Due to GST bump, work on Kalam, Tabla, Harmonium repaired artisans | जीएसटीच्या दणक्यामुळे वाद्य खरेदीपेक्षा दुरुस्तीकडे कल, तबला, हार्मोनियम दुरुस्ती कारागीरांकडे काम वाढले

- सचिन भोसले
कोल्हापूर  - जीएसटी च्या अंमलबजावणीनंतर ब्रँडेड अन्न धान्यासह विविध वस्तुंच्या किंमतीत वाढ झाली. त्याचा परिणामही संगीत क्षेत्रातील वाद्यांवरही पडला आहे. त्यामुळे नवी वाद्ये खरेदी करण्यापेक्षा आहेत ती वाद्ये दुरुस्ती करुन घेण्याकडे कलाकारांचा कल वाढला आहे.  तबला, पखवाज, ढोलकी, स्वर पेटी ( हार्मोनियम) दुरु स्ती कारागीरांकडे काम वाढले आहे. 

आजच्या आधुनिक तंत्रज्ञान काळात इलेक्ट्रॉनिक्स वाद्यांचा बोलबाला अधिक आहे. तरीही काही गायकांना स्वरपेटी व तबल्याची साथ नसल्यास गीते गाता येत नाहीत. तर संगीतकारांना गीतांना लयबद्ध करता येत नाही. यात मराठीतील संगीत दिग्दर्शक अशोक पत्की, गायक सुरेश वाडकर, अनुप जलोटा, यांच्यासह अन्य दिग्गज कलाकारांचा समावेश आहे. तबल्याला पर्याय म्हणून फायबरचे इलेक्ट्रॉनिक वाद्य बाजारात आले आहे.  तर हार्मोनियमला कॅशिओचा पर्याय आला आहे. तरीही पारंपारीक वाद्ये म्हणून स्वरपेटी (हार्मोनियम), तबला-डग्गा, पखवाज, ढोलकी, याच्या मागणीत काही केल्या घट नाही. जीएसटीमुळे ही वाद्यांच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे नव्या वाद्यांची खरेदीचा वेग मंदावला आहे. नव्या वाद्यांच्या खरेदीपेक्षा जुनी स्वरपेटी , तबला-डग्गा, ढोलकी, पखवाज दुरुस्ती करुन घेण्याकडे कलाकारांचा ओढा वाढला आहे. यात ५० वर्षाहून अधिक काळची वाद्ये दुरुस्तीकरीता येतात.   

तबल्यासाठी लागणारे ‘आमरोवा सिसम’ लाकूड मेरठहून येते. त्याच्याही किमंती वाढल्या आहेत. भावनगरहून येणारी तबल्याला लागणारी लोखंडाची राख अर्थात शाईच्या दरातही वाढ झाली आहे.  तर हार्मोनियम (स्वरपेटी)मध्ये पंजाब मॉडेलला मागणी अधिक आहे. याचे दुरुस्तीचे मटेरियल मुंबई, पंजाब, नागपूर, कोलकत्ता येथून कोल्हापूरात येते. त्याचाही किंमती वाढल्या आहेत. 

यांच्याकडून मागणी अधिक 

ढोलकीला दत्तपंथी भजनी मंडळ, आॅकेस्ट्रा, तमाशाकडून , तर वारकरी संप्रदाय (विठ्ठलपंथी)- पखवाजला मागणी अधिक आहे.  गायन, नाट्यसंगीत, मालिका ते चित्रपटाच्या संगीतापर्यंत तबला, डग्गा यांनी मागणी आजही पुर्वीपेक्षा जादा आहे. डग्गामध्ये स्टील, तांबे, पितळ याचा समावेश आहे. यात पितळ व तांबे महागल्याने स्टिलच्या स्वस्त डग्यांना मागणी अधिक आहे. तबला, स्वरपेटी शिकण्याकडे महीला वर्गाचा कल वाढला आहे. त्यामुळे खासगी संगीत शिकवणी वर्गाकडून या वाद्यांना मागणी अधिक आहे.   

व्हॉटस्अपच्या जमान्यांत दर्दी सांगितिक श्रोते अजूनही आहेत. त्यामुळे हार्मोनियम (स्वरपेटी) चा बाज आजही टिकून आहे. नव्या खरेदीपेक्षा जुनी वाद्ये दुरुस्ती करुन घेण्याकडे कलाकारांचा कल आहे. आजही नवे तंत्रज्ञान आले तरी गायक, संगीतकारांना तबला, ढोलकी, हार्मोनियमची साथसंगत लागतेच. 

- सुरेंद्र जाधव, हार्मोनियम दुरुस्ती कारागीर  
 

तबला, डग्गा यांच्या किंमती जीएसटीमुळे वाढल्या आहेत. त्यामुळे नवी वाद्ये खरेदीपेक्षा त्यात शाई लावणे, वाद्या आवळणे, आदींच्या दुरुस्तीसाठी ओघ वाढला आहे. 

-सुनील पाले, तबला दुरुस्ती कारागीर


Web Title: Due to GST bump, work on Kalam, Tabla, Harmonium repaired artisans
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.