खॉँसाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी कलाकारांचा दरबारी राग....

By admin | Published: October 25, 2016 11:41 PM2016-10-25T23:41:25+5:302016-10-26T00:12:42+5:30

मिरजेतील ‘गवई बंगला’ : ऐतिहासिक वास्तू विकत घेऊन स्मारक उभारण्याची शिष्यांनी दाखविली तयारी; मागणीकडे दुर्लक्ष झाल्याने शासनाबद्दल नाराजी--अब्दुल करीम खॉँ स्मृतिदिन विशेष...

Artist's Court Raga for Khonsa's National Memorial .... | खॉँसाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी कलाकारांचा दरबारी राग....

खॉँसाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी कलाकारांचा दरबारी राग....

Next

सदानंद औंधे -- मिरज -देशातील महान गायक व किराना घराण्याचे अध्वर्यु, संगीतरत्न अब्दुल करीम खाँ यांचा मिरजेतील गवई बंगला राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी देशातील नामवंत गायक, वादकांचा संघर्ष सुरू आहे. मात्र शासनाने या मागणीची दखल घेतली नसल्याने खाँसाहेबांचे स्मारक रखडले आहे.उत्तर प्रदेशातील कैराना येथील अब्दुल करीम खाँ यांची मिरज ही कर्मभूमी होती. मिरजेत १९३० मध्ये त्यांनी बंगला बांधून तेथे वास्तव्य केले. खाँसाहेबांनी याच गवई बंगल्यात नामवंत शिष्यांना गायकीचे धडे दिले. सवाई गंधर्व, हिराबाई बडोदेकर, संगीत दिग्दर्शक राम कदम, बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, सरस्वतीबाई राणे, पंडित भीमसेन जोशी, पंडित गंगूबाई हनगल, पंडित फिरोज दस्तूर, प्रभा अत्रे, शोभा गुई, मल्लिकार्जुन मन्सूर, कैवल्यकुमार या खाँसाहेबांच्या शिष्यांनी किराना घराण्याची परंपरा पुढे सुरू ठेवली. १९३७ मध्ये खाँसाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या वारसांची आर्थिक परिस्थिती खालावल्याने गवई बंगला इतरांकडे हस्तांतरित झाला. मिरजेतील गवई बंगला या वास्तूशी किराना घराण्यातील दिग्गज गायकांचे भावनिक नाते आहे. गवई बंगल्यात खाँसाहेबांच्या वस्तूंचे संग्रहालय करून संगीत शिक्षणासाठी ही इमारत राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी देशातील नामवंत कलाकारांची मागणी आहे. गेली २५ वर्षे यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरू आहे. मिरजेचे तत्कालीन आमदार शरद पाटील यांनी गवई बंगल्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. तत्कालीन सांस्कृतिक मंत्री अशोक चव्हाण यांनी गवई बंगल्याचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याबाबत विचार सुरू असल्याचे उत्तर दिले होते, मात्र त्यानंतर आजतागायत शासनाने कलाकारांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. गवई बंगला हस्तांतरित झाल्यामुळे खॉँसाहेबांची कन्या हिराबाई यांनी मिरजेत अब्दुल करीम खाँ स्मृती भवनाची उभारणी केली. स्मृती भवनात सतार व तबलावादनाचे प्रशिक्षण देण्यात येते. गवई बंगला ही ८६ वर्षांपूर्वी बांधलेली इमारत आजही सुस्थितीत व दिमाखात उभी आहे. राष्ट्रीय स्मारकाबाबत शासनाकडून प्रतिसाद नसल्याने खाँसाहेबांच्या शिष्यांनी गवई बंगला विकत घेऊन तेथे स्मारक उभारण्याची तयारी दर्शविली आहे.
गवई बंगल्याचा वापर संगीत शिक्षण, संगीत कार्यक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी करण्याची मागणी आहे. यासाठी दिग्गज गायक मंडळींनी मुख्यमंत्र्यांपासून राष्ट्रपतींपर्यंत पाठपुरावा केलला आहे. मात्र त्यास अद्याप यश आलेले नाही. २५ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गवई बंगला राष्ट्रीय स्मारक बनविण्याचे आश्वासन दिले होते. मात्र राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याचे अधिकार केंद्र शासनाला असल्याने, हे काम रखडले. खाँ साहेबांचे पट्टशिष्य पंडित बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी यांचे पुत्र सुरेश कपिलेश्वरी यांनी, गवई बंगला राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी अब्दुल करीम खाँ गवई बंगला स्मृती मंडळाची स्थापना केली. मंडळामार्फत गवई बंगल्यासाठी अजूनही संघर्ष सुरू आहे. ज्येष्ठ गायिका पद्मविभूषण गंगूबाई हनगल यांची, गवई बंगला खाँ साहेबांचे स्मारक व्हावे, अशी तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी राष्ट्रपतींनाही साकडे घातले होते. मात्र त्यांच्या हयातीत गवई बंगल्यातील स्मारक अपूर्णच राहिले. खासगी मालकाच्या ताब्यात असलेली गवई बंगल्याची वास्तू जमीनदोस्त होण्यापूर्वी येथे राष्ट्रीय स्मारक व्हावे, ही कलावंतांची मागणी कधी पूर्ण होणार, याबाबत प्रश्नचिन्ह आहे.


संगीत सभेतून स्मृती
अब्दुल करीम खाँ यांची मिरजेतील मीरासाहेब दर्ग्यावर अपार श्रध्दा होती. दर्ग्यात गानसेवा करणाऱ्या खाँ साहेबांच्या मृत्यूनंतर १९३८ पासून त्यांच्या शिष्यांनी दर्गा उरूसात अब्दुल करीम खाँ स्मृती संगीत सभा सुरू केली. १९३८ मध्ये दर्गा उरूसातील पहिल्या स्मृती संगीत सभेचे आॅल इंडिया रेडिओवरून प्रक्षेपण करण्यात आले होते. गेली ७८ वर्षे खाँ साहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीत सभा सुरू आहे.

शासकीय पातळीवर दुर्लक्षामुळे राष्ट्रीय स्मारक होण्यास दिरंगाई होत आहे. खाँ साहेबांच्या तंबोरा, तबला यांसह दैनंदिन वापराच्या वस्तू, गायनाच्या रेकॉर्डस् या वस्तू राष्ट्रीय स्मारकासाठी शासनाच्या ताब्यात देण्यास तयार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी व कलाकारांना प्रेरणा देण्यासाठी खाँ साहेबांचे स्मारक आवश्यक आहे. यासाठी सर्व कलाकार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
- सुरेश कपिलेश्वरी, अध्यक्ष, गवई बंगला स्मृती मंडळ

मिरजेतील गवई बंगला ही वास्तू किराना घराण्यातील गायकांचे श्रध्दास्थान व भारतीय संगीताचे प्रेरणास्थान आहे. खाँ साहेबांनी या इमारतीत संगीत साधना करून संगीत शिक्षण देऊन थोर शिष्यपरंपरा निर्माण केली आहे. राष्ट्रीय स्मारकासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे प्रस्ताव दिला आहे. त्यांच्याकडून राष्ट्रीय स्मारकाबाबत निर्णय होईल अशी अपेक्षा आहे.
- बाळासाहेब कदम,
उपाध्यक्ष, गवई बंगला स्मृती मंडळ

Web Title: Artist's Court Raga for Khonsa's National Memorial ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.