शाहू महाराज मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करा, महापौरांच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 11:36 AM2018-07-05T11:36:42+5:302018-07-05T11:42:54+5:30

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत समाधिस्थळावर उभारल्या जाणाऱ्या मेघडंबरीचे काम पूर्ण करा, अशा सक्त सूचना महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिकेचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार, आर्किटेक्ट यांना दिल्या. यापुढे कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी महापौर बोंद्रे यांच्यासह उपमहापौर महेश सावंत यांनी दिला. ​​​​​​​

Complete the work of Shahu Maharaj before August 15, Mayor's suggestion | शाहू महाराज मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करा, महापौरांच्या सुचना

कोल्हापुरातील नर्सरी बागेत राजर्षी शाहू समाधिस्थळावर उभारण्यात येणाऱ्या मेघडंबरीच्या कामाची पाहणी बुधवारी महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केली. यावेळी दिलीप पोवार, विलास वास्कर, सुरेखा शहा, शोभा कवाळे, अफजल पीरजादे, किशोर पुरेकर उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देशाहू महाराज मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण करा, महापौरांच्या सुचना काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी

कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधिस्थळाचे काम रेंगाळल्याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करतानाच येत्या १५ आॅगस्टपर्यंत समाधिस्थळावर उभारल्या जाणाऱ्या मेघडंबरीचे काम पूर्ण करा, अशा सक्त सूचना महापौर शोभा बोंद्रे यांनी महापालिकेचे अधिकारी, शिल्पकार, ठेकेदार, आर्किटेक्ट यांना दिल्या. यापुढे कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही, असा इशाराही यावेळी महापौर बोंद्रे यांच्यासह उपमहापौर महेश सावंत यांनी दिला.

गेली अडीच वर्षे नर्सरी बागेतील खुल्या जागेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे समाधिस्थळ उभारले जात आहे. त्यासाठी महापालिकेने अंदाजपत्रकात विशेष तरतुदही केली आहे; परंतु अडीच वर्षांनंतरही हे काम रेंगाळले असून, ते कधी पूर्ण होणार याबाबत साशंकता आहे. त्यामुळे महापौर शोभा बोंद्रे यांनी समाधिस्थळावरच बैठक आयोजित केली होती.


कोल्हापुरातील नर्सरी बागेत राजर्षी शाहू समाधिस्थळावर उभारण्यात येणाऱ्या मेघडंबरीच्या कामाची पाहणी बुधवारी महापौर शोभा बोंद्रे, आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केली. यावेळी दिलीप पोवार, विलास वास्कर, सुरेखा शहा, शोभा कवाळे, अफजल पीरजादे, किशोर पुरेकर उपस्थित होते.

या बैठकीला उपमहापौर महेश सावंत, सभागृह नेता दिलीप पोवार, विरोधी पक्षनेता विलास वास्कर, कॉँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, महिला बालकल्याण सभापती सुरेखा शहा, शिक्षण सभापती अशोक जाधव, नगरसेविका शोभा कवाळे, नगरसेवक अफजल पीरजादे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने, ठेकेदार व्ही. के. पाटील, आर्किटेक्ट अभिजित जाधव उपस्थित होते.

समाधिस्थळाचे काम पाहून सर्वच पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. काम अतिशय संथ गतीने सुरू असून आतापर्यंत ते पूर्ण व्हायला पाहिजे होते, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. शाहूंच्या समाधिस्थळाच्या कामाबाबत अशी दिरंगाई व उदासीनता यापुढे खपवून घेणार नाही. जर दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरण्यात येईल, असे उपमहापौर सावंत यांनी सांगितले.

ठेकेदार पाटील यांनी यावेळी खुलासा करताना सांगितले की, समाधिस्थळाचे सिव्हिल काम पूर्ण झाले आहे. संरक्षक भिंतीचे कामही या आठवड्यात सुरू होईल. समाधिस्थळावरील मेघडंबरी पूर्वी दगडी होती, तिचे डिझाईन बदलण्यात आले.

आता ती ब्रॉँझपासून बनविली जात आहे. तिच्या नक्षीदार कामास विलंब होत आहे. ठेकेदाराने हा खुलासा केल्यावर महापौर बोंद्रे यांनी शिल्पकार किशोर पुरेकर यांच्या बापट कॅम्प येथील कार्यशाळेत जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वजण तेथे गेले.

मेघडंबरीचे काम अधिक कलाकुसरीचे असल्याने ओतीव काम, फिनिशिंगचे काम अतिशय किचकट व वेळखाऊ असल्याने विलंब होत आहे. तरीही बरेच काम पूर्ण झाले आहे. अजून एक-दीड महिना तरी या कामास लागतील, असे शिल्पकार पुरेकर यांनी सांगितले. पाहणीनंतर कामास का विलंब होत आहे, हे सर्वच पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आले. शेवटी महापौर बोंद्रे यांनी १५ आॅगस्टपर्यंत काम पूर्ण करा, अशी सूचना केली.

इटलीनंतर कोल्हापुरातच

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधिस्थळावर उभारण्यात येत असलेली ब्रॉँझची मेघडंबरी ही इटलीनंतर पहिल्यांदाच कोल्हापुरात तयार केली जात आहे. राजर्षी शाहू महाराज यांचे आजोबा छत्रपती राजाराम महाराज यांची एक समाधी इटलीमधील फॉरेन्सिक शहरात आहे.

राजाराम महाराज यांचे निधन इटलीमध्ये झाले. त्यांच्या स्मरणार्थ राजर्षी शाहू महाराज यांनी तेथे मेघडंबरी उभी केली आहे. तशी हुबेहुब मेघडंबरी कोल्हापुरातील समाधिस्थळावर उभारली जात आहे. तिचे खांब हे भवानी मंडपातील खांबासारखे आहेत. आतापर्यंत तीन टन ब्रॉँझ त्यासाठी वापरण्यात आले आहे.

बैठकीतील निर्णय -

  1. - येत्या आठ दिवसांत संरक्षक भिंतीचे काम सुरू करणार.
  2. - लॅँडस्केपिंग व फरशी बसविण्याचे कामही सुरू करणार.
  3. - मेघडंबरीचे काम १५ आॅगस्टपर्यंत पूर्ण करणार.
  4. - त्यानंतर पुढील दहा दिवस प्रत्यक्ष समाधिस्थळी बसविणार.
  5. - सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात समाधिस्थळाचे लोकार्पण.

 

 

 

Web Title: Complete the work of Shahu Maharaj before August 15, Mayor's suggestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.