, फुगवे अशा भावनांनी भारलेल्या पदराच्या गाठी. यातील काही नाती रक्ताची, तर काही मनाची. बहीण-भावाच्या नात्याला त्यांनी जपलेय जिवापाड... एरवी फारशी भेट होत नसेल; पण एकमेकांच्या सुख-दु:खात सावली बनून ते साथ करताहेत... राखी पौर्णिमेनिमित्त भावा-बहिणीच्या या अनोख्या नात्यांची गुंफण...!

मानलेल्या ४0 बहिणींचा ‘तो’ बनला सख्खा भाऊ

संदीप आडनाईक ।
कोल्हापूर : साप पकडण्याचा नाद लागला म्हणून ‘वाया गेलेला पोरगा’ समजून वडिलांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच घराबाहेर काढलेल्या पोर्ले तर्फ ठाणे येथील दिनकर चौगुले यांनी आयुष्यभर टक्केटोणपे खात स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. या प्रवासात भेटलेल्या वेगवेगळ्या जातींच्या रक्ताच्या नसलेल्या ४0 हून अधिक मानलेल्या बहिणींकडून आज, रविवारी ते राखी बांधून घेणार आहेत.
सर्पमित्र दिनकर चौगुले १९७७ पासून साप पकडतात.चाळीस वर्षांत ११ वेळा विषारी नागाने त्यांना दंश केले. त्याचे व्रणही अजून त्यांच्या हातापायांवर आहेत. ‘वाया गेलेला मुलगा’ म्हणून त्यांचे घर सुटले; पण गावातीलच मागासवर्गीयांच्या घरात त्यांना आसरा मिळाला. जातिभेदाच्या भिंती तेव्हाच गळून पडल्या. दिनकर पाठीशी असल्यामुळे यातील अनेक बहिणींना एकेकट्याने समाजात समर्थपणे समस्यांशी सामना करण्याचे धैर्य मिळाले.
चाळीस वर्षांच्या प्रवासात अनेक घरांत मायेची माणसे मिळत गेली. दिनकर यांच्या काही बहिणी तर राजस्थानी, परप्रांतीय आहेत. कोकणासह कोल्हापूर जिल्ह्णातील रक्ताच्या नात्यापेक्षा अशा मानलेल्या अनेक बहिणींची माया दिनकर यांना मिळत गेली. या मानलेल्या बहिणी आज, रविवारी सकाळी ११ वाजता पोर्ले येथे रक्षाबंधनाच्या निमित्ताने दिनकर यांना राखी बांधण्यासाठी येत आहेत. यातील बहुतेक सर्व बहिणींची वयाची पन्नाशी उलटली आहे. या सोहळ्यात दिनकर यांच्या पत्नी आणि मुलगीही हिरिरीने पुढाकार घेत आहेत. २२ हजारांच्या साड्यांची खरेदी, बहिणींसाठी गोडाधोडाच्या जेवणाचा थाट असा दिनकर यांचा बेत आहे. पोर्ले येथे वनराईतील झाडांनाही राखी बांधून ते त्यांची परतफेड करणार आहेत. निपाणीच्या देवचंद कॉलेजच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका डॉ. कमलताई हर्डीकर या यावेळी उपस्थित राहणार आहेत.

संकटविमोचक भाऊ
 

प्रदीप शिंदे ।
कोल्हापूर : रक्ताची नाती कदाचित स्वार्थासाठी तुटताना पाहण्यास मिळत असतानाच, कसबा बावड्यातील अ‍ॅड. अर्जुन पाटील यांचे गेल्या २८ वर्षांपूर्वीपासून कॉलेजमध्ये मानलेली बहीण शिल्पजा उत्तम जाधव यांच्याशी रक्ताचे नसले तरी मायेने जोडलेले परमपवित्र भावा-बहिणीचे नाते आज अनेकांसाठी आदर्शवत ठरत आहे.
अ‍ॅड. अर्जुन पाटील, शिल्पजा भोसले व उत्तम जाधव हे विवेकानंद महाविद्यालयातील सवंगडी. शिल्पजा यांना भाऊ नसल्याने त्यांनी अर्जुन पाटील यांना भाऊ मानले. महाविद्यालयीन काळापासून त्या त्यांना राखी बांधू लागल्या. उत्तम जाधव व शिल्पजा यांचा विवाह झाल्यानंतर त्यांचा संसार उभारण्यात अ‍ॅड. पाटील यांनी सदैव मोठ्या भावाची भूमिका बजावली. शिल्पजा व उत्तम यांना मुलगा व मुलगी झाली. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच मुलगी ऋतुजा ही स्पेशल चाईल्ड (मतिमंद) आहे, हे समजल्यावर जाधव कुटुंबीयांवर आभाळच कोसळले. यावेळी अर्जुन पाटील यांनी दोघांना सावरले. शिल्पजा यांचा थोरला मुलगा अजिंक्य याच्या शिक्षणासाठी अ‍ॅड. पाटील हे ‘मामा’ ची जबाबदारी म्हणून त्याला आपल्यासोबत भाड्याच्या खोलीवर तीन वर्षांसाठी घेऊन गेले अन् त्यांनी त्याचा शैक्षणिक पाया भक्कम करून घेतला. या भावा-बहिणीच्या नात्याची वीण गेली २८ वर्षे अखंडपणे जपली आहे.

‘आई’च्या शाळेने मिळवून दिल्या दोन बहिणी
कोल्हापूर : नातं कुठंही जुळतं. त्यात भावा-बहिणीच्या नात्यासाठी वेळ, काळ, वय लागत नाही. अशाच पवित्र नात्याला २० वर्षांहून अधिकचा काळ लोटत आहे. १९९८ साली आठ वर्षांचा मणेरमळा (उचगाव) येथील आकाश डाफळे आपली आई काम करीत असलेल्या शाळेत तिच्या मागे लागून गेला अन् त्याला रक्ताच्या नात्यापेक्षा जवळच्या दोन जुळ्या बहिणी भेटल्या.
आकाशच्या आई विक्रमनगरातील एका खासगी शाळेत अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, त्या शाळेत मंगल मगर या शिक्षिकाही कार्यरत होत्या. आकाश डाफळे आपली शाळा चुकवून, आईच्या पाठीमागे लागून विक्रमनगरातील त्या शाळेत जात असे. या शाळेत १९९८ च्या काळात या मगर टीचरांच्या दोन्ही जुळ्या कन्या अनुजा व आकांक्षा याही त्यांच्या आईला भेटण्यासाठी येत असत. दरम्यान, आकाश लहान असल्याने तो त्या दोन्ही दीदींबरोबर खेळत असे. हीच भेट त्याला रक्ताच्या नात्यापेक्षा जवळच्या दोन बहिणी मिळवून देण्यास कारणीभूत ठरली.

महाविद्यालयीन दिवसांत ते बनले बहीण-भाऊ
कोल्हापूर : महाविद्यालयीन दिवस आयुष्याला अनेक अर्थांनी कलाटणी देऊन जातात... अतूट मैत्रीचे बंध तर जुळतातच; पण मार्गदर्शक, भाऊ-बहीण, पती-पत्नी अशा अनेक नात्यांनी ते आपली ओंजळ भरतात. या जीवनात फुलले मनीषा चिंचवाडे आणि अर्जुन जाधव यांचे भावाबहिणीचे नाते... गेली २० वर्षे हे नाते त्यांनी जिवापाड जपले आहे.
मनीषा चिंचवाडे या कोल्हापुरातल्याच; तर अर्जुन जाधव हे मूळचे साताऱ्याचे. शिक्षणासाठी ते कोल्हापुरात आले. ते शिवाजी विद्यापीठात वसतिगृहात राहत असत. मनीषा चिंचवाडे यांनी एम. ए.ला प्रवेश घेतला. कधीही मित्र न बनवलेल्या मनीषा यांची अर्जुन जाधव यांच्याशी पहिल्यांदा मैत्री झाली. बोलता-बोलता अर्जुन यांनी ‘मला बहीण नाही’ असे मनीषा यांना सांगितले. त्यावर मनीषा यांनी ‘मी तुला राखी बांधली तर चालेल का?’ असे विचारले, अर्जुन आनंदाने तयार झाले. हॉस्टेलच्या जेवणाचा कधी कंटाळा आला तर ते हक्काने मनीषा यांच्या घरी जाऊन जेवत. ते त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य झाले; म्हणून ते कायम त्यांना आपल्या आयुष्यातील माईलस्टोन मानतात.
पुढे मैत्रीण सुषमा यांच्याशी अर्जुन यांचा विवाह झाला. मनीषा या लग्न करून रुकडीच्या सूनबाई झाल्या. अर्जुन हे सध्या विवेकानंद महाविद्यालयात समाजशास्त्राचे प्राध्यापक व विभागप्रमुख आहेत. त्यांच्या कामाचा व्याप वाढला; पण या अंतराने त्यांच्यातील नाते अधिकच गहिरे केले. एकमेकांच्या सुखदु:खात सावलीसारखी साथ करीत त्यांनी बहीण-भावाचे नाते जपले आहे.

Web Title:  This is a hilarious silk ... Rakshabandhan: 'Bandha is love, name is Rakhi, Bindhe Bhoaraya in your hands'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.