ठळक मुद्देजमावाने कारचा केला चक्काचुर विद्यार्थी उपचारासाठी रुग्णालयात

कोल्हापूर, दि. ९ : विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या  रिक्षाला रुईकर कॉलनी येथे कारची धडक लागल्याने रिक्षा उलटून रिक्षाचालक आणि चार विद्यार्थी असे एकूण पाच जण जखमी झाले. हा अपघात गुरुवारी सकाळी ९ वाजून वीस मिनिटांनी झाला. या अपघातामुळे संतप्त झालेल्या जमावाने कारचालकाला बेदम मारहाण करीत कारचा चक्काचूर केला.

या प्रकारामुळे संतप्त जमावाने कारचालक रणजित लक्ष्मण माळवी (वय ३० रा. चंदे्र, ता. राधानगरी) मारहाण केल्याने जखमी झाला. हा घटना समजताच शाहूपुरी पोलिस व वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी कारचालकाला जमावातून बाहेर काढले तर जखमी रिक्षाचालक सागर एकनाथ बाबर तसेच सदरबझार येथील कोरगांवकर हायस्कुलच्या चार विद्यार्थ्यांना कदमवाडी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.

जखमी कारचालक रणजित माळवी याच्यावर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शाहूपुरी पोलिसांकडून या अपघाताची माहिती घेण्याचे काम सुरु होते. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय मोरे करीत आहेत.

घटनास्थळावरुन आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक सागर बाबर हे गुरुवारी सकाळी कोरगांवकर हायस्कुलसह अन्य शाळेचे आठ विद्यार्थी रिक्षामधून (क्रमांक एमएच 0९ सीडब्ल्यू २९४) नेत होते. ही रिक्षा रुईकर कॉलनी येथे आल्यावर शिवाजी तरुण मंडळाच्यासमोरील वळणावर एमएच 0९ डी. एम. ४४८८ या कारची या रिक्षाला धडक लागली.

यात रिक्षा उलटून चार विद्यार्थी जखमी झाले. हा प्रकार समजताच घटनास्थळी जमा झालेल्या परिसरातील नागरिकांच्या जमावाने कारचालक संशयित रणजित माळवी याला बेदम मारहाण केली, तसेच कारची तोडफोड केली.

या अपघाताचे वृत्त समजताच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ आणि शाहपूरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलिस फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.

त्यांनी जमावाला पांगवून कारचालकाची सुटका केली तर जखमी रिक्षाचालक सागर एकनाथ बाबर आणि जखमी विद्यार्थी सिद्धीका परशुराम कोचीकोरवी (वय ५ ), विनायक मनिष कोचीकोरवी (५), पार्थ वसंत कोचीकोरवी व विद्या महेश कोचीकोरवी (सर्व रा. कावळा नाका परिसर) या जखमींना येथील रहिवासी रमेश पाटील, शाम नायर, विकी आंबरे आदींनी बाहेर काढले. त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.