सीमाभागातील गाय दूध खरेदी दरात कपात ‘गोकुळ’चा निर्णय : उद्यापासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 12:21 AM2018-06-10T00:21:05+5:302018-06-10T00:21:05+5:30

गाईचे वाढलेले दूध आणि घटलेली मागणी यांमुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न अजूनही कायम आहे. ‘गोकुळ’ने सीमाभागातील गाईच्या दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

 Gokul's decision to cut cow milk prices in the border: Implementation from tomorrow | सीमाभागातील गाय दूध खरेदी दरात कपात ‘गोकुळ’चा निर्णय : उद्यापासून अंमलबजावणी

सीमाभागातील गाय दूध खरेदी दरात कपात ‘गोकुळ’चा निर्णय : उद्यापासून अंमलबजावणी

Next

राजाराम लोंढे ।
कोल्हापूर : गाईचे वाढलेले दूध आणि घटलेली मागणी यांमुळे अतिरिक्त दुधाचा प्रश्न अजूनही कायम आहे. ‘गोकुळ’ने सीमाभागातील गाईच्या दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या, सोमवारपासून प्रतिलिटर २० रुपयांप्रमाणे खरेदी केली जाणार आहे.

जिल्ह्यात गाईच्या दुधाचे उत्पादन कमालीचे वाढले असून, त्याची विक्री कशी करायची असा पेच दूध संघापुढे आहे. शासनाने गाईच्या ३.५ फॅटच्या दुधाची प्रतिलिटर २७ रुपयांनी खरेदी करण्याचे आदेश काढले होते; पण गाईच्या दुधाचा उठाव होत नाही आणि पावडरचे दर पडल्याने सर्वच संघांनी दोन रुपयांची कपात केली. पावडरचे दर घसरल्याने दूध संघांना मदत करण्याचे धोरण सरकारने घेतले; पण त्याचा एक रुपयाही फायदा दूध संघांना होताना दिसत नाही. मार्चमधील पावडर उत्पादनापेक्षा ३० टक्के जादा उत्पादन केले तरच प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली; पण कोल्हापूर जिल्ह्यात मार्चनंतर दुधाचे उत्पादन कमी होते; त्यामुळे या काळात मार्चपेक्षा पावडरचे उत्पादन जादा कसे होणार? यामुळे दूध संघांना त्याचा लाभ दिसत नाही.

‘गोकुळ’ रोज १ लाख ६० हजार लिटरची दूध पावडर करते. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत प्रतिकिलो १२० ते १२२ रुपये, तर देशांतर्गत बाजारपेठेत १२५ ते १३२ रुपये दर आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे संघाचे म्हणणे आहे. जिल्ह्यात गाईचे दूध जादा आहेच; त्याचबरोबर सीमाभागातून गाईचे दूध वाढले आहे; त्यामुळे म्हशीचे दूध ७० टक्के व गाईचे ३० टक्के खरेदी केले जाते. तोटा वाढू लागल्याने संघाने सीमाभागातील गाईच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थानिक दरकपातीची शक्यता
पावडरचे दर असेच राहिले तर स्थानिक गाय दूध खरेदीच्या दरात कपात करावी लागण्याची शक्यता आहे. तशा हालचाली संघाच्या पातळीवर सुरू असल्याचे समजते.

कर्नाटकात गाईचे  दूध वाढले!
आपल्याकडे सप्टेंबरपासून दूध वाढते; पण कर्नाटकात जून महिन्यात दुधाचे उत्पादन वाढते. त्याचा परिणामही संकलनवाढीवर झाला आहे.

 

गाईच्या अतिरिक्त दुधामुळे रोज लाखो रुपयांचा तोटा होत असल्याने सीमाभागातील गाईच्या दूधखरेदीत कपात केली.
- विश्वास पाटील (अध्यक्ष, गोकुळ)

 

Web Title:  Gokul's decision to cut cow milk prices in the border: Implementation from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.