‘चंदगड’मध्ये अवैध धंदे राजरोस !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:10 AM2019-04-15T00:10:21+5:302019-04-15T00:10:26+5:30

नंदकुमार ढेरे । लोकमत न्यूज नेटवर्क चंदगड : तालुक्यात मटका, गुटखा, गोवा बनावटीचे मद्य, हातभट्टी आदी अवैध धंदे जोरात ...

'Chandgad' illegal business in Rajros! | ‘चंदगड’मध्ये अवैध धंदे राजरोस !

‘चंदगड’मध्ये अवैध धंदे राजरोस !

Next

नंदकुमार ढेरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंदगड : तालुक्यात मटका, गुटखा, गोवा बनावटीचे मद्य, हातभट्टी आदी अवैध धंदे जोरात सुरू असून तालुक्यातील युवापिढी मात्र बरबाद होत आहे. हे अवैध धंदे बंद होणार का? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.
तालुक्यात वरून बंद असलेला मटका आॅनलाईन पद्धतीने सुरू आहे. तालुक्यात सुरू असलेल्या टाईमपास क्लबमध्ये तीनपानी रमी, जुगार व्हिडिओ मटकागेम व खुला मटका घेतला जात आहे. चंदगड, हलकर्णी फाटा, पाटणे फाटा, हेरे, कोवाड, शिनोळी, माणगाव, अडकूर येथे तर मटका जोरात आहे.
तालुक्यात सुरू असलेल्या टाईमपास क्लबची पोलिसांकडून तपासणी होत नाही आणि झालीच तर नाममात्र होते. तालुक्यात गोवा बनावटीच्या दारूचा महापूर असून गावोगावी एजंटांकरवी स्वस्तात दारू उपलब्ध होत आहे.
चंदगड पोलीस ठाण्यातर्फे सध्या या गोवा बनावटीच्या दारूवर कारवाई करण्याची मोहीम सुरू आहे. १५ दिवसांत उमगाव व शिरगाव या दोन ठिकाणी छापे टाकून अर्ध्या कोटीची दारू पकडली. चंदगड पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे तालुक्यात कौतुक होत असले तरी पोलिसांनी गावोगावी माहिती घेऊन कारवाई केल्यास अजूनही कोट्यवधी रुपयांची दारू चंदगड तालुक्यात सापडेल.
महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर चंदगड तालुका वसला आहे. त्यामुळे तालुक्यात गोवा व बेळगाववरून दारू, गांजा व अफू यासारख्या अवैध पदार्थांची चंदगड तालुक्यात वाहतूक होत असते. अफूसारख्या व इतर अमली पदार्थांची तस्करी काही प्रमाणात थांबली आहे.
मात्र, गोव्यावरून चंदगड तालुक्यात येणाऱ्या दारूचा मात्र गावोगावी सुळसुळाट आहे. गोव्यावरून चंदगड तालुक्यात रोज एक लोड दारू पुरवणारी टोळी सक्रिय आहे. चंदगड तालुक्यातील काही मोठे एजंट प्रत्येक एजंटाला पद्धतशीरपणे दारू पोहोचवत आहेत. दोडामार्ग व आंबोलीमार्गे तालुक्यात गोवा बनावटीचा दारू पुरवठा होत आहे.
चंदगड पोलिसांना याबाबत किंचितही माहिती नसेल का? अशी चर्चा तालुक्यात आहे. तालुक्यात गोवा बनावटीची दारू वितरित करणारी वेगळी यंत्रणा असून हे दारू पुरविणारे काही युवक पोलिसांच्या मस्टरवरील गुन्हेगार आहेत. त्यामुळे तालुक्यात येणारी दारू बंद करण्याचे चंदगड पोलिसांनी ठरविले, तर कोणत्या गावात कोण एजंट आहे,
या सर्वांची माहिती सहज उपलब्ध होऊन गोव्याची अवैध मार्ग
येणारी दारू तत्काळ बंद होऊ
शकते. मात्र, याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जाते.
१५ दिवसांपूर्वी शिरगाव व उमगाव येथे पोलिसांनी छापा टाकून कोट्यवधीची दारू पकडली आहे. पोलिसांनी जर वेळीच कारवाई केली असती तर या गोवा बनावटीच्या दारूचे जाळे तालुक्यात विस्तारले नसते. या दोन ठिकाणी पकडलेल्या घरमालकांची कसून चौकशी केल्यास दारूचा साठा करणारे मालक कोण आहेत? किंवा तालुक्यात कुणाकडून दारूचा पुरवठा होतो, याची माहिती मिळू शकते. मात्र, पोलिसांनी आजपर्यंत केवळ जुजबी कारवाईच केली आहे.
मार्च एंडिंगचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मार्चमध्येच कारवाई करणारी उदाहरणे आहेत. उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर कारवाई थंडावते हा अनुभव आहे. तालुक्यात अवैध दारू वाहतुकीवर लगाम घालायचा असल्यास शिनोळी, तुडये, कोवाड, अडकूर, आंबोली, कोदाळी येथे कायमस्वरूपी नाके लावण्याची गरज आहे.
‘राज्य उत्पादन शुल्क’ कशासाठी ?
तालुक्यात अवैध दारूची वाहतूक होऊ नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कर्मचारी रात्रंदिवस गस्त घालत असतात. मात्र, त्यांनी आजपर्यंत एकही गोवा बनावटीच्या दारूची बाटली पकडलेली नाही. उत्पादन शुल्क खात्याची गाडी मात्र दर महिन्याच्या १ ते ५ तारखेदरम्यान तालुक्यातील बारसमोर उभी असलेली नागरिकांना दिसते. त्यामुळे हे अधिकारी नेमकी काय कारवाई करतात याची माहिती जनतेसमोर येणे आवश्यक आहे.

Web Title: 'Chandgad' illegal business in Rajros!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.