Kolhapur: गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, फरकापोटी १०१ कोटी जमा होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 02:28 PM2023-10-20T14:28:21+5:302023-10-20T14:29:44+5:30

जिल्ह्यासह सीमाभागातील गोकुळच्या ५ हजार २०० दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना दर फरकाचा लाभ होणार

Diwali gift from Gokul to milk producers, 101 crores will be collected for difference | Kolhapur: गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, फरकापोटी १०१ कोटी जमा होणार

Kolhapur: गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, फरकापोटी १०१ कोटी जमा होणार

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) दूध उत्पादकांना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही म्हैस व गाय दूध दर फरकापोटी १०१ कोटी ३४ लाख रुपये प्राथमिक दूध संस्थांच्या बँक खात्यावर २३ ऑक्टोबरला जमा होणार आहेत. संघाकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट मिळेल, अशी माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गुरुवारी दिली.

ते म्हणाले, संघाने म्हैस दुधासाठी ५६ कोटी ३८ लाख १९ हजार रुपये तर गाय दुधासाठी २७ कोटी ९९ लाख ८२ हजार रुपये इतका दूध दर फरक व दर फरकावर ६ टक्के प्रमाणे होणारे व्याज ३ कोटी ३१ लाख ४६ हजार व डिंबेचर व्याज ७ टक्के प्रमाणे ७ कोटी १२ लाख ९५ हजार रुपये व शेअर्स भांडवलावर ११ टक्के प्रमाणे लाभांश ६ कोटी ५० लाख ९२ हजार रूपये असे एकूण १०१ कोटी ३४ लाख रूपये इतकी रक्कम स्वतंत्र दूध बिलातून दूध संस्थाच्या खात्यावर बँकेत जमा केली जाणार आहे. दर फरकाचा लाभ जिल्ह्यासह सीमाभागातील गोकुळच्या ५ हजार २०० दूध संस्थांच्या ५ लाख ५० हजार दूध उत्पादक सभासदांना होणार आहे. 

दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या एकूण १०१ कोटी ३४ लाख रुपये अंतिम दूध दर फरका व्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षात जवळजवळ ३८ कोटी रुपये सेवा, सुविधांवर खर्च केले आहेत. दूध विक्रीचे मागील सर्व उच्चांक मोडीत काढून एका दिवसात रमजान ईद सणानिमित्त २ मे २०२३ रोजी २० लाख लीटरची दूध विक्री केली आहे. पालकमंत्री व गोकुळचे नेते हसन मुश्रीफ, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील व आघाडीचे सर्व नेते मंडळींच्या मार्गदर्शनाखाली सभासद दूध संस्था तसेच दूध उत्पादकांच्या सहकार्यामुळे गोकुळची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

म्हैस दुधास दोन रुपये २५ पैसे

डोंगळे म्हणाले, आर्थिक वर्षाच्या १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत गोकुळला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ८० पैसे व गाय दुधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ८० पैसे याप्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक मिळणार आहे. यापैकी प्रतिलिटर ०. ५५ पैसे प्रमाणे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी गोकुळकडे जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांना निव्वळ प्रतिलिटर म्हैस दुधास २ रुपये २५ पैसे व गाय दुधास प्रतिलिटर १ रुपये २५ पैसे अंतिम दूध दर फरक देण्यात येईल.

Web Title: Diwali gift from Gokul to milk producers, 101 crores will be collected for difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.