Congress Jan Sangharsh Yatra कोल्हापूरची जागा द्या; मी निवडून आणतो : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2018 01:17 AM2018-09-01T01:17:58+5:302018-09-01T01:19:37+5:30

कोल्हापूर लोकसभेची जागा द्या.. मी निवडून आणतो... निवडून येईल असा उमेदवार माझ्याकडे असून त्याचे नाव योग्यवेळी जाहीर करू... आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून नाही आणला तर मुंबईला येणार नाही, असे जाहीर आव्हान

Congress Jan Sangharsh Yatra give place to Kolhapur; I choose: Sage Patil's demand | Congress Jan Sangharsh Yatra कोल्हापूरची जागा द्या; मी निवडून आणतो : सतेज पाटील

Congress Jan Sangharsh Yatra कोल्हापूरची जागा द्या; मी निवडून आणतो : सतेज पाटील

Next
ठळक मुद्देकळंब्यात जाहीर सभा; कोल्हापूरच्या जागेसाठी प्रयत्न करू : अशोक चव्हाण

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेची जागा द्या.. मी निवडून आणतो... निवडून येईल असा उमेदवार माझ्याकडे असून त्याचे नाव योग्यवेळी जाहीर करू... आणि काँग्रेसचा उमेदवार निवडून नाही आणला तर मुंबईला येणार नाही, असे जाहीर आव्हान आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी येथे दिले. गतवेळी राष्टवादीचे खासदार धनंजय महाडिक यांना आम्ही निवडून आणले; पण त्यांनी गद्दारी केली, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

कळंबा (ता. करवीर) येथील साईमंदिर येथे कॉँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेनिमित्त आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेस प्रचंड प्रतिसाद लाभल्याने सर्वच कॉँग्रेस नेत्यांनी जोरदार भाषणे करत केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारच्या कारभाराचा पर्दाफाश केला.

सतेज पाटील म्हणाले, गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही पक्षाच्या आदेशानुसार व शिस्तीनुसार राष्टÑवादी कॉँग्रेसचे उमेदवार धनंजय महाडिक यांना मदत केली; परंतु विधानसभा निवडणुकीत त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांसह उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की, कोल्हापूरची जागा कॉँग्रेसला द्यावी. ही जागा निवडून आणण्याची जबाबदारी मी घेत आहे; कारण निवडून येईल असा उमेदवार माझ्याकडे आहे. खासदार निवडून आणल्याशिवाय आपण गप्प बसणार नाही; तसेच ही जबाबदारी मी पूर्ण केली नाही तर मी पुन्हा मुंबईला फिरकणार नाही, असा ‘शब्द’ त्यांनी यावेळी दिला.
यावर खा. अशोक चव्हाण म्हणाले, सतेज पाटील म्हणतील तो उमेदवार आम्ही देऊ. कोल्हापूरची जागा कॉँग्रेसला मिळण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यामार्फत कॉँग्रेसच्या केंद्रीय समितीकडे पाठपुरावा करू; त्यामुळे या उमेदवाराला निवडून आणत त्याच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यासाठी तयार राहा.

कॉँग्रेसचे महाराष्टचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, भाजप सरकारने सर्वच थरांतील लोकांची निराशा केली आहे. दलितांवर, महिलांवर अन्याय झाल्यानंतरही मोदी काही उत्तर देत नाहीत. भ्रष्टाचार करून देणार नाही म्हणणाऱ्या मोदींच्या काळात सर्वांत जास्त भ्रष्टाचार झाला. त्याचे उत्तर देत नाहीत. भ्रष्टाचार, आतंकवाद आणि काळा पैसा याला आळा घालण्यासाठी नोटाबंदी जाहीर केली, असे मोदी यांनी सांगितले; परंतु यातील एकाही गोष्टीला आळा बसला नाही. देशाला मात्र त्याची मोठी किंमत मोजावी लागली.

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, कोल्हापूरची भूमी ही प्रेरणादायी असल्याने जनसंघर्ष यात्रेची सुरवात कोल्हापुरातून केली. या सरकारने अनेक आश्वासने दिली; पण एकही पूर्ण केले नाही; त्यामुळे त्यांचा ढोंगीपणा उघड झाला आहे. ‘खोटं बोल पण रेटून बोल’ अशी त्यांची प्रवृत्ती असल्याने जनता आता फसणार नाही, असेही ते म्हणाले.
खर्गेंच्या टॉप गिअरने आली गती : बाळासाहेब थोरात
कॉँग्रेस पक्षाचे प्रभारी पद स्वीकारल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी टॉप गिअर टाकण्याचे काम केल्याने पक्षाला गती मिळाली आहे. इथून पुढे एक महिना आम्ही राज्यभर जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्यभर फिरणार असून, या माध्यमातून जनतेमध्ये भाजप सरकारविरोधात उठाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला.

गट-तट विसरा अन् एकत्र या : हर्षवर्धन पाटील
गट-तट विसरून नेत्यांनी एकत्र येण्याची वेळ आली आहे. आपल्या पक्षावर, कुटुंबावर हा हल्ला आहे. हे लक्षात घेऊन आपापसांतील मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही, असे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. मोदींच्या सरकारमध्ये १ लाख ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार : रणपिसे
कॉँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे म्हणाले, ‘न खाऊॅँगा, न खाने दूॅँगा...’ असे म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी राफेल विमान खरेदीबद्दल बोलायला तयार नाहीत. त्यामुळे येथील भ्रष्टाचाराबाबत राहुल गांधींनी प्रश्न एक लाख कोटीचे कंत्राट दिले असून यामध्ये ७० हजार कोटींचा घोटाळा झाला आहे.
दरम्यान, यावेळी झालेल्या भाषणात माजी मंत्री बसवराज पाटील यांनी झोेपेचे सोंग घेतलेल्या सरकारला हटवा असे आवाहन केले तर भाजप सरकारविरोधात आवाज उठविणाºयांना संपविले जाते. एक तर त्यांना गोळ्या मारल्या जातात किंवा त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात, असा आरोप कॉँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा अ‍ॅड. चारूलता टोकस यांनी केला.
जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून सतेज पाटील यांनी योग्य नियोजन करून नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. त्यामुळे एक दिवस ‘दक्षिण’चे नेतृत्व महाराष्ट्राला मिळाल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत आमदार विश्वजित कदम यांनी सतेज पाटील यांचे कौतुक केले.
भाजप सरकारने घेतलेला नोटाबंदीचा निर्णय हा चुकीचा नव्हत; तर तो संघटितपणे केलेला सर्वांत मोठा भ्रष्टाचार होता, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर यांनी केली.
 

आमदारांनी केली पेन्शन बंद
गोरगरिबांसाठी कॉँग्रेस सरकारने सुरू केलेल्या ‘संजय गांधी निराधार’सारख्या पेन्शन योजना बंद करण्याचे काम कोल्हापूर दक्षिणच्या विद्यमान आमदारांनी केल्याचा टोला सतेज पाटील यांनी आ. अमल महाडिक यांचे नाव न घेता लगावला. तसेच अनेक योजना बंद करून गोरगरिबांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम भाजप सरकारने केल्याचा आरोपही आमदार पाटील यांनी केला.
 

सतेज पाटील यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन
कळंबा येथील जाहीर सभेच्या निमित्ताने आमदार सतेज पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत कोल्हापूर दक्षिणचे रणशिंग फुं कले. सभास्थळी मतदार संघातील गावांसह उपनगरांतून तरुण कार्यकर्ते मोटारसायकलवरून रॅलीद्वारे घोषणा देत येत होते. गावागावांतून कार्यकर्त्यांसह महिलांचेही जथ्थेच्या जथ्थे सायंकाळी सभास्थळी येत होते. परिसरात जनसंघर्ष यात्रेचे फलक व कॉँग्रेसचे ध्वज लावल्याने संपूर्ण परिसर कॉँग्रेसमय झाल्याचे वातावरण झाले होते.
 

कॉँग्रेसमय जिल्ह्याची जबाबदारी सतेज यांच्याकडे
संघर्ष यात्रेची सुरुवात चांगली झाली याचे श्रेय सतेज पाटील यांना जाते, असे सांगत अशोक चव्हाण म्हणाले की, आजच्या नियोजनाचे ‘मॅन आॅफ द मॅच’ आहेत. ते आमचे विराट कोहली आहेत. त्यांच्या संघटन कौशल्यामुळे नव्या पिढीला प्रोत्साहन मिळत आहे. जिल्ह्याचे आगामी नेतृत्व सतेज पाटील यांच्याकडे दिले जाईल. जिल्ह्यावर तिरंगा फडकावण्याचे जिल्हा कॉँग्रेसमय करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाईल. ‘कॉँग्रेसच्या प्रवाहात वाहून घेणारा नेता’ अशी त्यांची ओळख असल्याने ते हे काम चोखपणे करतील अशी अपेक्षा आहे.
 

मनुवादाचे दुष्टचक्र संपवूया : चव्हाण
देशात आज कोणीही सुरक्षित राहिलेला नाही. मनुवादाच्या विचारसरणीवर देशाची वाटचाल सरू झाली आहे. हा मनुवाद संपविण्याचे काम आपणाला करायचे आहे, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, संघर्षयात्रेला मिळालेला प्रतिसाद पाहता जनतेचा मूड बदलत असल्याचे पाहायला मिळते. देशाचे संविधान, लोकशाही वाचवायची असेल तर मोदी सरकार सत्तेतून घालवायला पाहिजे, याची जाणीव आता झाली आहे.
सरकार ‘आरएसएस’चा विचार रूजवत आहे : खान
सध्याचे भाजप सरकार नागपूर येथे केंद्र असलेल्या ‘आरएसएस’चा विचार राज्यातील प्रत्येक भागात रूजविण्याचे काम करत असल्याचा आरोप माजी अल्पसंख्याक विकास मंत्री नसीम खान यांनी केला.


प्रकाश आवाडेंना जिल्हाध्यक्ष करा
जयवंतराव आवळे : अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी; विविध संघटनांची भेट

कोल्हापूर : जिल्ह्यात काँगे्रेस बळकट करण्यासाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करा, अशी लेखी मागणी शुक्रवारी माजी मंत्री जयवंतराव आवळे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली. यामुळे पुन्हा एकदा कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे.
आवळे आणि आवाडे यांचे राजकीय वैर जिल्ह्याला माहिती आहे; मात्र एकीकडे इचलकरंजी नगरपालिकेतील सत्ता गेल्याने आवाडे यांनाही वास्तव समजले, तर दुसरीकडे मुलाच्या विधानसभेसाठी आवळे यांनीही एक पाऊल मागे घेत आवाडे यांच्याशी आता जुळवून घेण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या महिन्यात या घडामोडी घडल्यानंतर आवळे यांनी शुक्रवारी थेट प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनाच पत्र देऊन आवाडे यांना जिल्हाध्यक्ष करण्याची मागणी केली. येत्या काही दिवसांत या मागणीच्या समर्थनार्थ आणखी काही नेते पुढे येण्याची शक्यता आहे.
केशवराव भोसले नाट्यगृहातील सभा संपल्यानंतर सर्व काँग्रेस नेत्यांनी शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला. त्यानंतर सर्वजण हॉटेल सयाजीवर दाखल झाले. तासाभराच्या विश्रांतीनंतर संध्याकाळी सहानंतर सर्वजण कळंबा सभेसाठी रवाना झाले. या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय डी. पाटील यांनीही यावेळी या मान्यवरांची भेट घेतली.
धनगर युवा संघटनेचे बबन रानगे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या सर्वांची भेट घेऊन धनगर आरक्षणाची मागणी केली. उमेश पोर्लेकर यांनीही कार्यकर्त्यांसह अशोक चव्हाण यांची भेट घेतली. यावेळी कर्नाटकमधील माजी आमदार वीरकुमार पाटील, बाळासाहेब सरनाईक,  प्रा. किसन कुराडे, राहुल आवाडे, तौफिक मुल्लाणी उपस्थित होते.

Web Title: Congress Jan Sangharsh Yatra give place to Kolhapur; I choose: Sage Patil's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.