Ganpati Festival श्री गणेशा पुढाकाराचा --- सुखकर्ता दु:खहर्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:19 AM2018-09-15T00:19:10+5:302018-09-15T00:24:29+5:30

Ganpati Festival Shri Ganesha's initiatives --- Soothing sadness | Ganpati Festival श्री गणेशा पुढाकाराचा --- सुखकर्ता दु:खहर्ता

Ganpati Festival श्री गणेशा पुढाकाराचा --- सुखकर्ता दु:खहर्ता

Next

भारत चव्हाण
बुद्धीचे दैवत असलेल्या श्री गणपतीचा उत्सव धुमधडाक्यात सुरू झालाय. सर्वत्र भक्ती आणि शक्तीचा जागर सुरू झालाय. अवघी तरुणाई लाडक्या गणेशाच्या स्वागताला सज्ज होती. गेले महिनाभर अव्याहतपणे राबत होती. वर्गणी गोळा करणे, मंडप उभारणी, मंडपातील आरास, सजावट, आदी कामांत व्यस्त होती. एकदा बाप्पाचं आगमन झालं. ते मंडपात विराजमान झाले. आता बाप्पांची पूजा, आरती अशीच रोजची धूम असेल. सर्वत्र उत्साही, सुगंधी, भक्तिमय वातावरण असेल.

आरतीसह भक्तिगीते ऐकविली जातील. एकंदरीत म्हणाल तर सर्वच भाविक बाप्पाच्या सेवेत, त्याच्या नामस्मरणात तल्लीन झालेले असतील. सर्वांच्या लाडक्या गणपतीने समाज जोडला गेला आहे. समाजातील विविध जातिधर्मांच्या लोकांनी एकत्र येऊन सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्याची प्रेरणा गणपतीकडूनच मिळाली आहे.
प्रत्येक वर्षी भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाचे आगमन होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात हा उत्सव प्रत्येकजण केवळ चार भिंतींच्या आत साजरा करीत होते. प्रत्येकाचे गणपती घरात बसविले जायचे. पूजले जायचे. आजच्याइतके उत्सवाचे अवडंबरही केले जात नसे. उत्सवाचे सार्वत्रिकीकरण झालेले नव्हते. आपल्या बाप्पाची घरच्या घरीच श्रद्धेने पूजा केली जात असे. त्यामध्ये कोणीही मनुष्यप्राणी कुठेही कमी पडत नव्हता. देशाच्या स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले, तसे ब्रिटिशांविरुद्धचे महात्मा गांधींच्या अहिंसावादी मार्गाने आंदोलन सुरू झाले. दुसरीकडे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनीही या रणसंग्रामात भाग घेतला. स्वातंत्र्यासाठीचा रणसंग्राम अधिक गतिमान करण्याच्या हेतूने आणि त्यामध्ये सर्वांचा सहभाग राहावा म्हणून प्रत्येकाच्या मनामनांतील गणपती सार्वजनिक उत्सवाच्या निमित्ताने चौकात आणला.

सार्वजनिक गणेशोत्सव सर्वांत आधी कोणी सुरू केला, याबाबत सध्या मतमतांतरे असली तरी त्या वादात आपणाला पडायचे नाही. परंतु गणेशोत्सवाच्या सार्वजनिक उत्सवातून स्वातंत्र्याच्या लढ्यास गती मिळाली तसेच तत्कालीन समाजातील तरुणांची शक्ती या लढ्याच्या दिशेने परावर्तित झाली हे निर्विवाद सत्य आहे.
आज तरुणांची शक्ती अशा सार्वजनिक गणेशोत्सवात व्यस्त आहे. आजकाल उत्सव भव्य प्रमाणात साजरा झाला पाहिजे हा तरुणांचा निश्चय आणि त्याला पाठिंबा देणे, अर्थसाहाय्य करणे हा राजकारण्यांचा स्वार्थ आहे.

राजकारणी मंडळी मोठी चाणाक्ष आहेत. आपल्या निवडणुकीत उपयोगी पडतील म्हणून मंडळांच्या तरुण कार्यकर्त्यांना हव्या त्या गोष्टी पुरवितात. त्यात कसलीच कमतरता राखत नसतात. वर्षातून एकदा उत्सवाला मदत करणाऱ्या राजकारण्यांच्या निवडणुकीत मात्र ही तरुण पिढीच राबत असते. त्यामुळे राजकारणी आणि मंडळांचे कार्यकर्ते एक घट्ट नातं निर्माण होतं. त्यांच्यामध्ये कोणतीही विधायकता नसते. दिसतो तो केवळ स्वार्थ!
म्हणूनच तरुणांची शक्ती उत्सवाकडून विधायकतेकडे वळविण्याची गरज निर्माण झाली आहे.

लोक फक्त म्हणतात, गणेशोत्सवातून विधायकता जोपासली पाहिजे. अमुक केले पाहिजे, तमुक केले पाहिजे; पण विधायकता म्हणजे काय याचा नेमका अर्थ कोणीतरी समजावून सांगितला पाहिजे, अशी आजची अवस्था आहे. अनेक मंडळांचा खर्च हा मूर्ती, मिरवणूक, साउंड सिस्टीम, रोषणाई यांवरच खर्च होतो. हा खर्च नक्कीच अवास्तव आहे. काही मंडळांनी खर्चाला फाटा देऊन सोन्या-चांदीचे दागिने तयार केले जातात. मग याला विधायकता समजायची का? तर नाही. गणेशोत्सवात वर्गणीच्या रूपात गोळा होणारा सगळा पैसा सत्कारणी लागला तरच त्याला विधायक कार्य झाले असे म्हणता येईल.

समाजातून गोळा होणारा हा पैसा समाजातील गरजू घटकांवर खर्च झाला पाहिजे. मग तो कसा आणि कोणत्या कामांवर खर्च करायचा, त्याची पद्धत कशी असावी याचे काही ठोकताळे ठरवावे लागतील. खरं तर गणेशोत्सव साजरा करणाºया सर्व मंडळांचेच एक महामंडळ स्थापन करून त्याच्या अधिपत्याखाली केवळ दहाच दिवस नाही तर वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदत करता येईल. प्रत्येक मंडळाने हजार-दोन हजार रुपये जरी महामंडळाकडे जमा केले तर बघता-बघता लाखो रुपयांचा निधी गोळा होऊ शकतो. त्यातून असे उपक्रम राबविता येऊ शकतात. त्यात पुढाकाराची आवश्यकता आहे. उत्सवात जल्लोष असलाच पाहिजे, भक्तीही असली पाहिजे. त्याचबरोबर यापुढे सामाजिक भान, उपेक्षितांबद्दल जाणही असली पाहिजे.

Web Title: Ganpati Festival Shri Ganesha's initiatives --- Soothing sadness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.